पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवारी ५ एप्रिलला श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्या हस्ते देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला ‘श्रीलंका मित्र विभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोदींच्या एक्सवरील अधिकृत अकाउंटवर याबाबत सांगताना त्यांनी हा पुरस्कार देशातील १४० कोटी जनतेला आणि भारत-श्रीलंकेतील खोलवर रूजलेल्या मैत्रीला समर्पित केला आहे. पंतप्रधान सध्या श्रीलंक दौऱ्यावर आहेत. दिसानायके यांच्या निमंत्रणानंतर मोदी आणि दिसानायके यांची भेट झाली. MyGov Indiaकडून केलेल्या सोशल मिडिया पोस्टनुसार, हा पंतप्रधानांचा २२वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे.
‘श्रीलंका मित्र विभूषण’ पुरस्कार
ज्या राष्ट्रप्रमुखांशी श्रीलंकेचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत त्यांचा सन्मान श्रीलंका मित्र विभूषण या पुरस्काराने केला जातो. हा पुरस्कार प्रदान करणे म्हणजे श्रीलंकेच्या लोकांप्रती त्यांची मैत्री आणि एकता यांचं कौतुक करणे. २००८मध्ये तत्कालीन राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी सुरू केलेला हा पुरस्कार परदेशी लोकांना देण्यात येणाऱ्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक आहे. २०१४च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, हा पुरस्कार श्रीलंकेने दिलेल्या राष्ट्रीय सन्मानांपेक्षा सर्वोच्च आहे. यामध्ये श्रीलंका रत्न पुरस्काराचाही समावेश आहे.
या पुरस्काराची वैशिष्ट्यं काय?
या पुरस्कारांतर्गत एक प्रशस्तिपत्रक आणि श्रीलंकेच्या खास ९ रत्नांनी सजवलेल्या एका रौप्य पदकाचा समावेश आहे. हे पदक नवरत्न कमळाच्या पाकळ्यांनी वेढलेल्या एका गोलाभोवती आहे. हे पदक भारत आणि श्रीलंकेतील चिरस्थायी मैत्रीचे प्रतिनिधित्व करते असे श्रीलंकेच्या राष्ट्रपती कार्यालयाकडून प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. या पदकाच्या मध्यभागी एक कलश आहे, जो तांदळांच्या बारीक पेंढ्यांच्या नक्षीसारखा असून तो संक्रांतीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या कलशासारखा दिसतो. हा कलश समृद्धी आणि नूतनीकरणाचे प्रतीक आहे. पदकाच्या वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्राची चिन्हे आहेत. त्यात धर्मचक्राचाही समावेश आहे, जे दोन्ही देशांच्या बौद्ध वारशाचे प्रतिनिधित्व करते. या पुरस्कार सोहळ्यावेळी पंतप्रधानांच्या गळ्यात हे रौप्य पदक घालण्यात आले.
याआधी कोण ठरले आहेत या पुरस्काराचे मानकरी?
राष्ट्रपतींच्या विवेकबुद्धीनुसार हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत फक्त चार जणांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मालदीवचे माजी अध्यक्ष मौमून अब्दुल गयूम हे फेब्रुवारी २००८मध्ये या पुरस्काराचे सर्वात पहिले मानकरी ठरले. श्रीलंकेच्या गार्डियन या वेबसाईटने, हे त्यांच्या दोन्ही देशांमधील मैत्री, प्रादेशिक सहकार्य वाढवणे आणि हवामान बदलातील जागतिक मोहिमेतील उल्लेखनीय योगदानाची ओळख असल्याचे वर्णन त्यावेळी केले आहे. गयूम यांनी दोन्ही देशांमधील मैत्रीचे वर्णन बहुआयामी असे केले. जानेवारी २०१४मध्ये राजपक्षे यांनी पॅलेस्टिनी अध्यक्ष महमूद अब्बास आणि पॅलेस्टाईनचे माजी अध्यक्ष यासर अराफत (मरणोत्तर) यांना हा पुरस्कार प्रदान केला होता. पॅलेस्टिनीमधील एका कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. त्यावेळी पॅलेस्टिनी सरकारने राजपक्षे यांना त्यांचा सर्वोच्च राज्य सन्मान स्टार ऑफ पॅलेस्टाईन हा पुरस्कारही प्रदान केला होता. त्यानंतर ५ एप्रिल २०२५ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘श्रीलंका मित्र विभूषण’ सर्वोच्च नागरी पुरस्कार सन्मान करण्यात आला आहे.