-अनिश पाटील
कमी व्याजदरात कर्ज देण्याच्या नावाखाली सध्या खंडणी उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. ॲप्लिकेशन किंवा ॲप डाऊनलोड करायला सांगून त्याच्या माध्यमातून मोबाइलमधील खासगी माहिती मिळवून आरोपी असे प्रकार करत आहेत. हे प्रकार नेमके कसे घडतात, त्यापासून आपण स्वतःला कसे वाचवू शकतो, हे जाणून घेऊया.
आरोपी गरजूंना कसे जाळ्यात अडकवतात?
समाजमाध्यमांवर जाहिराती देऊन सायबर फसवणूक करणारे भामटे त्यांचे सावज शोधतात. विना कागदपत्रे कर्ज मिळवा, कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध अशा जाहिराती व संदेश पाठवले जातात. त्यामुळे एखादी गरजू व्यक्ती त्यांना संपर्क साधते. त्यानंतर आरोपी अशा व्यक्तींच्या अडचणींचा फायदा उचलून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात. विशेष करून महिलांना अधिक लक्ष्य केले जात असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
कशा प्रकारे खंडणी मागितली जाते?
सध्या विविध ऑनलाइन ॲपद्वारे नागरिकांना कमी कालावधीचे ऑनलाइन कर्ज घेण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांची गोपनीय माहिती मिळवून धमकावण्याचे, खंडणी उकळण्याचे प्रकार घडत आहेत. आरोपी वेगवेगळया आकर्षक कर्जांचे प्रस्ताव देतात. कमी व्याजदर ठेवून कमी वेळेत कर्ज मंजूर करून देतो अशा प्रकारचे आमिष दाखवून नागरिकांना ऑनलाइन कर्ज दिले जाते. नागरिकांना कर्ज घेण्याकरीता कंपनीचे ॲप मोबाइलमध्ये डाउनलोड करण्यास सांगून त्यांच्या मोबाइलमधील छायाचित्रे, संपर्क क्रमांक, चित्रफीती अशी महत्त्वपूर्ण माहिती संबंधित कंपनीस शेअर करण्याचे बंधन ठेऊनच नागरिकांना कर्ज मंजूर करण्यात येते. त्यानंतर संबंधित व्यक्तीने कंपनींचे कर्ज फेडल्यानंतरही त्यांना अधिकची रक्कम भरण्याची सक्ती करण्यात येते व ग्राहकाने त्यास विरोध केल्यास ते कर्ज मंजुर करताना ग्राहकाने सादर केलेल्या त्याच्या फोनमधील माहितीद्वारे संबंधित व्यक्तीला व त्याचे नातेवाईक, मित्रमंडळींना शिवीगाळ, अश्लील छायाचित्र अथवा चित्रफीत पाठवून खंडणी मागितली जाते.
कधी, कुठे असे प्रकार घडले?
अंधेरी पूर्व येथे राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेच्या दिराला तिचे छायाचित्र व अश्लील संदेश पाठवले गेले. तक्रारदार महिलेला ५० हजार रुपये कर्ज देण्यासाठी आरोपीने त्यांना डिस्कवर लोन हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले होते. त्यांनी २१ एप्रिलला हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर आरोपीने केवळ तीन हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर कर्जाच्या रकमेच्या नावाखाली केवळ सतराशे रुपये या महिलेला पाठवले. त्यांना ५० हजार रुपयांची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी तात्काळ कर्जाची रक्कम परत केली. त्यावेळी आरोपीने तीन हजार रुपयांची खंडणी मागून ती न दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने मंगळवारी तक्रारदार महिलेच्या दिराला त्यांचे छायाचित्र पाठवून कर्जाची रक्कम परत करण्यासाठी ती महिला वेश्याव्यवसाय करत असल्याचा संदेश पाठवला. हा प्रकार महिलेला कळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार केली होती. दुसऱ्या एका प्रकरणात अंधेरी रेल्वे पोलिसांनी नुकतेच एका तरुणाला कर्नाटकातून अटक केले. त्यानेही अशा पद्धतीने महिलेला धमकावले होते. आरोपी १० टक्के कमिशनवर अशा प्रकारे धमकी देऊन कर्जाची रक्कम वसूल करत असल्याचे त्याचे चौकशीत सांगितले आहे.
गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे का?
कर्जाच्या नावाखाली खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या तीन महिन्यात एकट्या मुंबईत २१हून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यात दीडशेहून अधिक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. तक्रारदारांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय अनेक जण बदनामीच्या भीतीने तक्रारीही करत नसल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
स्वतःला सुरक्षित कसे ठेवता येईल?
मोबाइलमधील छायाचित्रे, संपर्क क्रमांक, चित्रफीती अशी महत्त्वपूर्ण माहिती संबंधित कंपनीस शेअर करण्याचे बंधन ठेऊनच नागरिकांना कर्ज मंजूर करण्यात येते. त्यामुळे कोणतेही अनोळखी ॲप्लिकेशन डाऊनलोड करत असाल, तर अशी बंधने स्वीकारू नका. कोणत्याही अनधिकृत ॲपद्वारे कर्ज घेऊ नका व कमी कालावधीच्या ऑनलाइन कर्जाच्या आमिषाला बळी पडू नका. तसेच कोणासोबत असा प्रकार घडल्यास त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.