Mothers day 2023 जगातील प्रत्येक संस्कृतीत आईचे स्थान अनन्यसाधारण आहे. आई ही सतत आपल्या पिल्लासाठी राबत असते. म्हणूनच जागतिक ‘मदर्स डे’ च्या निमित्ताने तिचा गौरव करण्याची प्रथा सुरू झाली. या दिवशी केवळ तिचा गौरव करून तिच्या श्रमाचे पारणे फिटणारे नसले तरी या अशा एखाद्या प्रसंगी तिचा झालेला कौतुक सोहळा नक्कीच तिला सुखावणारा ठरतो. अमेरिकेत हा दिवस मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी साजरा करण्यात येतो. अमेरिका हा देश जगाच्या नकाशात आर्थिक महासत्ता आहे. त्यामुळे अमेरिकेत होणाऱ्या बहुतांशी घटनांचे जगातील इतर देशांवर होणारे परिणाम हे दृश्य स्वरूपातील असतात. ‘मदर्स डे’ च्या बाबतीतही काही प्रमाणात असेच आढळून येते.
अमेरिकेप्रमाणे बहुतांश इतर देशांमध्येही मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारीच हा दिवस साजरा करण्याची परंपराच सुरु झाली.असे असले तरी ऐतिहासिकरित्या जगात वेगवेगळ्या देशांमध्ये व संस्कृतींमध्ये ‘मदर्स डे’ हा वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्याची परंपरा आहे. भारतात मातेचा सन्मान करण्याची प्राचीन परंपरा आहे. भारतीय इतिहास, कला यांच्या माध्यमातून या परंपरेची ऐतिहासिकता सिद्ध होते. असे असले तरी आधुनिक जगातील रीतीप्रमाणे भारतातही मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस जल्लोषात साजरा करण्यात येतो. यावर्षी हा दिवस १४ मे रोजी आहे.
‘मदर्स डे’ चे श्रेय नक्की कोणाकडे जाते?
आधुनिक ‘मदर्स डे’ चे श्रेय हे अमेरिकेकडे जात असले तरी, अशा स्वरूपाचा दिन साजरा करण्याची परंपरा ग्रीस मध्ये सुरु झाली असे मानले जात होते. परंतु नवीन संशोधनातून काही गोष्टी प्रकाशात आल्या आहेत. प्राचीन ग्रीसमध्ये प्रचलित असलेल्या मातृदेवतांच्या उपासनेतून ही प्रथा अस्तित्त्वात आल्याचा दावा केला जात होता. प्राचीन ग्रीक साम्राज्य साधारण इसवीसन पूर्व १२०० मध्ये उदयास येवून त्याचा ऱ्हास इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकात झाला होता. हाच कालखंड ग्रीक पुराणकथांच्या उदयाचा काळ मानला जातो. ग्रीक पुराण कथांमधील आकाश व स्वर्गाची देवता युरेनस याची पत्नी ‘गाइया’ ही निसर्ग देवता असून ती सर्व जीवांची आदिमाता मनाली जाते. तिची मुलगी म्हणजे ‘ऱ्हेआ’ ही ग्रीक पुराकथांमध्ये नमूद केलेल्या देवतांची माता आहे. ग्रीक पुराकथांमध्ये तिचा उल्लेख ‘मीटर थेऑन’ म्हणजेच ‘देवतांची माता’ असा करण्यात आलेला आहे. याच देवतेच्या सन्मानार्थ प्राचीन ग्रीसमध्ये वसंत ऋतूत वार्षिक सोहळा साजरा करण्यात येत होता.
आणखी वाचा : विश्लेषण : भारतीय संस्कृतीतील मातृसत्ताक कुटुंबपद्धती !
ग्रीसची परंपरा पुढे रोमन साम्राज्यात सुरू राहिल्याचे वाङ्मययीन पुराव्यांच्या आधारे समजते. ग्रीक व रोम हे एकच असल्याचा संभ्रम अनेकांचा होतो. परंतु ग्रीक ही रोमन संस्कृतीपेक्षा प्राचीन संस्कृती आहे. ग्रीकांचे जगाच्या इतिहासातील कला, स्थापत्य या क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. तर रोमन संस्कृती ही इसवीसन पूर्व सातव्या शतकात उदयास येवून १४ व्या शतकाच्या उत्तरार्धात ऱ्हास पावली. रोमन संस्कृतीत ‘सिबेली’ देवीच्या सन्मानार्थ ‘हिलारिया’ नावाने वसंतोत्सव साजरा केला जात होता. रोमन धारणेनुसार ‘सिबेली’ ही देवतांची आई आहे. म्हणूनच सुरुवातीच्या काळात जागतिक पातळीवर मातृपूजनाचे प्राचीन संदर्भ ग्रीक व रोमन संस्कृतीतच मिळतात असे मानले जाते होते. परंतु जगाच्या इतिहासातील आदीम सर्व संस्कृतींमध्ये मातृपूजन अस्तित्त्वात असल्याचे पुरावे उघडकीस आलेले आहेत.
उत्तर पुराश्मयुगात मातृपूजन
अगदी अश्मयुगीन मानवापासून मातृपूजनाची पद्धत होती हे सिद्ध झालेले आहे. भारतापुरता विचार करावयाचा झाला तर योनीपूजनाचे प्रत्यक्ष उपलब्ध पुरावे उत्तर पुराश्मयुगातील आहेत. म्हणजेच भारतात तब्बल २६ हजार वर्षांपूर्वी मातृपूजा अस्तित्त्वात होती हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे केवळ ग्रीक संस्कृतीतच मातृपूजन अस्तित्त्वात होते असे मानणे हे तत्त्वतः चुकीचे आहे.
आधुनिक जगातील पहिला ‘मदर्स डे’ साजरा करणाऱ्या अॅना जार्विस कोण होत्या?
अमेरिकेत ‘मदर्स डे’ हा ‘अॅना जार्विस’ या समाजसेविकेच्या प्रयत्नांमुळे साजरा करण्यात येवू लागला. अॅना यांचा जन्म १८५४ साली झाला. मुख्यत्त्वे हा काळ अमेरिकेत गृहयुद्धाचा काळ होता. साथीच्या रोगांमुळे अॅना यांनी आपल्या भावंडांना गमावले होते. तिची आई, ‘अॅन रीव्हस जार्विस’ यांनी स्वः अनुभवातून प्रेरणा घेवून इतर मातांना मदत करण्याच्या सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले. बालमृत्यू रोखण्यासाठी मातांना स्वच्छता शिकवणे त्याशिवाय गृहयुद्धाच्या काळात दोन्ही बाजूंकडच्या मातांचे समुपदेशन करणे यांसारख्या कामांमध्ये त्या सक्रिय होत्या. एकदा अॅना यांनी आपली आईला कोणाला तरी सांगताना ऐकले होते की ‘मी प्रार्थना करते, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मातांनी मानवतेसाठी केलेल्या अतुलनीय सेवेबद्दल कोणीतरी, कधीतरी, त्यांच्या स्मरणार्थ ‘मदर्स डे’ साजरा करावा’. त्यामुळेच आपल्या आईची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अॅना यांनी ‘मदर्स डे’ ची सुरुवात करणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय बनवले होते.
‘मदर्स डे’ साठी अॅना जार्विस यांचे प्रयत्न
अॅना जार्विस यांनी ‘मदर्स डे’ साजरा करण्यात यावा यासाठी राजकारणी, व्यापारी, चर्चचे पाद्री यांना पत्र लिहून पाठिंबा देण्याची विनंती केली होती. अॅना जार्विस यांच्या आईचे निधन हे ९ मे १९०५ रोजी झाले होते. त्यामुळे त्यांनी मे महिन्याचा दुसऱ्या आठवड्यातील रविवार हा ‘मदर्स डे’साजरा करण्यासाठी निवडावा यासाठी विशेष भर दिला होता. या दिवशी ‘अॅन’ यांच्या आवडीचे पांढरे कार्नेशन फुल मातांना समर्पित करण्याची पद्धत अॅना यांनी सुरु केली. सुरुवातीच्या कालखंडात त्यांना तत्कालीन सरकारकडून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. परंतु त्यांच्या प्रयत्नांना १९०८ मध्ये खरे यश आले, या वर्षी त्यांच्या मूळ गावी ग्राफ्टन आणि फिलाडेल्फिया येथे ’मदर्स डे’ चे मोठे कार्यक्रम आयोजित केले गेले. तर ९ मे १९१४ साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मदर्स डेला औपचारिकपणे मान्यता देण्याच्या विधेयकावर स्वाक्षरी केली होती. तेंव्हापासून अमेरिकेत अधिकृत ‘मदर्स डे’ साजरा करण्यात येऊ लागला.
अॅना जार्विस यांचा ‘मदर्स डे’ च्या व्यापारीकरणाला असलेला विरोध
नंतरच्या काळात मदर्स डे च्या दिवशी देण्यात येणाऱ्या ग्रीटिंग कार्ड्स, भेटवस्तू आणि कँडीज यांच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या व्यापारीकरणाचा कडवा निषेध अॅना यांनी केला होता. अॅना यांना हा उत्सव साजरा करण्यामागे घरात आपल्या कुटुंबाची काळजी घेणार्या वैयक्तिक आईचा सन्मान करण्यासाठी तो साजरा करायचा होता. परंतु नंतरच्या काळात या दिवसाचे झालेले बाजारीकरण त्यांच्यासाठी वेदनादायी ठरले होते.
आणखी वाचा : विश्लेषण : इजिप्तमधील पिरॅमिड्सचा भारताशी काही संबंध आहे का?
ब्रिटनमधील ‘मदर्स डे’
इतर देशांमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या या दिवसामागे इतर राजकीय व धार्मिक कारणे देखील आहेत. ब्रिटनमध्ये साजरा करण्यात येणाऱ्या ‘मदर्स डे’चा इतिहास अमेरिकेच्या तुलनेत जुना आहे. या देशात साजऱ्या होणाऱ्या ‘मदर्स डे’चा इतिहास हा मध्ययुगीन काळापर्यंत मागे जातो. ब्रिटनमध्ये मदर्स दे लेंटच्या चौथ्या रविवारी साजरा केला जातो. लेंट हा चर्चकडून अॅश वेनस्डे ते ईस्टर पर्यंत पाळला जाणारा चाळीस दिवसाचा कालावधी आहे. जो सामान्यतः फेब्रुवारीमध्ये सुरू होतो आणि एप्रिलमध्ये संपतो. या दिवशी स्थानिक जनता त्यांच्या ‘मदर चर्च’मध्ये जातात. म्हणजेच ज्या चर्चमध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला आहे. त्या चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जमत असत. या काळात जे आपल्या घरापासून किंवा गावापासून दूर होते. ते त्यानिमित्ताने चर्चमध्ये आवर्जून येत होते. अशा प्रकारे, हा दिवस त्यांच्या मातांना भेट देण्याचा एक प्रसंग ठरला होता. म्हणूनच हा दिवस ब्रिटनमध्ये ‘मदर्स डे’म्हणून साजरा करण्यात येवू लागला.
ब्रिटनमधील ‘मदर्स डे’ चे श्रेय अमेरिकेकडे
ब्रिटनमधील या ‘मदर्स डे’ च्या पुनरुज्जीवनाचे श्रेय अमेरिकेकडे जाते. कॉन्स्टन्स अॅडलेड स्मिथ यांच्याकडून या दिवसाचे पुनरुज्जीवन करण्यात आले होते. १९१३ साली अॅना जार्विस यांच्याकडून मदर्स डेच्या साजरीकरणासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नासंदर्भात त्यांच्या वाचनात आले होते. हा दिवस अमेरिकन तारखेनुसार साजरा करण्यापेक्षा स्थानिक परंपरेनुसार साजरा करण्याचे त्यांनी सरकारला सुचविले होते. १९३८ साला पर्यंत ब्रिटनच्या प्रत्येक भागात ‘मदर्स डे’ साजरा केला जात होता. या दिवशी पारंपरिक पदार्थ तयार करून हा दिवस साजरा करण्यात येत असे.
इतर देशांमध्ये साजरा करण्यात येणारा ‘मदर्स डे’
रशिया आणि त्याच्या शेजारील काही देशांमध्ये, मदर्स डे हा अनेकदा आंतरराष्ट्रीय महिला दिनासोबत साजरा केला जातो. या व्यतिरिक्त थायलंड मध्ये १२ ऑगस्ट रोजी ‘राणी मदर सिरिकितच्या’ वाढदिवसाचे औचित्य साधून मदर्स डे साजरा केला जातो. ‘मदर्स डे’ चे एक आगळे वेगळे स्वरूप आपल्याला इथिओपियामध्ये देखील आढळून येते. पावसाळ्यानंतर पानगळतीच्या काळात कुटुंबातील व्यक्ती एकत्र जमून एकत्र गाणी गातात. या दिवशी मोठी मेजवानी केली जाते. हाच दिवस या भागात ‘मदर्स डे’ म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतीय प्रभाव असलेला तैवानमधील ‘मदर्स डे’
तैवानमध्ये देखील मे महिन्याच्या दुस-या रविवारीच ‘मदर्स डे’ साजरा केला जातो. परंतु हा दिवस साजरा करण्यामागची परंपरा ही वेगळी आहे. याच महिन्यात गौतम बुद्ध यांची जयंती असते त्याचे औचित्य साधून गौतम बुद्धाच्या मातृरूपाची या दिवशी उपासना करण्यात येते. या दिवशी गौतमबुद्धांना स्नान घालून हा दिवस साजरा करण्यात येतो. भारतात बुद्ध जयंती ही तिथीनुसार साजरी करण्यात येत असली तरी १९९९ मध्ये तैवान सरकारने मे महिन्याचा दुसरा रविवार हा बुद्धांचा जन्मदिवस म्हणून घोषित केला होता. म्हणूच या महिन्यात ‘मदर्स डे’ साजरा करण्याची परंपरा रूढ झाली. उत्तर कोरियामध्ये १६ नोव्हेंबर हा दिवस मदर्स डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. कोरियात १९६१ साला मध्ये झालेल्या मातांच्या पहिल्या राष्ट्रीय सभेपासून या तारखेला महत्त्व प्राप्त झाले होते. २०१२ सालामध्ये ही तारीख मदर्स डे म्हणून सरकारकडून घोषित करण्यात आले. देश कुठलाही असो प्रत्येक संस्कृतीमध्ये मातेला मानाचे स्थान दिले जाते हेच यावरून सिद्ध होते.
भारतामध्ये श्रावणी अमावस्येला मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी जिवंतिका देवीची उपासना करण्यात येते तसेच लहान मुलांना ओवाळण्यात येते.घरातील अपमृत्यू टाळण्याकरता व लहान मुलांचे आयुष्यमान वाढावे याकरता या देवीची पूजा करण्यात येते. या देवीच्या उपासनेचे धार्मिक साहित्यात संदर्भ येत असले तरी भारतात वेगवेगळ्या रूपात मातृदेवतांची पूजा करण्याची अखंडित परंपरा आहे.