भारतातील अतिश्रीमंत व्यक्ती देश सोडून इतर देशांमध्ये स्थलांतरित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. केवळ गेल्या दोन वर्षांत १० हजारांहून अधिक अतिश्रीमंतांनी भारत सोडून दुसरा देश आपलासा केला. चालू वर्षात भारतातील ४ हजार ३०० अतिश्रीमंत देश सोडून दुसऱ्या देशात जातील, असा अंदाज हेन्ली प्रायव्हेट वेल्थ मॅनेजमेंटच्या अहवालात वर्तविण्यात आला आहे. गेल्या वर्षी ५ हजार १०० अतिश्रीमंत भारत सोडून परदेशात गेले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या कमी राहण्याची शक्यता आहे. असे असले तरी श्रीमंत व्यक्ती देश सोडून जाणाऱ्या देशांमध्ये जागतिक पातळीवर भारत आघाडीवर असून, यामुळे देशातील पैसाही परदेशात जात आहे.

नेमकी स्थिती काय?

भारतातील सुमारे १ लाख ४२ हजार अतिश्रीमंत व्यक्ती चालू वर्षात परदेशात गुंतवणुकीची संधी शोधतील, असा अंदाज आहे. किमान १० लाख डॉलर (सुमारे साठेआठ कोटी रुपये) अथवा त्यापेक्षा गुंतवणूकयोग्य तरल संपत्ती असलेले हे नागरिक आहेत. यातून देशातून होणारे संपत्तीचे अभूतपूर्व स्थलांतर प्रकर्षाने समोर येत आहे. याचबरोबर अतिश्रीमंत व्यक्तींची आर्थिक ध्येयधोरणेही यातून स्पष्ट होत आहेत. अतिश्रीमंत व्यक्तींना आता संपत्ती निर्मितीसाठी परदेश खुणावू लागल्याचे दिसून येत आहे.

कोणत्या देशांना पसंती?

अतिश्रीमंतांकडून अमेरिका, पोर्तुगाल आणि संयुक्त अरब अमिराती या देशांना सर्वाधिक पसंती दिली जात आहे. या देशांमध्ये नागरिकत्वाचे आकर्षक पर्याय तेथील सरकार गुंतवणूकदारांना देते. यामुळे भारतातील श्रीमंत व्यक्ती तिथे गुंतवणूक करून तेथील नागरिकत्व स्वीकारतात. या देशांमध्ये आर्थिक संधी असून, तेथील जीवनमानाचा दर्जाची चांगला आहे. अनेक श्रीमंत व्यक्तींची मुले शिकण्यासाठी परदेशात जातात. आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठीही अनेक श्रीमंत व्यक्ती तेथील नागरिकत्व स्वीकारतात. हे देश गुंतवणुकीसह गुंतवणूकरादारांचे स्वागत करतात. गुंतवणूकदारांच्या येण्यामुळे देशातील भांडवलाचा ओघ वाढण्यासह अर्थव्यवस्थेच्या वाढीस चालना मिळते.

कारणे कोणती?

अतिश्रीमंत व्यक्ती देश सोडण्यामागे भूराजकीय तणाव, आर्थिक अस्थैर्य आणि सामाजिक अशांतता ही प्रमुख कारणे आहेत. असे असले तरी परदेशातील जीवनमानाचा उच्च दर्जा ही या व्यक्तींसाठी सर्वांत महत्त्वाची बाब ठरत आहे. परदेशांत जीवनमान भारतापेक्षा अधिक चांगले आहे. याचबरोबर सुरक्षित वातावरण, उच्च दर्जाचे शिक्षण आणि आरोग्य सुविधा हेही घटक त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरत आहे. अमेरिका, पोर्तुगाल आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये नेमके असेच वातावरण आहे. याचवेळी गुंतवणुकीच्या आकर्षक संधीही हे देश उपलब्ध करून देत आहेत.

परिणाम काय?

एखादी अतिश्रीमंत व्यक्ती आपला देश सोडून आर्थिक संधीसाठी दुसऱ्या देशात स्थलांतरित होते, एवढ्यापुरते हे मर्यादित राहात नाही. देशातील श्रीमंत व्यक्ती देशाच्या कर महसुलात मोठे योगदान देण्यासह अर्थव्यवस्थेलाही हातभार लावत असतात. सर्वसामान्य करदात्यांपेक्षा त्यांचा प्राप्तिकरात अधिक वाटा असतो. गेल्या दोन वर्षांत भारतातील १० हजारांहून अधिक अतिश्रीमंत इतर देशांमध्ये गुंतवणूक करून तिथे स्थलांतरित झाले आहेत. त्यांना प्रामुख्याने दुसऱ्या देशांतील आर्थिक संधी खुणावत असल्याचेही दिसून येत आहे. ते परदेशात जाण्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे.

इतर देशांना काय फायदा?

अतिश्रीमंत व्यक्ती हे भारत सोडून एखाद्या देशात स्थलांतरित होताना तिथे त्यांची संपत्ती घेऊन जातात. हे स्थलांतरित श्रीमंत त्या देशांसाठी परकीय चलनाचा मोठा स्रोत ठरतात. या व्यक्तींमधील सुमारे २० टक्के स्वयंउद्योजक आणि व्यवसायांचे मालक असतात. त्या देशात ते नवीन व्यवसाय सुरू करतात. त्यातून त्या देशात स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती होते. हे अतिश्रीमंत एकप्रकारे त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला वाढविण्याचे काम तिथे जाऊन करतात.

जगभरात काय स्थिती?

जगात सर्वाधिक अतिश्रीमंत देश सोडून जाण्यामध्ये चीनचा पहिला क्रमांक लागतो. गेल्या वर्षी चीनमधून १५ हजार २०० अतिश्रीमंत देश सोडून परदेशात गेले. त्याआधी २०२३ मध्ये ही संख्या १३ हजार ८०० होती. त्यानंतर ब्रिटन दुसऱ्या स्थानी असून, भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण कोरियातूनही मोठ्या प्रमाणात अतिश्रीमंत बाहेर पडत आहेत. युक्रेन युद्धानंतर रशियातून मोठ्या प्रमाणात अतिश्रीमंत बाहेर पडले होते. आता त्यांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. या निमित्ताने जगभरातील अतिश्रीमंत चांगल्या भविष्यासाठी योग्य देश शोधून तिथे स्थलांतरित होत असल्याची बाब प्रकर्षाने समोर येत आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

Story img Loader