दिल्लीत जंतरमंतर येथे एक महिन्यापासून अधिक काळ आंदोलन करीत असलेल्या कुस्तीपटूंना रविवारी (दि. २८ मे) पोलिसांकडून अटक करण्यात आली. या वेळी कुस्तीपटू विनेश फोगाट आणि संगीता फोगाट यांचा एक मॉर्फ केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. ज्यामध्ये अटक केल्यानंतर पोलिसांच्या गाडीत या महिला खेळाडू हसताना दिसत होत्या. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर कुस्तीपटूंनी यावर नाराजी व्यक्त केली. कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी हा फोटो व्हायरल करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. ट्वीट करत पुनिया म्हणाले की, आयटी सेलकडून खोटे फोटो पसरविण्यात येत आहेत. ज्यांनी कुणी असे फोटो पोस्ट केले आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल करणार आहोत. ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया यांनी या ट्वीटसोबत विनेश आणि संगीता फोगाट यांचा खरा फोटोही ट्वीट केला आहे. ज्यामध्ये त्या दोघीही हास्य करताना दिसत नाहीत. रविवारी कुस्तीगिरांनी जंतरमंतर येथून नव्या संसद भवनाच्या दिशेने कूच केल्यानंतर पोलिसांनी सर्व कुस्तीगिरांना ताब्यात घेतले. त्यानंतर दोन्ही कुस्तीपटूंचा मॉर्फ केलेला फोटो व्हायरल झाला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा