हृषिकेश देशपांडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच नागपूरमध्ये संघटना विस्तारासाठी दौरा केला. आता बारामती मतदारसंघावर पक्षाने लक्ष केंद्रित केले आहे. या दोन्ही ठिकाणी मनसेचा फारसा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मनसेपुढे हे दोन्ही मतदारसंघ आव्हानात्मक आहेत. पण हा पक्ष मोजकी शहरे वगळता खरोखर किती वाढलाय किंवा उरलाय?
पक्ष विस्तारासाठी दौरे
मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मनसेचा प्रामुख्याने विस्तार झाला. मुंबई, ठाणे पट्ट्यात विधानसभेच्या ६५ जागा आहेत. त्यातही या जागांमुळे कोकणात प्रभाव पडतो. याखेरीज नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता होती. नाशिक शहरात तीन मतदार संघ आहेत. त्या तुलनेत संघटना वाढीच्या दृष्टीने विदर्भ हा मनसेला आव्हानात्मक आहे. विदर्भात भाजपविरोधात काँग्रेस असा दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये सरळ सामना असतो. उद्धव ठाकरे यांच्या गटाचाही पश्चिम विदर्भात प्रभाव आहे. त्या तुलनेत नागपूरमध्ये त्यांना यश मिळालेले नाही. त्यामुळे राज यांना विदर्भात संघटना उभी करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागतील. मनसेने यवतमाळ जिल्ह्यात यापूर्वी स्थानिक निवडणुकीत यश मिळवलेले आहे. मात्र एखादी पालिका किंवा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेचा मतदार संघ आणि विधानसभा क्षेत्र यात फरक आहे.
पक्षाचे संख्याबळ किती?
कल्याण ग्रामीण मतदार संघात राजू पाटील यांच्या रूपाने पक्षाचा एकमेव आमदार आहे. तर नाशिकमध्ये एकेकाळी सत्ता असलेल्या महापालिकेत पाच नगरसेवक होते. ठाण्यात पक्षाचे संघटन असले तरी पालिकेत त्यांना नगरसेवक निवडून आणता आलेला नाही. तर कल्याण-डोंबिवली पालिकेत ९ नगरसेवक होते. त्यापूर्वी ही संख्या २८ होती. पुण्यातही दोन नगरसेवक आले होते. मुंबई महापासिकेत सुरुवातीला सात नगरसेवक होते. त्यांतील सहा नंतर शिवसेनेत गेले. सध्या या बहुसंख्य महापालिकांवर प्रशासक आहे.
बारामती मतदारसंघ चर्चेत…
भाजपनेही २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बारामतीवर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मतदारसंघात तीन दिवस दौरा केला. आता राज ठाकरे बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला भेदण्याच्या प्रयत्नात आहेत. या मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांनी पुण्यात राज यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. पक्षाचे नेते वसंत मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच बारामती मतदारसंघाचा दौरा केला. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी परिश्रमाने आणि कामातून हा मतदारसंघ बांधला आहे. सहकाराच्या माध्यमातून संस्थात्मक काम आणि त्या आधारे कार्यकर्त्यांचे जाळे ही राष्ट्रवादी काँग्रेसची बलस्थाने.
नागरीकरणाचा वेग वाढला तसेच मतदार संघांच्या फेररचनेनंतर बारामती मतदारसंघातील काही भाग पुणे शहराशी जोडला गेला. त्यामुळे विरोधकांना आशा वाटू लागली. मात्र एखाद्या नेत्याने दौरा करून फरक पडेल अशी स्थिती नाही. त्यासाठी लोकांना जोडून घ्यावे लागणार आहे. मनसेचा विचार केला तर पुणे शहरात त्यांची संघटना चांगली आहे. त्यातही कोथरुड, हडपसर या मतदारसंघात त्यांच्याकडे सक्षम नेते आहेत. सातत्याने काम केल्यास मनसेसाठी कार्यकर्त्यांचा संच उभा करणे बारामतीत शक्य आहे. बाहेरील पक्षातून कार्यकर्ते आणून आव्हान उभे करणे शक्य नाही.
संतुलन कसे साधणार?
राज ठाकरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट तसेच भाजप यांच्याशी जवळीक आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईत दीपोत्सव कार्यक्रमात या पक्षांचे प्रमुख नेते एकत्र आले होते. त्यामुळे सरकारच्या धोरणांवर टीका करताना राज यांना मर्यादा आहेत. पालिका निवडणुका तोंडावर आहेत. मुंबई आणि ठाण्यात राज यांची स्वबळावर लढताना कसोटी लागेल. एकीकडे भाजप किंवा मुख्यमंत्र्यांना न दुखावता निवडणूक लढविणे अन्यथा पडद्यामागे त्यांच्याशी युती करून काही जागा निवडून आणणे हा पर्याय आहे. तीन पक्षांची युती करून जागावाटप करणे कठीण आहे. अशा वेळी मैत्रीपूर्ण लढतींचा पर्याय आहे. मुंबई महापालिकेचे राज्याच्या राजकारणात मोठे महत्त्व आहे. एक तर पालिकेचा ४० हजार कोटींवर असलेला अर्थसंकल्प. शहरात राज्याच्या विविध भागातून नागरिक मुंबापुरीत वास्तव्याला आहेत. त्यातही मुंबईच्या निकालाचा प्रभाव काही प्रमाणात कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर पडतो. मुंबईत गेल्या वेळी केवळ सातच नगरसेवक निवडून आणणे मनसेला शक्य झाले. यंदा निर्णायक जागा जिंकूण सत्तेची सूत्रे हाती ठेवण्यासाठी मनसेचा प्रयत्न आहे. अशा वेळी मुंबईबाहेर लक्ष केंद्रित करून पक्षविस्तार करण्याचा प्रयत्न राज यांच्यासाठी आव्हानात्मक आहे.