औरंगजेबाची स्तुती केल्यावरून समाजवादी पक्षाचे मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार अबू आझमी यांना विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून निलंबित करण्यात आले. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेले आझमी अनेक वेळा वादात सापडतात. एकाच वेळी दोन मतदारसंघातून विजयी होण्याचा राज्यात त्यांचा विक्रम आहे. २००९ मध्ये भिवंडी (पूर्व) तसेच मानखुर्द शिवाजी नगर या ठिकाणांहून ते निवडून आले होते. त्यातील मानखुर्द हा मतदारसंघ त्यांनी ठेवत भिवंडीचा राजीनामा दिला. पुढे तीन वेळा त्यांनी येथून विधानसभा गाठली.
विधानांनी वाद
उत्तर प्रदेशातील आझमगड हे अबू आझमींचे जन्मगाव. तेथून येऊन मुंबईच्या राजकारणात त्यांनी बस्तान बसविले. बॉम्बस्फोटाच्या आरोपातून मुक्त झाल्यावर १९९५ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९३ मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. वादग्रस्त विधानांनी यापूर्वीही चर्चेत होते. यापूर्वी बहुचर्चित शक्ती मिल बलात्कार खटल्यात त्यांंनी महिलाविरोधी विधाने केल्याचा आरोप झाला होता. याखेरीज २०१७ मध्ये बंगळुरू येथील विनयभंग प्रकरणानंतर महिलांनी रात्री उशिरापर्यंत एकटे फिरायला जाऊ नये, असे भाष्य करत वाद ओढवून घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता औरंगजेबाचे कौतुक केल्यावरून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना तुरुंगवासही होऊ शकतो. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर समाजवादी पक्षाने आझमी यांची हकालपट्टी करावी अशी सूचना करत, ‘त्यांना उत्तर प्रदेशात पाठवा. ठीक करू,’ असे बजावले. हा राजकीय धुरळा पाहता आझमी हे पुन्हा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले. यापूर्वी २००९ मध्ये आमदारांच्या शपथविधीवेळी मनसेचे तत्कालीन आमदार दिवंगत रमेश वांजळे यांनी आझमी यांच्या कानशिलात लगावली होती. तर २०२३ च्या विधानसभा अधिवेशनात वंदेमातरम म्हणण्यास आझमी यांनी नकार दिला होता.

समाजवादी पक्षाचा राज्यातील चेहरा

अबू आझमींवर समाजवादी पक्षाने कारवाई केली नाही. हा राज्यातील प्रमुख मुस्लीम चेहरा आहेत. २००२ ते २००८ या काळात आझमी राज्यसभेवर होते. २००४ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली. मात्र शिवसेनेच्या योगेश पाटील यांनी त्यांचा पराभव केला. त्याच वर्षी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या गुरुदास कामत यांनी त्यांना नमवले. पुढे काही महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते यशस्वी ठरले. त्यानंतर मानखुर्द या मतदारसंघाची बांधणी केली. त्यामुळे २०२४ मध्ये त्यांना नवाब मलिक या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने आव्हान दिले होते. मानखुर्द-शिवाजीनगर या जवळपास ४० टक्के मुस्लीम मतदार असलेल्या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा यशस्वी झाले. राज्यात समाजवादी पक्षाचे दोन आमदार आहेत. आता मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आहे. पालिकेला अबू आझमी हे काही जागा हमखास निवडून आणतील. त्यामुळे पक्षातही त्यांचे महत्त्व दिसते. याखेरीज समाजवादी पक्षाची राज्यात ताकद नाही. आझमी हे वैयक्तिक ताकदीवर निवडून येतात. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही समाजमाध्यमातून आझमी यांच्या निलंबनावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र विधिमंडळातील हे ३३३ वे निलंबन ठरले.

सारवासारव सुरूच

आझमी यांनी वक्तव्यावरून सारवासारव केली असली तरी, वाद थांबलेला नाही. आझमी यांचा समाजवादी पक्ष विरोधकांच्या इंडिया आघाडीत पर्यायाने राज्यात महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. मात्र मित्र पक्षांनीही आझमी यांच्यावर तोफ डागली. ठाकरे गटाने आझमी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटाशी त्यांची स्पर्धा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आझमी यांच्यावर टीकास्त्र सोडले. काँग्रेसनेही ठरावाला पाठिंबा दिला. आझमींनी भावनेला धक्का पोहचेल असे वक्तव्य करत वाद ओढवून तर घेतला, यातून त्यांच्यावरील ठरावीक विचारांचा पुरस्कार केल्याचा शिक्का अधिक गडद होईल.