काही दिवसांपूर्वीच सरसंघचालक मोहन भागवत यांनी LGBTQ समुदायाबाबत एक मत व्यक्त केलं. भारतीय संस्कृतीने प्राचीन काळापासूनच या समुदायाला मान्यता दिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. LGBTQ समुदायाचं उदाहरण देताना मोहन भागवत यांनी महाभारतातल्या जरासंध या राजाच्या दोन सेनापतींचं उदाहरण दिलं होतं. हंस आणि डिम्भक अशी या दोन सेनापतींची नावं होती. भगवान श्रीकृष्णाच्या विरोधात त्यांनी युद्ध केलं होतं. मात्र हंस आणि डिम्भक यांच्यात ‘त्याच’ प्रकाराचं नातं होतं असं मोहन भागवत यांनी म्हटलं. ऑर्गनायझरला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?

जरासंधाचे दोन सेनापती होते. त्यांची नावं होती हंस आणि डिम्भक. ते दोघे अतिशय जवळचे मित्र होते. श्रीकृष्णाने अफवा पसरवली की डिम्भकाचा मृत्यू झाला आहे, ही अफवा खरी मानून हंसने आत्महत्या केली. जरासंधाच्या दोन सेनापतींना कृष्णाने युक्तीने मारलं. आता या दोघांमध्ये काय नातं? तर या दोघांमध्ये तसेच संबंध होते. या आशयाचं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं.

LGBTQ समुदाय आपल्या देशात कधीच अस्तित्त्वात नव्हते असं नाही. जोपर्यंत माणूस आहे तोपर्यंत अशा प्रकारचं नातं असणारे लोक आहेत. मी प्राण्यांचा डॉक्टर आहे मला माहित आहे की प्राण्यांमध्येही समलैंगिकता आढळते.

कोण होते हंस आणि डिम्भक?

हंस आणि डिम्भक हे दोघं जरासंधाच्या सेनेचे सर्वात शक्तीशाली सेनापती होते. जरासंधाला हरवायाचं असेल तर हंस आणि डिम्भक या दोघांचा पराभव होणं आवश्यक होतं. कारण जरासंध, हंस आणि डिम्भक हे तिघे मिळून कुठल्याही सैन्याचा पाडाव करू शकत होते. महाभारतातल्या कथेनुसार जरासंध हा मगध देशाचा राजा होता. त्याला काही अचाट शक्ती प्राप्त होत्या. जरासंध हा युद्धात न हरण्यासाठी ओळखला जात असे. भीमाने कुस्तीचं आव्हान त्याला दिलं. या कुस्तीत भीमाने जरासंधाचा वध केला.

जरासंधाने श्रीकृष्णाच्या मथुरेवर १७ वेळा स्वारी केली होती. महाभारतात कृष्ण आणि युधिष्ठीर यांच्यातला एक संवाद आहे ज्यामध्ये कृष्ण धर्मराजाला १७ व्या स्वारीबाबत सांगतो. दिल्लीच्या लाल बहादूर शास्त्री संस्कृत विद्यापीठाचे तत्त्वज्ञान विभागाचे प्राध्यापक जवाहरलाल म्हणाले की हंस आणि डिम्भक यांची कथा महाभारताच्या १४ व्या अध्यायात ४० ते ४४ या श्लोकांमध्ये सांगितली आहे.

श्रीकृष्णाने युधिष्ठिराला हे सांगितल्याचा उल्लेख आहे की जरासंध आणि त्याचे दोन सेनापती हंस आणि डिम्भक यांचा पराभव करणं शक्यत नाही. कारण हे तिघेही प्रचंड बलवान आहेत. त्यांचा पराभव शस्त्राने केला जाऊ शकत नाही अशीही माहिती प्राध्यापक जवाहरलाल यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

यानंतर श्रीकृष्ण त्या दोघांचा मृत्यू कसा झाला ते सांगतात. हंस नावाचा एक दुसरा राजा जरासंधाच्या बाजूने लढत होता. बलरामाने त्या राजाचा वध केला. त्यावेळी हंस मरण पावल्याची बातमी पसरली. ही बातमी ऐकून डिम्भकाने पाण्यात उडी मारली आणि जीव दिला. इकडे हंसला डिम्भकाच्या मृत्यूबाबत समजलं तेव्हा त्यानेही नदीत उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. साथी, प्रेमी असे शब्द हंस आणि डिम्भक यांच्यासाठी वापरले गेले आहेत. त्यांच्यातले संबंध कसे होते हे सांगण्यासाठी हे नेमके आहेत असंही प्राध्यापक जवाहरलाल यांनी सांगितलं. इतर काही पौराणिक कथांमध्ये हंस आणि डिम्भक यांचा उल्लेख भाऊ असाही आढळतो.

धर्मोपदेशक जितमित्र दास यांनी काय म्हटलं आहे?

दिल्लीतल्या कैलास या भागात असलेल्या इस्कॉन मंदिरातले धर्मोपदेशक जितमित्र दास यांनी सांगतिलं की शाल प्रदेशाचा राजा ब्रह्मदत्त याचे दोन पुत्र हंस आणि डिम्भक यांचा उल्लेख कृष्ण पर्वात आहे. याबाबतची कथा अशी आहे की ब्रह्मदत्ताला अपत्य नव्हतं त्यामुळे त्याने भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. ज्यानंतर हंस आणि डिम्भक या दोघांचा जन्म झाला. हे दोघेही जण शूर होते आणि शंकराचे भक्त होते. मात्र त्यांचे अपराध जेव्हा मोठ्या प्रमाणावर वाढले तेव्हा कृष्णाने त्यांना मारण्याचा निर्णय घेतला असंही जितमित्र दास यांनी म्हटलं आहे.

या दोघांनीही एकदा दुर्वास ऋषींच्या आश्रमाची तोडफोड केली होती. याबाबत दुर्वास ऋषींना श्रीकृष्णाकडे तक्रार केली. यानंतर या दोघांनी राजसूय यज्ञ ही करण्याचं ठरवलं होतं. यासाठी श्रीकृष्णाला पाठवण्यात आलेलं निमंत्रण हे अनादरपूर्ण होतं अशीही माहिती दास यांनी दिली.

मोहन भागवत यांनी हेच उदाहरण नुकत्याच झालेल्या मुलाखतीत दिलं आहे. तसंच मोहन भागवत यांनी असंही सांगितलं की ट्रान्सजेंडर हा समुदाय आपल्याकडे पूर्वापार आहे. या समुदायाची देवता आहे. कुंभ काळात त्यांना विशिष्ट स्थान दिलं जातं. त्यांचे महामंडलेश्वरही आहेत. हिंदू धर्माचे १३ आखाडे आहेत सनातन धर्माचा प्रचार करण्यासाठी कुंभकाळात महामंडलेश्वरांनाही प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलं जातं असंही मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohan bhagwat on lgbtq rights who are hamsa and dimbhaka the generals of jarasandha he mentioned scj
Show comments