इंद्रायणी नार्वेकर
मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार महापालिकेने या कामासाठी तयारी सुरू केली आहे. कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वी झाला याची उदाहरणे फार कमी आहेत. त्यामुळे पालिकेचा हा प्रयोग यशस्वी होतो का याबाबत उत्सुकता आहे. यापूर्वीचे प्रयोग फसले होते आणि पैसेही वाया गेले होते. आता पुन्हा कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा घाट पालिकेने घातला असून नुकतेच स्वारस्य अर्ज मागवले आहेत.
हिवाळ्यात कृत्रिम पाऊस कशासाठी?
ऑक्टोबर महिन्यापासून मुंबईतील हवेचा स्तर बिघडला होता. त्यामुळे पालिकेने प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सर्व घटकांवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर केली होती. तसेच रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी पाणी फवारण्यास सुरुवात केली. तसेच बांधकामाच्या ठिकाणी पाणी फवारणारी यंत्रणा बसवणेही बंधनकारक केले आहे. प्रदूषण वाढलेले असताना नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या पावसामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले व हवेचा स्तर सुधारला होता. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी मुंबईत हिवाळ्यात पाऊस पाडण्याचा पालिकेचा विचार आहे.
आणखी वाचा- विश्लेषण : भाजप आक्रमक… शिंदेसेनाही आक्रमक… मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात संघर्षाची ठिणगी?
यापूर्वी प्रयोग कधी झाले होते?
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात कमी पाऊस पडल्यामुळे पालिकेने २००९ मध्ये व नंतर २०१४ मध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग धरणक्षेत्रात केला होता. मात्र हे दोन्ही प्रयोग फसले होते. तसेच मुंबईव्यतिरिक्त यापूर्वी महाराष्ट्रात विविध ठिकाणी, कर्नाटकात व आंध्र प्रदेशात कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले आहेत. मात्र हे प्रयोग यशस्वी झाले नाहीत.
कृत्रिम पाऊस कसा पाडतात?
वेगवेगळी रसायने वापरून नैसर्गिकरित्या पडणाऱ्या पावसाची प्रक्रिया उत्तेजित केली जाते. या प्रक्रियेत विशिष्ट रसायने विमान किंवा रॉकेट वापरून ढगांवर फवारली जातात. मात्र त्याकरीता पाण्याने भरलेल्या ढगांची व पावसासाठी पोषक वातावरणाची गरज असते. मात्र हिवाळ्यात असे ढग मुंबई आणि आसपासच्या भागात मिळणे दुर्मीळ आहे. त्यामुळे हा प्रयोग किती यशस्वी होईल याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
प्रयोग यशस्वी होण्यासाठी काय करणार?
यापूर्वी पालिकेने केलेले कृत्रिम पावसाचे प्रयोग फसल्यामुळे यावेळी पालिकेने आधी इच्छुक संस्थांकडून स्वारस्य पत्रे मागवली आहेत. त्या कंपन्यांची संपूर्ण माहिती मागवली जाणार आहे. कंपन्यांची वार्षिक उलाढाल किती, कंपनीने गेल्या काही वर्षात कुठे कृत्रिम पावसाचे प्रयोग केले, त्यापैकी किती यशस्वी झाले त्याची माहिती मागवण्यात आली आहे. त्यानंतर निविदा काढून तीन वर्षासाठी करार केला जाणार आहे. निविदा प्रक्रियेत पात्र ठरणाऱ्या संस्थेशी करार केल्यानंतर पाऊस पाडण्याच्या प्रक्रियेचे दरपत्रक ठरवण्यात येणार आहे. जेव्हा पावसासाठी पोषक वातावरण असेल तेव्हाच हवेत विमान उडवले जाणार असून किती वेळा उड्डाण केले त्यानुसार त्याचे पैसे आकारले जाणार आहेत.
आणखी वाचा-विश्लेषण : सरळसेवा भरती ‘एमपीएससी’मार्फत कधी होणार?
प्रयोग यशस्वी होण्याची खात्री किती?
कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची खात्री देणारी कोणतीही सांख्यिकी उपलब्ध नाही, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रयोग मुंबईत केला तरी पाऊस पडेल याची खात्री नाही, हा केवळ प्रयोगच आहे. पाऊस पडला तरी तो मुंबईत पडेल याचीही खात्री देता येत नाही, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दुबईमध्ये याप्रकारचे प्रयोग वारंवार होतात. त्यामुळे दुबईतील काही संस्थांकडूनही माहिती घेतली जाणार आहे.
या प्रयोगासाठी खर्च किती?
या एका प्रयोगासाठी एकावेळी ४० ते ५० लाख रुपये अशी ढोबळ अंदाजित रक्कम आहे. ही रक्कम तुलनेने कमी असल्यामुळे हा प्रयोग करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. या प्रयोगामुळे पाऊस पडला तर पुढचे किमान सात-आठ दिवस हवेचा दर्जा चांगला राहील. त्यामुळे दररोज प्रयोग करावा लागणार नाही. तर आठ दहा दिवसांनी त्याची गरज भासेल. निविदेत तशा अटी समाविष्ट करण्यात येणार असून त्यामुळे खर्चावर नियंत्रणही राहील, असा दावा सध्या केला जात आहे.