नैर्ऋत्य मोसमी पाऊस राज्यासह देशातून १५ ऑक्टोबर रोजी माघारी फिरला आहे. तरीही राज्यातील विविध भागांसह दक्षिणेत का पाऊस पडतोय याविषयी….

नैर्ऋत्य मोसमी पाऊस माघारी म्हणजे काय?

नैर्ऋत्य मोसमी पाऊस किंवा वारे मूळ उगमापासून म्हणजे वि्षुववृत्तावरील दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील पेरू, कोलंबिया, इक्वेडोर या देशांपासून समुद्रावरून अंदाजे १९,००० किलोमीटर अंतर कापून देशाच्या दक्षिणेकडील टोकावर म्हणजे केरळमध्ये हजेरी लावतात. समुद्रावरून येणारे वारे आपल्यासोबत प्रचंड बाष्प घेऊन येतात. आपल्याकडे चार महिने बाष्पयुक्त वारे नैर्ऋत्य दिशेकडून ईशान्येकडे वाहतात. या वाऱ्यापासून देशात सर्वदूर पाऊस पडतो. अधून-मधून बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे देशाच्या भूभागावर येत असल्यामुळे पावसात सातत्य राहते. या चार महिन्यांत सातत्याने अरबी समुद्रात आणि तुलनेने जास्त बंगालच्या उपसागरात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण होते. त्यामुळे कमी दाबाचे आणि तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पावसाचे प्रमाण वाढते. कमी दाबाचे क्षेत्र तयार न झाल्यास पर्जन्यवृष्टी कमी होते. ही मोसमी पावसाच्या माघारीची प्रक्रिया दक्षिण राजस्थान आणि गुजरातच्या कच्छमधून साधारणपणे १७ सप्टेंबरपासून सुरू होते आणि महाराष्ट्रासह देशातून म्हणजे दक्षिण भारत वगळता देशाच्या सर्व भागातून हा पाऊस १५ ऑक्टोबर रोजी माघारी जातो. मोसमी पाऊस माघारी गेल्यानंतर हवेतील आर्द्रता कमी होऊन पर्जन्यमान अचानक कमी होते, तापमानात वाढ होते.

Maharashtra rain updates
Maharashtra Rain News: दक्षिण महाराष्ट्राला बिगर मोसमी पावसाचा फटका, आणखी दोन दिवस पावसाचा जोर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले
Air quality deteriorated in Colaba Deonar Kandivali Mumbai news
कुलाबा, देवनार, कांदिवलीमधील हवा ‘वाईट’

हेही वाचा >>> Diabetes ‘Smart’ Insulin:मधुमेहाच्या रुग्णांसाठी आता ‘स्मार्ट’ इन्सुलिन; काय सांगते नवीन संशोधन?

राज्यात ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस?

राज्यासह देशातून नैर्ऋत्य मोसमी पाऊस माघारी जातो आणि दक्षिणेत ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय होतो. यंदाही हवामान विभागाने देशातून १५ ऑक्टोबर रोजी नैर्ऋत्य मोसमी पाऊस माघारी गेल्याचा आणि ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय झाल्याचे जाहीर केले होते. या ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून प्रामुख्याने दक्षिण कर्नाटक, दक्षिण तेलंगणासह आंध्र प्रदेश, केरळ आणि तमिळनाडून जोरदार पाऊस पडत असतो. या पावसाच्या जोरावरच दक्षिणेत उन्हाळी भातासह अन्य पिके घेतली जातात. रब्बी हंगामातील पिकांनाही हा पाऊस पूरक असतो. ईशान्य मोसमी वाऱ्यांचा वेग जास्त असेल तर हे वारे दक्षिण महाराष्ट्रापर्यंत पोहचतात. त्यामुळे सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात पाऊस पडतो. अनेकदा ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे राज्याच्या दक्षिणेकडील भागात बाष्पाचे प्रमाण वाढते. स्थानिक पातळीवर तापमान वाढून दुपारनंतर मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. सध्या सांगली, कोल्हापूर, सोलापूरच्या काही भागात याच प्रकारे पाऊस पडतो आहे. राज्यात पुढील तीन महिने होणाऱ्या पावसाला ईशान्य मोसमी पाऊस किंवा हिवाळी पाऊस असेही संबोधले जाते.

मग किनारपट्टीवर पावसाचा जोर का?

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राने तमिळनाडूनच्या किनारपट्टीवर धडक दिली. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे या तीव्र कमी दाबाच्या प्रणालीचा काही भाग तमिळनाडू आणि केरळवरून पुढे वाटचाल करून अरबी समुद्रात दाखल झाला, त्यामुळे मध्य अरबी समुद्रात वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे किनारपट्टीवर बाष्षयुक्त वारे वेगाने येत आहेत. शिवाय स्थानिक पातळीवर तापमान सरासरी ३० ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान असल्यामुळे किनारपट्टीवर प्रामुख्याने दक्षिण कोकणात जोरदार पाऊस होत आहे. मध्य अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीची वाटचाल वायव्य दिशेने होत असल्यामुळे दोन दिवसांत कोकणातील पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे. याशिवाय बंगालच्या उपसागरात २२ ऑक्टोबर रोजी आणखी एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. त्याची वाटचाल ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पूर्व विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : रायगड जिल्हा बनलाय बेवारस मृतदेहांचे ‘डम्पिंग ग्राउंड’? कारणे काय? पोलिसांसमोर कोणती आव्हाने?

हिंद महासागरीय द्विध्रुवितेचा परिणाम काय?

हिंद महासागरीय द्विध्रुविता म्हणजेच ‘आयओडी’चा परिणाम (इंडियन ओशन डायपोल) सध्याच्या पावसावर दिसून येत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला आयओडी धन होता म्हणजे सक्रिय होता. परंतु संपूर्ण पावसाळ्यात हंगामात तो तटस्थच राहिला. त्यामुळे पावसावर विपरीत परिणाम झाला नाही. अद्यापही तो तटस्थच आहे. परंतु ऑक्टोबर ते डिसेंबर या ईशान्य मोसमी पावसाच्या काळात दक्षिणेकडील चार राज्यात चांगला पाऊस होण्यासाठी आयओडी ऋण होणे गरजेचे असते. म्हणजेच बंगाल उपसागराचे तापमान हे अरबी समुद्राच्या तापमानापेक्षा अधिक असावयास हवे. यामुळे दक्षिणेकडील चार राज्यांत येत्या तीन महिन्यांत म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये पडणाऱ्या पावसाला पोषक स्थिती असेल. ईशान्य मोसमी वाऱ्याचा वेग जास्त राहिल्यामुळे आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे राज्याच्या दक्षिण भागात बाष्पयुक्त वारे येत आहेत.

हवामान विभागाचा अंदाज काय होता?

भारतीय हवामान विभागाने ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. म्हणजे राज्यात सरासरी ३० ते ४० मिलीमीटर पाऊस पडतो, त्या तुलनेत जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रामुख्याने किनारपट्टी आणि दक्षिण – मध्य महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूर, सांगली, सोलापुरात पावसाची शक्यता जास्त आहे. त्यासह साधारण १५ ऑक्टोबरनंतर राज्याला ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागतो. तापमान साधारण ३० ते ३४ अंशांच्या दरम्यान राहते. तापमान वाढल्यामुळे जमिनीचा पृष्ठभाग तापून जमिनीने शोषलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन या उबदार, दमट पाण्याच्या वाफेचे अवकाशात ऊर्ध्वगमन होते. उंच ढगांची निर्मिती होते. आकाशातील वरच्या स्तरातील थंडाव्यातून, पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होऊन फक्त त्या मर्यादित क्षेत्रातच पाऊस पडतो. हाच वातावरणातील संवहनी क्रियेद्वारे पडणारा पाऊस होय. अशाच प्रकारे राज्याच्या विविध भागात स्थानिक पातळीवर पाऊस पडतो आहे, मात्र, या पावसाची व्याप्ती (क्षेत्र) फार मोठी नसते. कमी काळात जोरदार पाऊस होऊन पाणीपाणी होते. हा पाऊस खरिपातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान करतो आणि रब्बी हंगामाच्या पूर्व तयारीला अडथळा निर्माण करतो. पण, ज्या भागात हा पाऊस पडतो, त्या भागात रब्बी हंगामातील पिकांसाठी पाण्याची सोय होते. यंदा दिवाळीपर्यंत कमी-अधिक पाऊस पडत राहण्याचा अंदाज आहे.

dattatray.jadhav@expressindia.com