Monkeypox How Pandemic Is Declared: साधारण दीड ते दोन आठवड्यांपूर्वी म्हणजेच ११ मेच्या आसपास इंग्लंडमध्ये सापडलेल्या एकमेव ‘मंकीपॉक्स’च्या रुग्णामुळे जगभरातले शास्त्रज्ञ सतर्क झाले आहेत. नायजेरियातून इंग्लंडमध्ये आलेल्या एका व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या आजारावर चर्चा सुरू झाली. लंडनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिस फाऊंडेशन ट्रस्टमध्ये या रुग्णावर उपचार सुरू आहेत. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींचा मागोवा संशोधक घेत आहेत. कारण अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना या आजाराची लागण होण्याचा धोका जास्त असतो.आठवडाभरामध्येच या आजारेच १०० हून अधिक रुग्ण युरोपमध्ये आढळून आल्याने युरोपीयन देशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशातच जागतिक आरोग्य संघटनेनं (डब्लूएचओ) ‘मंकीपॉक्स’संदर्भातील चर्चेसाठी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये या आजाराला साथीचा आजार घोषित करावं का यावर चर्चा झाली. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार युरोपमध्ये समर म्हणजेच उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये ‘मंकीपॉक्स’चा वेगाने फैलाव होऊ शकतो. त्यामुळेच या आजाराला साथीचा आजार म्हणजेच जागतिक साथ (पँडेमिक) घोषित करण्याच्या चर्चा जोरात आहेत. पण जागतिक साथ (पँडेमिक) कोणत्या आजारांच्या वेळी घोषित केली जाते?, त्याचा अर्थ काय असतो?, त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही फायदा होतो का असे अनेक प्रश्न पँडेमिक हा शब्द ऐकल्यावर पडतात. याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक साथ (पँडेमिक) म्हणजे काय ?
जेव्हा एखादा नवीन रोग जगाच्या जास्तीत जास्त भागात पसरतो व त्याचा धोका खूपच वाढलेला असतो तेव्हा जागतिक आरोग्य संघटना जागतिक साथ म्हणजे पँडेमिक जाहीर करत असते. नुकतीच करोनासंदर्भात अशी घोषणा करण्यात आली होती. म्हणजेच १२ मार्च २०२० च्या आसपास ही घोषणा करोनासंदर्भात करण्यात आलेली. पँडेमिक हा शब्द पँडेमॉस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे यात डिमॉस म्हणजे लोकसंख्या व पॅन म्हणजे सर्व जण असा अर्थ आहे.

जागतिक साथ जाहीर करण्याचा अर्थ काय?
जागतिक साथ जाहीर केली म्हणजे जगातील जास्तीत जास्त लोक या विषाणूमुळे आजारी पडण्याची शक्यता आहे असा त्याचा अर्थ. अनेक खंडात रोगाचा प्रसार होणे हा जागतिक साथीचा मुख्य निकष आहे, त्यात कुठल्या आकड्यांचा निकष मात्र नाही. रोगाच्या गंभीरतेपेक्षा प्रसाराचा वेग वाढला की, जागतिक साथ जाहीर केली जाते.

अशी घोषणा करण्याचा उद्देश काय असतो?
स्थानिक साथ ही काही भौगौलिक प्रदेशापुरती मर्यादित असते. तर जागतिक साथ ही अनेक खंडात रोगाचा प्रसार झाल्यानंतर जाहीर होते. जागतिक साथीचा धोका अर्थातच खूप मोठा असतो. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ.घेब्रेसस यांच्या मते जागतिक साथ या शब्दाला खूप गांभीर्य आहे त्यामुळे त्याचा वापर करताना काळजी घेतली जाते. त्यातून संबधित विषाणूविरोधात लढण्यात मानवजात अपयशी ठरली असा चुकीचा संदेश जाऊन भीती निर्माण होऊ शकते. प्रत्यक्षात जागतिक साथ जाहीर करण्याचा उद्देश हा सर्व देशांनी गांभीर्याने उपाययोजना कराव्यात हा असतो.

देशांसाठी असतो हा इशारा
जागतिक साथ जाहीर केल्याने सर्व देशांसाठी तो वेगाने उपाययोजना करण्याचा इशारा असतो. बरेच देश ज्या पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजेत ते करीत नसल्याचे दिसून आल्यानेच बरीच चर्चा करून जागतिक आरोग्य संघटनेनं दोन वर्षांपूर्वी करोनाची जागतिक साथ जाहीर केली होती. तशीच परिस्थिती आज ‘मंकीपॉक्स’बद्दल आहे का यासंदर्भात मतमतांतरे आहेत.

जागतिक साथ घोषित केल्यावर देश काय करतात?
जागतिक साथ जाहीर करण्याच्या या निर्णयामुळे सर्वच देशांना वेगाने प्रतिबंधात्मक व इतर उपाय करावे लागतील जेणेकरून या रोगाचा आणखी प्रसार होणार नाही. शाळा बंद ठेवणे, व्यक्तींमधील संपर्क टाळणे, कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगणे, पर्यटक व्हिसा रद्द करणे असे ते उपाय आहेत. यामुळे जागतिक आरोग्य संघटनेला निधी वाढवून मिळतो वगैरे गोष्टी मात्र खऱ्या नाहीत. यातून नवीन औषधे व लसी शोधण्याच्या प्रयत्नांना गती मिळते.

यापूर्वी कधी झाली होती अशी घोषणा
करोनाच्यापूर्वी २००९ मध्ये फ्लूच्या एच वन एन वन विषाणूचा प्रसार झाला त्यावेळी जागतिक साथ जाहीर करण्यात आली होती त्यावेळीही जगात हजारो लोक बळी पडले होते. पण फार गंभीर परिस्थिती नसताना जागतिक साथ जाहीर केली अशी टीका त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेवर झाली त्यामुळे करोनाच्या वेळेस त्यांनी जागतिक साथ जाहीर करण्यास विलंब लावला. यापूर्वी सिव्हीयर अक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स) या रोगाची साथ २००३ मध्ये २६ देशांमध्ये पसरली व आठ हजार लोकांना संसर्ग झाला होता पण त्यावेळी जागतिक साथ जाहीर केली नव्हती. मिड इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे एमइआरएसच्यावेळीही जागतिक साथ जाहीर केली नव्हती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monkeypox how pandemic is declared and what does it means scsg