सौरभ कुलश्रेष्ठ

गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेच्या भावी राजकारणाची चुणूक राज ठाकरे यांनी दाखवल्यानंतर ते मधूनच एखादे भाषण देतात आणि गायब होतात अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. त्यानंतर लगेचच राज ठाकरे यांची ठाण्यात सभा होणार हे जाहीर झाले. निवडणुकीचा काळ किंवा दौरा वगळता आठवडाभरात राज ठाकरे यांची दुसरी सभा जाहीर होणे हे प्रथमच घडत आहे. त्यामुळे स्वाभाविकच मनसेचे स्थानिक नेते, कार्यकर्ते उत्साहित झाले असून राज ठाकरे यांनी पुढील काही महिन्यांत दौरे वाढवल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. उन्हाळ्यातील तापमान आणि मनसेचे राजकारण समांतर वेगाने तापण्याचे संकेत मिळत आहेत.

Sadhguru disheartened over Parliament disruptions on adani issue
Sadhguru on Adani: ‘उद्योगपतींवरून संसदेत रणकंदन नको’, अदाणींना समर्थन देत सद्गुरुंनी व्यक्त केली नाराजी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

मुंबईनंतर लगेच ठाण्यात सभेचे कारण काय?

राज ठाकरे यांचे वक्तृत्व आवडणारा, सभांना गर्दी करणारा मोठा वर्ग आहे. पण राज ठाकरे यांच्या प्रचारात, संपर्क मोहिमांमध्ये सातत्य नसते अशी टीका होत असते. तोच धागा पकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज ठाकरे हे मध्येच एखादी सभा घेऊन बोलतात व गायब होतात असे विधान करत मनसेच्या वर्मावर बोट ठेवले. राज ठाकरे यांनी आता तोच समज खोटा ठरवण्याची तयारी केल्याचे लगेच जाहीर झालेल्या ठाण्याच्या सभेवरून दिसून येते. मुंबईतील आपल्या सभेनंतर राजकीय पातळीवर पुन्हा एकदा महत्त्वाचे स्थान घेण्याची संधी येत असताना विरोधकांची टीका खरी असल्याचे चित्र निर्माण होऊ नये याची काळजी राज ठाकरे घेत आहेत हे त्यावरून दिसून येत आहेत. त्याचबरोबर मनसे-भाजप राजकीय सहकार्य हे आता उघड गुपित आहे. भाजप हा सतत कार्यरत असणारा आणि राजकीय वातावरणनिर्मितीच्या बाबतीत दक्ष असलेला पक्ष आहे. त्यामुळे मध्येच सभा घेऊन गायब होणारा नेता ही राज ठाकरे यांची प्रतिमा भविष्यातील गणित जुळवताना अडचणीची ठरू शकते याची जाणीव होऊन भाजपही पडद्यामागे राहून राज यांना अधिकाधिक दौऱ्यांसाठी राजी करण्याचा प्रयत्न करणार अशी चिन्हे आहेत. 

मनसेसाठी ठाण्याचे राजकीय महत्त्व काय?

मुंबईबरोबरच ठाणे महापालिका हा गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला ठरला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबईपाठोपाठ ठाणे महापालिकेतील सत्ता टिकवणे हे प्रतिष्ठेचे असणार आहे. मुंबई आणि ठाण्यात मुख्य लढत ही शिवसेना-भाजपमध्ये असली तरी मनसेला या संघर्षात वाव मिळू शकतो. ठाण्यात २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत लाखाहून अधिक मते मनसेला मिळाली होती. त्यावेळी राज ठाकरे यांच्या उमेदवारामुळे मुंबईबरोबरच ठाण्यातही शिवसेना उमेदवार पराभूत झाला होता. शिवसेनेला मानणारा वर्ग हा मशीद-भोंगे या आक्रमक हिंदुत्वाच्या राजकारणाच्या आधारे शक्य तितका तोडावा आणि तो मनसेकडे वळवावा अशी रणनीती यामागे आहे. ठाण्यातील राजकीय घडामोडींचे परिणाम शेजारी कल्याण-डोंबिवली व नवी मुंबईतही होणार असा कयास आहे. त्यामुळे मुंबईच्या परिघावरील भागात शिवसेनेसमोर आव्हान उभे करण्यासाठी ठाण्याची निवड मनसेने केली आहे. शिवाय भाजपने मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली असून मनसेच्या माध्यमातून मराठी मतदारांच्या शिवसेनेच्या मतपेढीला खिंडार पाडण्याची योजना आहे. तीच रणनीती ठाण्याबाबतही आहे. ठाण्यात भाजपचे आमदार आहेत. भाजपला मानणारा वर्ग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून ठाण्यात सुसंघटित आहे. या वर्गाची मदतही भाजपचे उमेदवार नसलेल्या वॉर्डांमध्ये  मनसेला मिळू शकते. 

विश्लेषण : आयएनएस विक्रांत प्रकरण आणि भाजपाचे किरीट सोमय्या यांच्यावर दाखल झालेला फसवणुकीचा गुन्हा

ठाण्यानंतर पुढे काय?

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद हा सुवर्ण चतुष्कोण शिवसेनेसाठी महत्त्वाचा आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद या महापालिकांमध्ये शिवसेनेची सत्ता आहे. याच भागात राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी करणारा वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. या भागातील शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उघड किंवा पडद्यामागे मनसे-भाजपचे सहकार्य होणार हे आता स्पष्ट झाले आहे. मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या राजकारणास हरकत घेणारे पुण्याचे मनसे प्रमुख वसंत मोरे यांना तातडीने पदावरून दूर करत राज ठाकरे यांनी पुण्याचे मनसेसाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे महापालिकांच्या निवडणुका दूर असल्या तरी पुढच्या काही महिन्यांत राज ठाकरे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद या चतुष्कोणावर भर देत दौरे करून राज्याचे राजकारण तापवणार असे संकेत त्यातून मिळत आहेत. 

विश्लेषण : लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही भाजप वरचढ, तर काँग्रेस अगतिक!

बदललेली भूमिका काय देणार?

सध्याच्या राजकीय परिस्थितीत मनसे हा कोणत्याही शहरात सत्तेच्या प्रमुख दावेदारीच्या जवळपासही नाही. उलट २०१४ नंतर मोदीलाटेत पक्षाच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने ती जागा भरून काढत त्याच मोदीलाटेचा उपयोग करून मनसेचे राजकीय पुनरुज्जीवन करण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न आहे. पक्षाच्या झेंड्याचा भगवा रंग व आता मशीद-भोंगेबाबतच्या विधानामुळे त्यांनी भूमिका बदलली, कोलांटउडी मारली ही टीका रास्त व स्वाभाविक असली तरी त्यांच्यापुरते व मनसे पक्ष म्हणून बोलायचे तर ते राजकीय अस्तित्वाची लढाई लढत आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी अशीच भूमिका बदलत सरकार स्थापन केले. भाजप सर्वांच्याच मुळावर उठल्याने राजकीय अस्तित्व टिकवणे आणि पक्ष वाढवणे या प्रेरणेतून तिन्ही पक्षांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. तोच कित्ता राज ठाकरे गिरवत आहेत. मनसेच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने आपला पक्ष टिकवणे आणि शक्य तितका वाढवणे हेच राज ठाकरे यांना भूमिका बदलून साध्य करायचे आहे. भाजपने युती केली तर उघडपणे नाही तर धोरणात्मक सहकार्य करत मनसेला पक्ष म्हणून राजकीयदृष्ट्या जिवंत ठेवणे, राजकीय समीकरणे घडवणारा-बिघडवणारा नेता हे आपले राजकीय महत्त्व पुन्हा प्रस्थापित करणे, मनसैनिकांना निवडणुकीच्या राजकारणात महत्त्व मिळवून देत त्यांना पक्षात टिकवून ठेवणे, सरतेशेवटी शक्य तितक्या जागा जिंकण्याचा प्रयत्न करणे हाच यामागील हेतू आहे. सत्तासमीकरणात स्थान मिळो न मिळो पण यातून प्रत्येक महापालिकेत काही नगरसेवक निवडून आले तरी समथिंग इज बेटर दॅन नथिंग या न्यायाने मनसेच्या पारड्यात काही तरी पडावे आणि २०२४ किंवा त्याआधी विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष नव्याने सज्ज व्हावा यासाठीच हे सारे राजकारण.

Story img Loader