अनिकेत साठे
चीनने पाकिस्तानसाठी बांधलेल्या हँगोरवर्गीय पहिल्या प्रगत पाणबुडीचे नुकतेच जलावतरण झाले. वुचांग जहाजबांधणी उद्योग समूहाच्या चीनमधील तळावर झालेल्या सोहळ्यास पाकिस्तान नौदलाचे प्रमुख ॲडमिरल नावेद अश्रफ उपस्थित होते. अत्याधुनिक पाणबुड्यांनी चीन पाकिस्तानी नौदलाच्या आधुनिकीकरणास चालना देत आहे. चीन-पाकिस्तानची सर्वकालीन लष्करी मैत्री, नौदलांचे संयुक्त सराव व सक्षमीकरणाने भारतासभोवतालची परिस्थिती झपाट्याने बदलत आहे.
पाणबुडीचा करार काय आहे?
इस्लामाबाद आणि बीजिंग यांच्यातील अनेक लष्करी करारातील एक म्हणजे हँगोरवर्गीय पाणबुडी प्रकल्प. २०१५ मधील या करारान्वये पाणबुडीचा विकास झाला. त्याअंतर्गत एकूण आठ अत्याधुनिक पाणबुड्या पाकिस्तानला दिल्या जाणार आहेत. यातील चार वुचांग जहाज बांधणी उद्योग समुहाद्वारे तर उर्वरित चार पाणबुड्यांची बांधणी कराची शिपयार्ड आणि इंजिनिअरिंगमध्ये प्रगतीपथावर आहे. करारात तंत्रज्ञान हस्तांतरण समाविष्ट आहे. जलावतरण सोहळ्यात ॲडमिरल नावेद अश्रफ यांनी अत्याधुनिक शस्त्रे व संवेदक असलेल्या हँगोरवर्गीय पाणबुड्या शांतता आणि स्थैर्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, हे अधोरेखित केले. पाकिस्तानी नौदलाच्या सागरी सुरक्षा, प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य निश्चित करण्याच्या संकल्पनांकडे त्यांनी लक्ष वेधले. या प्रकल्पाने उभयतांचे मजबूत लष्करी सहकार्य पुन्हा अधोरेखित झाले.
हेही वाचा >>>४ महिन्यांत २७ महिलांची हत्या; महिलांवरील वाढत्या हिंसाचारामुळे ऑस्ट्रेलिया पेटून उठलाय, देशात नक्की काय घडतंय?
पाणबुडीची वैशिष्ट्ये कोणती?
प्रगत हँगोरवर्गीय पाणबुडी युद्ध आणि शांतताकालीन भूमिका पार पाडण्यास सक्षम असल्याचे सांगितले जाते. चीनच्या युआनवर्गीय ०४१ डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांची निर्यातक्षम आवृत्ती म्हणून ती गणली जाते. या पाणबुडीत तीव्र धोक्याच्या वातावरणात काम करण्यासाठी स्टेल्थ (छुपा संचार) वैशिष्ट्ये सामावलेली आहेत. रडारला सुगावा लागू न देता ती संचार करू शकते. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. हँगोरमध्ये आदेश व नियंत्रण प्रणाली आणि संवेदक एकीकृत स्वरूपात आहे. ज्यामुळे ती एकाच वेळी अनेक लक्ष्यांचा मागोवा घेऊ शकते. २८०० टन वजनाची ही पाणबुडी १० नॉट्स वेगाने मार्गक्रमण करते.
चीन-पाक सागरी कवायतीने काय साधले जाते?
चीन-पाकिस्तानी नौदल २०२० पासून दरवर्षी ‘सी गार्डियन’ संयुक्त सागरी कवायतींचे आयोजन करीत आहे. पहिली कवायत अरबी समुद्रात झाली होती. करोनामुळे २०२१ मध्ये त्यात खंड पडला. २०२२ मध्ये पूर्व चीन समुद्रात आणि २०२३ मध्ये ती अरबी समुद्रात पार पडली. आतापर्यंतची ती उभयतांमधील सर्वात मोठी नौदल कवायत ठरली होती. चिनी नौदल मोठा ताफा घेऊन सहभागी झाले होते. त्यामध्ये कराची बंदरात आणलेल्या चिनी पाणबुडीचाही अंतर्भाव होता. या माध्यमातून चीन अरबी समुद्रात प्रवेश आणि हिंद महासागर क्षेत्रात आपले अस्तित्व वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. काही वर्षांत या क्षेत्रात चिनी पाळत ठेवणारी जहाजे वारंवार आढळतात. बंगालच्या उपसागरासह हिंद महासागर क्षेत्राचा आराखडा, नकाशे तयार करीत चीन व्यापक पाणबुडी कारवाईत सक्षम होण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मानले जाते.
हेही वाचा >>>भारतीय नृत्यकलेचे स्वरूप कसे बदलत गेले? नृत्य केल्याने खरंच आरोग्य सुधारते का?
भारतासमोर आव्हाने कोणती?
जमिनीप्रमाणे सागरी क्षेत्रात चीन आणि पाकिस्तान भारताविरोधात रणनीती आखत आहेत. पाकिस्तानातील आर्थिक संकट वा राजकीय अस्थैर्य त्यांच्या लष्करी मैत्रीत अडसर ठरत नाही. जागतिक शस्त्रास्त्रांच्या निर्यातीत चीनचा सुमारे ४.६ टक्के हिस्सा आहे. यातील ४७ टक्के शस्त्रसामग्री एकट्या पाकिस्तानला दिली जाते. पाकिस्तानी नौदलाचे आधुनिकीकरण चीनच्या पाठबळावर होत आहे. त्याअंतर्गत अलीकडेच त्याने पीएनएस रिझवान हे पहिले हेरगिरी जहाज ताफ्यात समाविष्ट केले. गतवर्षी चीनने पाकिस्तानी नौदलास दोन लढाऊ जहाजे देऊन चार जहाजांची मागणी पूर्ण केली होती. चिनी नौदलाच्या ताफ्यात ३५५ हूून अधिक युद्धनौका असून आज ते जगातील सर्वात मोठे नौदल आहे. त्याच्या सुदूर सागरातील हालचालींत वाढ झाली. कुठल्याही वेळी चीनच्या पाच ते नऊ युद्धनौका हिंद महासागर क्षेत्रात कार्यरत असतात. संशोधनाच्या नावाखाली जहाज संचार करतात. पााकिस्तानी नौदल २०३० पर्यंत ५० टक्क्यांनी विस्तारण्याचा अंदाज असून तेव्हा चिनी नौदलाकडे सुमारे ५५५ युद्धनौकांची ताकद असेल. भारतीय नौदल आणि संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभोवतालची बदलणारी परिस्थिती संसदेच्या संरक्षण विषयक स्थायी समितीसमोर मांडली होती. ही स्थिती भारताच्या सुरक्षेवर परिणाम करू शकते.