त्वचेवर पुरळ उठणे आणि ताप ही दोन्ही लक्षणे मंकीपॉक्स आणि कांजण्यांचा संसर्ग झाल्यास दिसून येतात. या दोन्ही आजारांची लक्षणं सारखीच असल्याने अनेकांना नेमका कसला संसर्ग झाला आहे हे पटकन समजत नाही आणि त्यांचा संभ्रम होतो. सध्या मंकीपॉक्ससंदर्भातील बातम्यांच्या पार्श्वभूमीवर या संभ्रमावस्थेमुळे भीतीने अनेकांची गाळण उडतानाचेही चित्र दिसत आहे. मात्र या दोन्ही आजारांची लक्षणं सारखी असली तरी त्यामध्ये फरक असल्याचं डॉक्टर सांगतात. दोन्ही आजारांत वेगवेगळ्या प्रकारे ही लक्षणं रुग्णांमध्ये दिसून येतात असं डॉक्टर सांगतात. या पैकी कोणतीही लक्षणं दिसून आली तरी आपल्या फॅमेली डॉक्टरशी संपर्क साधावा असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.
मंकीपॉक्स झुनोसिस प्रकाराचा आजार
मंकीपॉक्स हा विषाणूजन्य झुनोसिस प्रकारातील आजार आहे. झुनोसिस म्हणजेच प्राण्यांच्या माध्यमातून मानवांला विषाणूचा संसर्ग होणारा आजार. पूर्वीच्या काळी देवी नवाच्या संसर्गजन्य रोगाच्या रुग्णामध्ये दिसून येणाऱ्या पुरळांप्रमाणेच मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्येही अंगावर मोठ्या आकाराचे पुरळ म्हणजेच फोड दिसून येतात. मात्र वैद्यकीयदृष्ट्या हा आजार देवीपेक्षा कमी घातक आहे.
लक्षणांचा क्रम महत्वाचा…
पावसाळ्यात, लोकांना व्हायरल इन्फेक्शन होण्याची अधिक शक्यता असते. याच कालावधीमध्ये कांजण्यांचा संसर्ग होण्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर आढळतात. या कालावधीत इतर संक्रमणांसह पुरळ आणि मळमळ यांसारखी लक्षणे देखील दिसून येतात, असे मेदांता हॉस्पिटलचे त्वचाविज्ञान सल्लागार डॉ. रमणजीत सिंग यांनी सांगतात. “सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काही रुग्ण गोंधळून जात असल्याचं दिसून येत आहे. अनेकजण हे कांजण्या आणि मंकीपॉक्स संसर्गाचा अगदीच चुकीचा अर्थ लावत आहेत. रुग्णाला मंकीपॉक्स आहे की नाही हे लक्षणं त्यामध्ये कशापद्धतीने आणि कोणत्या क्रमाने दिसतात यावरुन सांगता येतं,” असं सिंग म्हणाले.
दोन्ही संसर्गजन्य आजारांमधील फरक सांगताना सिंग म्हणाले की, “मंकीपॉक्सच्या संसर्गाची सुरुवात सामान्यतः ताप, अस्वस्थता, डोकेदुखी, कधीकधी घसा खवखवणे आणि खोकला आणि लिम्फॅडेनोपॅथी (सूजलेल्या लिम्फ नोड्स) यांनी होते. ही सर्व लक्षणे त्वचेवर घाव, पुरळ आणि इतर समस्यांपासून चार दिवस अगोदर दिसून येतात जी प्रामुख्याने हातातून सुरू होतात. डोळे आणि संपूर्ण शरीरात पसरतात.”
पाहा व्हिडीओ –
दोन रुग्ण मंकीपॉक्सचे वाटले मात्र…
इतर तज्ज्ञही सिंग यांच्या या मताशी सहमत असल्याचं दिसतं. त्वचेव्यतिरिक्त मंकीपॉक्सच्या बाबतीत इतर लक्षणेही प्रामुख्याने दिसून येतात. मात्र कोणत्याही प्रकारची शंका दूर करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही अधिक योग्य ठरते असंही तज्ज्ञ सांगतात. नुकत्याच नोंदवलेल्या दोन घटनांमध्ये मंकीपॉक्सची दोन संशयित प्रकरणे ही कांजण्यांचा संसर्ग झालेले रुग्ण असल्याचं निष्पन्न झालं.
गेल्या आठवड्यात दिल्लीतील एलएनजेपी हॉस्पिटलमध्ये ताप आणि जखमांसह मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णाला दाखल करण्यात आले होते. त्याची मंकीपॉक्ससंदर्भातील चाचणी नकारात्मक आली होती. त्यानंतर त्याला केवळ कांजण्या झाल्याचे निदान झाले होते. याच पद्धतीने बंगळुरूला गेलेल्या इथिओपियन नागरिकाची लक्षणे दिसल्यानंतर त्याची मंकीपॉक्ससंदर्भातील चाचणी करण्यात आली. मात्र त्याच्या अहवालातही त्याला कांजण्या झाल्याचं स्पष्ट झालं होतं. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सची चार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी तीन केरळमधील असून एक रुग्ण दिल्लीतील आहे.
मंकीपॉक्समध्ये काय होतं?
फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील इंटरनल मेडिसीन विभागाचे संचालक डॉ. सतीश कौल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मांकीपॉक्समध्ये जखमा या कांजण्यांपेक्षा मोठ्या आकाराच्या असतात. मंकीपॉक्समध्ये तळवे आणि तळव्यांच्या आजूबाजूच्या भागांवर जखमा दिसतात. कांजण्याचा संसर्ग झाल्यास जखमा या सात ते आठ दिवसांनी स्वत: नियंत्रणात येतात म्हणजेच आपोआप कमी होतात. मात्र या उलट मंकीपॉक्समध्ये होते. कांजण्यांचा संसर्ग झाल्यास जखमा या आकाराने लहान असतात. अगदी छोट्याश्या फोडीप्रमाणे पुरळ उठतं आणि त्यामुळे खाज सुटते. मंकीपॉक्समध्ये फोड्या या मोठ्या आकाराच्या असतात. या फोड्यांमुळे कांजण्यांच्या फोंड्याप्रमाणे खाज येत नाही.” मंकीपॉक्समध्ये तापाचा कालावधी जास्त असतो आणि अशा रुग्णाच्या लिम्फ नोड्स (नसांजवळ येणारी सूज) वाढत असल्याचंही कौल यांनी सांगितलं.
कांजण्या काय प्रकार…
कांजण्यांना कारणीभूत असलेल्या विषाणूबद्दल तपशीलवार बत्रा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. एस.सी.एल. गुप्ता यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “कांजण्या हा आरएनए विषाणू आहे. हा विषाणू इतका गंभीर नसतो पण त्यामुळे त्वचेवर पुरळ उठते, असं डॉ. गुप्ता सांगतात. “हा कांजण्यांचा हंगाम आहे. सहसा पावसाळ्यातील हा कालावधीत ओलसरपणा, तापमानात वाढ, पाणी साचणे, ओलावा आणि ओले कपड्यांसारख्या गोष्टींमुळे विषाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते,” असं डॉ. गुप्ता वातावरणातील बदल कशाप्रकारे कारणीभूत ठरतात याबद्दल सांगताना म्हणाले. “तसेच, कांजण्यांच्या या आजाराशी एक धार्मिक पैलूही निगडीत आहे. लोक याला ‘देवी’ प्रमाणे वागवतात, त्यामुळे आजही अनेक ठिकाणी अशा रूग्णांना कोणत्याही प्रकारची औषधे दिली जात नाहीत. त्यांना एकांतात ठेवले जाते आणि त्यांना बरं होण्यासाठी वेळ दिला जातो,” असं डॉ. गुप्ता म्हणतात.
…तर फोड्यांमध्ये पू तयार होतो
मंकीपॉक्सबद्दल बोलताना, गुप्ता यांनी स्पष्ट केले की अशा विषाणूला प्राण्यांच्या माध्यमातून संसर्ग होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. मात्र या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर घसा खवखवणे, ताप आणि सामान्यपणे कोणत्याही विषाणूच्या संसर्गामुळे होणारा त्रास इतक्या पुरतीच लक्षणं दिसून येतात. “या विषाणूच्या संसर्गाचं मुख्य लक्षण म्हणजे शरीरावर पुरळ उठणे. मात्र या फोडींच्या आतमध्ये द्रव्यं असतात. यामुळे विषाणूचा संसर्ग होतो. याच द्रव्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते. तसेच यामुळे गुंतागुंतीमुळे समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत या द्रव्याचा कोणत्याही पद्धतीच्या बॅक्टेरियाशी संपर्क आल्यास या फोड्यांमध्ये पू निर्माण होणे आणि फोड चिघळत जातात,” असं डॉक्टर सांगतात.
सध्या काय उपचार केले जातात…
“सध्या, मंकीपॉक्स संसर्ग प्राथमिक अवस्थेत आहे. यासाठी आपल्याकडे योग्य उपचार नाहीत. सध्या यावरील उपायांमध्ये केवळ आयसोलेशन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. संशयित रुग्णावर त्यांच्या लक्षणांनुसार उपचार आम्ही करत आहोत. जर घशात संसर्ग झाला असेल, तर आम्ही जेनेरिक औषधे वापरतो,” असं डॉक्टर सांगतात. पूर्वी कांजण्यांच्या संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये मंकीपॉक्सविरुद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती निर्माण होते का? असे प्रश्नही डॉक्टरांना विचारले जात आहेत. मात्र या प्रश्नाचं उत्तर नाही असं असल्याचं डॉक्टर सांगतात.
कांजण्या झाल्या तर मंकीपॉक्स होणार नाही हे चुकीचं कारण…
नवी दिल्लीतील बीएलके मॅक्स हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन विभागाचे वरिष्ठ संचालक आणि आणि प्रमुख असणारे डॉ. राजिंदर कुमार सिंघल यांनी अशाप्रकारे रोगप्रतिकारशक्ती का तयार होत नाही याबद्दल माहिती दिली. डॉ. सिंघल म्हणाले की, दोन्ही आजारांचा संसर्ग हा वेगवेगळ्या विषाणूंमुळे होतो. या दोन्ही आजारांच्या संक्रमणाची पद्धत वेगळी आहे आणि मागील संसर्ग नव्या संसर्गाविरूद्ध कोणतेही संरक्षण सुनिश्चित करत नाही, असंही डॉ. सिंघल म्हणाले. मात्र त्यावेळी ज्यांना देवीच्या रोगाविरोधात लसीकरण करण्यात आले आहे त्यांना मंकीपॉक्स होण्याची शक्यता कमी असते, असे डॉ. सिंघल ठामपणे सांगितले.
देवीची लस घेतली असेल तर संसर्गाचा धोका कमी
“जागतिक आरोग्य संघटनेने १९७९-८० च्या सुमारास या आजाराचा पूर्णपणे नायनाट केल्याचे सांगितल्यानंतर स्मॉल पॉक्स म्हणजेच देवी रोगावरील लस बंद करण्यात आली. १९८० च्या आधी जन्मलेल्या लोकांना मंकीपॉक्सची लागण होण्याची शक्यता कमी असते. देवी आणि मंकीपॉक्स हे दोन्ही एकाच पद्धतीच्या विषाणूंमुळे होतात. हे विषाणू एकच पद्धतीच्या रचनेचे असतात,” असं सिंघल यासंदर्भातील स्पष्टीकरण देताना म्हणाले. सामान्यपणे भारतामध्ये १९८० च्या आधी जन्मलेल्या सर्वांनाच देवीची लस देण्यात आली असल्याने अशा लोकांना मंकीपॉक्सच्या संसर्गाचा धोका कमी असल्याचं सांगितलं जात आहे.
अनेक देशांनी दिली ती परवानगी मात्र भारतात अजून निर्णय नाही
देवी आणि मंकीपॉक्समधील समानतेमुळे अनेक देशांनी मंकीपॉक्सच्या रुग्णांना देवीवरील लस देण्यास परवानगी दिली आहे. मात्र भारतात अद्याप अशी परवानगी देण्यात आलेली नाही. “हा विषाणू अजून त्याच्या किशोरावस्थेत आहे आणि संशोधक अजूनही त्याच्यावरील उपचारांचा शोध घेत आहेत,” असंही डॉक्टर गुप्ता म्हणाले.