The Impact of Pakistan’s Monsoon Floods on Child Marriages ग्रामीण पाकिस्तानातील पालक आपल्या किशोरवयीन मुलींना गरिबीपासून वाचवण्यासाठी त्यांच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या पुरुषांशी त्यांचे लग्न लावून देत आहेत. पाकिस्तानमध्ये २०२२ साली आलेल्या पुरामुळे अनेकजण बेघर झाले. हातात असलेल्या शेतीचे नुकसान झाले, त्यामुळे अशा प्रकारच्या ट्रेंडमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: चीनमधील ‘प्रेग्नेंट कार’चे Videos व्हायरल; ‘मेड-इन-चायना कार गर्भवती का होत आहेत? नेमकं प्रकरणं काय आहे?

‘मान्सून ब्राइड्स’चा नवीन ट्रेंड

“माझं लग्न होत आहे, हे ऐकून मला आनंद झाला होता… मला वाटलं माझं आयुष्य आणखी सोपं होईल,” असं शमिलाने एएफपीला सांगितलं. अधिक समृद्ध आयुष्याच्या आशेने तिने तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या पुरुषाशी लग्न केलं. ती पुढे म्हणाली, माझ्याकडे आणखी काहीही नाही. जे काही आहे ते पावसामुळे कमी होईल अशी भीती वाटत आहे. अशीच भीती आणि परिस्थिती इतर मुलींचीही आहे. सिंधच्या कृषी पट्ट्यातील अनेक गावे २०२२ साली आलेल्या पुरातून अजूनही सावरलेली नाहीत. या पुरात देशाचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेला, लाखो लोक बेघर झाले आणि पिकांची नासाडी झाली. बालविवाह रोखण्यासाठी धार्मिक विषयाच्या जाणकारांबरोबर काम करणाऱ्या ‘सुजाग संसार’ या एनजीओचे संस्थापक माशूक बिरहमानी म्हणाले, यामुळे ‘मान्सून ब्राइड्स’चा एक नवीन ट्रेंड आला आहे. पुरात नुकसान झालेल्या कुटुंबांसाठी पहिला आणि सर्वात सोपा मार्ग म्हणजे पैशाच्या बदल्यात मुलींचे लग्न लावून देणे. बिरहमानी म्हणाले की, २०२२ च्या पुरानंतर, दादू जिल्ह्यातील खेड्यांमध्ये बालविवाह करण्याचा प्रघात वाढला आहे. हा भाग सर्वात प्रभावित क्षेत्रांपैकी एक आहे. कित्येक महिन्यानंतरही हा भाग तलावासारखा दिसत आहे. खान मोहम्मद मल्लाह गावात शमिला आणि अमिना यांचा जूनमध्ये एका संयुक्त समारंभात विवाह झाला होता. गेल्या पावसाळ्यापासून ४५ अल्पवयीन मुलींचे विवाह झाले आहेत. “२०२२ च्या पावसापूर्वी, आमच्या भागात मुलींची लग्ने इतक्या लहान वयात करण्याची गरज भासत नव्हती,” गावातील वृद्ध माई हजानी (वय ६५) म्हणाल्या. याशिवाय इतर पालकांनी एएफपीला सांगितले की, त्यांनी त्यांच्या मुलींची लग्ने पैसे घेऊन त्यांना गरिबीपासून वाचवण्यासाठीच केली आहेत. शमिलाच्या सासूबाई, बीबी सचल यांनी सांगितले की, त्यांनी तरुण वधूच्या पालकांना दोन लाख पाकिस्तानी रुपये (७२० डॉलर्स) दिले. या भागातील बहुतेक कुटुंबे दररोज फक्त एका डॉलरवर उदरनिर्वाह करतात, त्यांच्यासाठी ही रक्कम मोठी आहे.

‘मला वाटलं लिपस्टिक मिळेल’

२०२२ साली १४ व्या वर्षी लग्न झाल्यावर नजमा अली सुरुवातीला पत्नी होण्याच्या उत्साहात बागडत होती. पाकिस्तानमधील परंपरेप्रमाणे विवाह झाल्यावर ती तिच्या सासरच्यांबरोबर राहू लागली. “माझ्या पतीने माझ्या आई-वडिलांना आमच्या लग्नासाठी अडीच लाख रुपये दिले होते. परंतु ते पैसे इतरांकडून कर्जावर होते आणि त्याची परतफेड करायला कुठलाही दुसरा मार्ग नाही, असं ती म्हणाली. “मला वाटले की, मला लिपस्टिक, मेकअप, कपडे आणि क्रॉकरी मिळेल,” तिच्या हातात सहा महिन्याचे बाळ होते. ती पुढे म्हणाली “आता मी, पती आणि बाळासह घरी (माहेरी) आले आहे कारण आमच्याकडे खायला काहीच नाही.” मुख्य नारा खोऱ्यातील कालव्याच्या काठावर वसलेले त्यांचे गाव ओसाड आहे आणि प्रदूषित पाण्यात एकही मासा शिल्लक नाही, परिसरात संपूर्ण दुर्गंधी पसरलेली आहे. गावातील ५८ वर्षीय हकीम झाडी म्हणाल्या, ‘आमच्याकडे हिरवीगार भातशेती होती जिथे मुली काम करायच्या, बऱ्याच भाज्या पिकत होत्या. जमिनीतील विषारी पाण्यामुळे आता सगळं संपलं आहे. “त्यापूर्वी मुली आमच्यावर ओझं नव्हत्या. ज्या वयात मुलींची लग्ने व्हायची, त्या वयात त्यांना आता पाच मुलं आहेत आणि त्यांचे पती बेकार असल्यामुळे त्या आपल्या आईवडिलांबरोबर राहायला परत येत आहेत.”

बालविवाहाच्या प्रमाणात १८ टक्क्यांनी वाढ

डिसेंबरमध्ये प्रकाशित झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तानच्या काही भागांमध्ये बालविवाह ही नेहमीचीच सामान्य बाब आहे. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विवाहासाठी कायदेशीर वय १६ ते १८ पर्यंत बदलते, परंतु कायद्याची क्वचितच अंमलबजावणी केली जाते. पाकिस्तानमध्ये युनिसेफने बालविवाह कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु पुरावे असे दाखवतात की, अत्यंत बिकट हवामानामुळे मुलींना धोका निर्माण झाला आहे. २०२२ च्या पुरानंतर एका अहवालात म्हटले आहे की, बालविवाहाच्या प्रमाणात १८ टक्क्यांनी वाढ झाली. ज्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये युनिसेफने केलेल्या कामाला धक्का बसला आहे.

अधिक वाचा:‘सुपारीबाज’ या शब्दावरून राज ठाकरेंच्या दौऱ्यात गोंधळ पण सुपारी देणं ते अंडरवर्ल्ड; या शब्दाचा प्रवास नेमका कसा झाला?

१० वर्षांची मेहताब..’मला अभ्यास करायचा आहे’

३१ वर्षीय दिलदार अली शेख यांनी आपली मोठी मुलगी मेहताब हिचे लग्न पुरामुळे बेघर झाल्यानंतर मदत छावणीत राहत असतानाच ठरवले होते. “जेव्हा मी तिथे होतो, तेव्हा मी स्वतः विचार केला की ‘आपण मुलीचे लग्न केले पाहिजे जेणेकरून ती तरी किमान चांगल्या परिस्थितीत राहू शकेल.’मेहताब ही १० वर्षांची होती तेंव्हा तिचं लग्न ठरलं. तिची आई, सुंबल अली शेख म्हणाल्या, “ज्या रात्री मी तिचे लग्न करण्याचा निर्णय घेतला, त्या रात्री मला झोपच येत नव्हती.” सुंबल अली शेख यांचे स्वतःचे लग्न वयाच्या १८ व्या वर्षी झाले होते. सुजाग संसार या स्वयंसेवी संस्थेच्या हस्तक्षेपामुळे मेहताबचे लग्न पुढे ढकलण्यात आले आणि मेहताबला शिवणकामाच्या कार्यशाळेत दाखल करण्यात आले, ज्यामुळे तिला तिचे शिक्षण सुरू ठेवत थोडे उत्पन्न मिळू शकले. पण मान्सूनचा पाऊस पडला की, तिचे वचन दिलेले लग्नही होईल या भीतीने मेहताब घाबरते. ती म्हणाली, ‘मी माझ्या वडिलांना सांगितले आहे की, मला अभ्यास करायचा आहे.’ मला माझ्या आजूबाजूला विवाहित मुली दिसतात ज्यांचे जीवन खूप आव्हानात्मक आहे आणि मला हे स्वतःसाठी नको आहे.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon brides how floods in pakistan are driving an increase in child marriages svs