यंदाच्या पावसाळ्यात देशात सरासरीच्या १०८ टक्के पाऊस पडला. देशाच्या विविध भागांत किती पर्जन्यवृष्टी झाली, जागतिक हवामान विषयक प्रणालींचा पर्जन्यवृष्टीवर काय परिणाम झाला, त्याविषयी…

पर्जन्यवृष्टी किती आणि कशी झाली?

देशात एक जून ते ३० सप्टेंबर या काळाला पावसाळा संबोधले जाते. साधारण एक जून रोजी केरळमध्ये पाऊस दाखल होतो. यंदा एक दिवस अगोदर ३० मे रोजीच केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल झाला होता. साधारण आठ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात. यंदा सहा दिवस अगोदरच, दोन जुलै रोजी मोसमी वाऱ्यांनी सर्व देश व्यापला होता. पावसाळ्याच्या चार महिन्यांत देशात सरासरी ८६८.६ मिमी पाऊस पडतो, यंदा सरासरीपेक्षा ७.६ टक्के अधिक ९३४.८ मिमी पाऊस पडला आहे. उत्तर भारतात सरासरीपेक्षा सात टक्के अधिक ६२८.६ मिमी पाऊस पडला. ईशान्य भारतात उणे १३.८ टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी – ११७८.७ मिमी एवढा पाऊस पडला. मध्य भारतात सरासरीपेक्षा १९.५ टक्के जास्त, म्हणजे ११६८.५ मिमी पाऊस पडला. दक्षिण भारतात सरासरीच्या १३.९ टक्के अधिक ८१५.५ मिमी इतका पाऊस पडला आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा देशात १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. प्रत्यक्षात १०७.६ टक्के पाऊस पडला. त्यामुळे हवामान विभागाने आपला अंदाज खरा ठरल्याचा दावा केला आहे.

आणखी वाचा-परदेशस्थ भारतीयांना देशाशी जोडणारे OCI कार्ड काय आहे? ओसीआय कार्डधारकांना कोणते विशेषाधिकार असतात?

जुलै-ऑगस्टमध्ये किती पाऊस बरसला?

पावसाळा चार महिन्यांचा असला, तरीही मोसमी वारे देशात दाखल होऊन संपूर्ण देश व्यापण्यासाठी जुलै महिना उजाडतो आणि सप्टेंबर मध्यापासून म्हणजे साधारण १७ सप्टेंबरपासून माघारी फिरतो. त्यामुळे जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने पावसाळ्यातील प्रमुख महिने ठरतात. साहजिकच या दोन महिन्यांतील पाऊस महत्त्वाचा ठरतो. एकूण देशाचा विचार करता जून महिन्यात सरासरीपेक्षा १०.९ टक्के कमी, १४७.२ मिमी पाऊस पडला. जुलैमध्ये ९ टक्के जास्त, ३०५.८ मिमी पाऊस पडला. ऑगस्टमध्ये १५.३ टक्के जास्त, २९३.९ मिमी पाऊस पडला. सप्टेंबरमध्ये ११.६ टक्के अधिक १८७.३ मिमी पाऊस पडला. साधारणपणे २६ जून ते ७ जुलै, ११ ते २७ जुलै, १ ते ८ ऑगस्ट, २० ऑगस्ट ते १ सप्टेंबर, ९ ते १३ सप्टेंबर आणि २४ ते २६ सप्टेंबर या काळात देशभरात पावसाचा जोर जास्त होता. या काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात तीन ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. त्यांपैकी दोन क्षेत्रांचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले. परिणामी, देशभरात चांगला पाऊस झाला.

अतिपावसाच्या घटना का वाढल्या?

पावसाळ्याच्या चार महिन्यांत मुसळधार पावसाच्या (२४ तासांत ११५.६ ते २०४.५ मिमी) एकूण ५२५ घटना घडल्या, तर अति मुसळधार पावसाच्या (२४ तासांत २०४.५ मिमीपेक्षा जास्त) ९६ घटना घडल्या. मुसळधार आणि अति मुसळधार पावसाच्या घटना गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत जास्त घडल्या आहेत. राज्यनिहाय विचार करता केरळमध्ये मुसळधार आणि पूरस्थितीच्या सर्वाधिक ३९७ घटना घडल्या. त्या खालोखाल आसाममध्ये १०२, मध्य प्रदेशात १०० आणि महाराष्ट्रात ३३ घटना घडल्या आहेत. पावसाळ्यातही उष्णतेच्या लाटेचा फटका झारखंडला बसला. एकूण १३ वेळा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला. त्या खालोखाल राजस्थानला चार वेळा उष्णतेच्या लाटेचा फटका बसला. महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटाच्या सर्वाधिक १८९, तर उत्तर प्रदेशात १३८ घटना घडल्या.

आणखी वाचा-इस्रायलच्या ‘आयर्न डोम’समोर इराणचा संहारक हवाई हल्लाही निष्प्रभ! कसं काम करतं हे सुरक्षा कवच?

एल निनो, ला निना प्रभावहीन?

मोसमी पावसाच्या सुरुवातीच्या काळात प्रशांत महासागरात एल निनो स्थिती सक्रिय होती. त्याचा जून-जुलैमधील पावसावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात तसे घडले नाही. जून, जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. जुलैअखेरीस प्रशांत महासागरातील एल निनो पूर्णपणे निष्क्रिय झाला होता. सध्या तो तटस्थ अवस्थेत आहे. भारतीय हवामान विभागासह जगभरातील हवामानविषयक संस्था ऑगस्टअखेरीस ला निना स्थिती निर्माण होण्यास सुरुवात होईल, असे अंदाज व्यक्त करीत होते. प्रत्यक्षात अद्यापपर्यंत ला निना स्थिती निर्माण झाली नाही. तरीही देशात अत्यंत समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली आहे. हिंदी महासागरातील द्विध्रुविता (आयओडी) पावसाळ्यात सक्रिय होण्याची शक्यता होती. पण, सप्टेंबरअखेर आयओडीही तटस्थ आहे. म्हणजेच एल निनो सक्रिय असताना, एल निनो निष्क्रिय झाला असताना आणि ला निनाची स्थिती आणि आयओडी सक्रिय झाला नसतानाही देशात चांगले पाऊसमान राहिले.

महाराष्ट्रासाठी यंदाचा पावसाळा कसा?

राज्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा २६ टक्के जास्त पाऊस झाला आहे. पावसाळ्यात राज्यात सरासरी ९९४.५ मिमी पाऊस पडतो. मात्र, यंदा १२५२.१ मिमी पाऊस पडला आहे. कोकण विभागात २९ टक्के अधिक पाऊस पडला आहे. सरासरी २८७०.८ मिमी पाऊस पडतो, यंदा ३७१०.६ मिमी पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रात ३९ टक्के अधिक पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरी ७४७.४ मिमी पाऊस पडतो, यंदा १०३५.८ मिमी पाऊस पडला आहे. मराठवाड्यात २० टक्के अधिक पाऊस पडला आहे. सरासरी ६४२.८ मिमी पाऊस पडतो, ७७२.५ मिमी पाऊस पडला आहे. विदर्भात १७ टक्के अधिक पाऊस पडला आहे. सरासरी ९३७.३ मिमी पाऊस पडतो, यंदा १०९८.५ मिमी पाऊस पडला आहे. राज्यातील सात जिल्ह्यांत सरासरीपेक्षा ४० टक्क्यांहून जास्त पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक ४९ टक्के (६७८ मिमी) पाऊस नगर जिल्ह्यात झाला. नगरसह सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, नंदूरबार, नाशिक, पुणे आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा ४० टक्क्यांहून अधिक पाऊस पडला आहे. सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असला, तरीही हिंगोलीत सरासरीपेक्षा ३५ टक्के कमी पाऊस झाला आहे. हिंगोलीत सरासरी ७५८.३ मिमी पाऊस पडतो, यंदा ४८९.९ मिमी पाऊस पडला. अमरावतीत सरासरीपेक्षा दोन टक्के कमी पाऊस झाला. हिंगोली आणि अमरावतीचा अपवाद सोडला, तर राज्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला आहे.

dattatray.jadhav@indianexpress.com