-हृषिकेश देशपांडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२४ मध्ये विरोधकांकडून कोण पर्याय असेल, याची रोजच चर्चा सुरू आहे. अनेक नावे घेतली जात आहेत. अर्थात मोदींची लोकप्रियता अद्याप टिकून आहे हे मान्यच केले पाहिजे. मात्र बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवर आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मात देता येईल अशी विरोधकांना आशा आहे. नरेंद्र मोदी यांची देशव्यापी प्रतिमा आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस हा भाजपनंतर सर्व ठिकाणी प्रतिनिधित्व असलेला पक्ष आहे. त्यामुळे दावेदारांमध्ये अर्थातच राहुल गांधी यांचे नाव पुढे येते. राहुल यांनी यावर काही टिप्पणी केलेली नाही. मोदींना पंतप्रधानपदासाठी आव्हान देऊ शकणारे विरोधकांकडून पुढे येत असलेले संभाव्य दावेदार आणि त्यांची बलस्थाने तसेच कच्चे दुवे याचा हा लेखाजोखा.
राहुल गांधी :
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुल हे देशवासियांशी संवाद साधत आहेत. काँग्रेसबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते या यात्रेत आहेत. राहुल यांची प्रतिमा एक लढवय्या अशी आहे. मोदी सरकारचे कडवे टीकाकार अशी त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे देशव्यापी संघटन, त्या पक्षाला असलेली मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच सत्ताविरोधी नाराजीचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. कारण कोणत्याही सरकारला जनतेच्या सर्व अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या जमेच्या बाजू निश्चितच आहेत. मात्र काही गोष्टी विरोधात जाणाऱ्या आहेत. त्यात राहुल गांधी यांनी पक्षाची सत्ता असताना सरकारमध्ये कोणतेही जबाबदारीचे पद सांभाळले नाही ही बाब विरोधक वारंवार अधोरेखित करतात. तसेच सध्या देशात काँग्रेसची स्थिती तितकीशी उत्तम नाही. राजस्थान तसेच छत्तीसगढ या दोनच राज्यांत सत्ता आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळेल (लोकसभेच्या एकूण जागांच्या दहा टक्के ) इतपत जागाही जिंकता आलेल्या नाहीत अशा स्थितीत भाजपच्या सत्तेला आव्हान कसे देणार, हा प्रश्नच आहे. तसेच मोक्याच्या क्षणी राहुल गायब होतात हा एक आक्षेप त्यांच्याबाबत घेतला जातो. हे मुद्दे मोदींचे संभाव्य आव्हानवीर म्हणून राहुल यांना अडचणीचे आहेत.
नितीशकुमार :
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची प्रतिमा ‘सुशासनबाबू’ अशी आहे. तसेच भ्रष्टाचाराचा आरोप नाही व घराणेशाहीपासून मुक्त अशी ओळख आहे. हे दोन्ही मुद्दे भाजपकडून उचलले जातात. त्यामुळे नितीशबाबूंची त्याबाबत बाजू भक्कम आहे. तसेच सरकार चालवण्याचा अनुभव आणि देशाचे राजकारण त्यांना माहीत आहे. काँग्रेसलाही प्रसंगी त्यांना पाठिंबा देण्यात अडचण नाही, या काही जमेच्या बाजू. मात्र नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल पक्ष बिहारबाहेर फारसा नाही. बिहारमधील लोकसभेच्या ४०पैकी किती जागा हा पक्ष जिंकणार हा मुद्दा आहे. तसेच भाजपशी आघाडी करणे, पुन्हा बाहेर पडणे यामुळे नितीशकुमार यांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा येऊ शकतो. हिंदी भाषक पट्ट्यापलीकडे त्यांची फारशी ओळख नाही.
अरविंद केजरीवाल :
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे मोदींना आव्हान देणाऱ्यांमध्ये अग्रभागी असे नाव. दिल्ली तसेच पंजाब या दोन ठिकाणी त्यांच्या पक्षाची सत्ता आहे. केजरीवाल यांची प्रतिमाही उत्तम आहे. मोदींप्रमाणेच उत्तम संभाषण कौशल्य. हिंदी व इंग्रजीवर पकड तसेच दिल्लीतील कामांच्या जोरावर देशभर केजरीवाल यांची चर्चा आहे. मात्र त्यांच्या पक्षाचे देशव्यापी संघटन नाही ही मोठी अडचण. दिल्ली तसेच पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण २० जागा आहेत. याव्यतिरिक्त त्यांचा आप हा पक्ष उत्तराखंड तसेच गुजरातमध्ये काही प्रमाणात लढत देऊ शकतो. एकूणच लोकसभेत त्यांच्या पक्षाला संख्याबळ वाढवणे आव्हानात्मक तसेच काँग्रेस केजरीवाल यांना पाठिंबा देण्याची शक्यता नाही.
ममता बॅनर्जी :
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या ४२ जागा आहेत. त्यातील किमान ३५ जागा जिंकून राष्ट्रीय राजकारणात आपली दावेदारी करण्याची ममता बॅनर्जी यांची महत्त्वाकांक्षा आहे. संघर्ष करण्याची जिद्द, राज्यात भक्कम जनाधार, पक्षावर एकहाती पकड या गोष्टी ममतांच्या बाजूने आहेत. मात्र विरोधकांचा एकमुखी पाठिंबा त्यांना मिळेल याची खात्री नाही. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस व डाव्यांचे त्यांच्याशी वैर आहे. राज्यात त्यांच्या पक्षातील काही सहकाऱ्यांची भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चौकशी सुरू आहे. हे ममतांच्या प्रतिमेला धक्का बसणारे आहे. ममतांनी विविध पक्षांतील नेत्यांना तृणमूल काँग्रेसमध्ये आणण्याचा सपाटा लावला असला तरी, राज्याबाहेर त्यांचा फारसा विस्तार झालेला नाही हे वास्तव आहे.
शरद पवार :
देशाच्या राजकारणातील इत्थंभूत माहिती, सरकारमध्ये विविध पातळ्यांवर कामाचा अनुभव, प्रशासनावर पकड, देशातील समस्यांची जाण, सर्वांना एकत्रित आणेल असे अनुभवी आणि आदर असणारे नेतृत्व, सर्वपक्षीय स्नेह आणि राजकारणापलीकडील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी सलोखा ही शरद पवार यांची बलस्थाने आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुकत्याच दिल्लीत झालेल्या अधिवेशनात पवार यांनी भाजपविरोधात एकजुटीची हाक दिली आहे. मात्र आपण पदाचे दावेदार नसल्याचे नमूद केले आहे. महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादीला फारशा जागा मिळत नाहीत ही एक अडचण आहे. तसेच पवारांचे वय हा एक मुद्दा विरोधक पुढे करतील अशी शक्यता आहे.
के. चंद्रशेखर राव :
तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना राष्ट्रीय राजकारणाची महत्त्वाकांक्षा आहे. त्या दृष्टीने नव्या राष्ट्रीय पक्ष स्थापनेचीही त्यांनी घोषणा केली आहे. मात्र त्यांचा तेलंगण राष्ट्र समिती राज्यातील १७ पैकी लोकसभेच्या किती जागा जिंकणार हा मुद्दा आहे. इतक्या कमी जागांवर पंतप्रधानपदावर दावेदारी करणे कठीण आहे. काँग्रेसशीही त्यांचे सख्य नाही. भाजपने पक्षविस्ताराच्या दृष्टीने तेलंगणवर लक्ष केंद्रित केले आहे. केसीआर जरी दौरे करत असले तरी विरोधकांचा नेता म्हणून सर्वमान्य होणे त्यांच्यासाठी अवघड बाब आहे.
अर्थात आजच्या घडीला विरोधकांकडून अनेक नावे चर्चेत असली तरी पक्षाबाहेरील एखाद्या सर्वमान्य व्यक्तीवर ऐन वेळी तडजोड होऊ शकते. मात्र दुसऱ्या बाजूला भाजपचे संघटन, मोदींची लोकप्रियता तसेच पक्षाकडे असलेली उत्तम निवडणूक यंत्रणा तसेच संघ परिवाराचे बळ पाहता भाजपला २०२४ मध्ये पराभूत करणे सोपे नाही. मात्र निवडणुकीत काहीही अशक्य नसते हे यापूर्वीही आपल्याकडे अनेकदा दिसून आले आहे.