२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील शिंदे सरकारने सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव असणे अनिवार्य केले आहे. सरकारने केलेल्या नियमानुसार तुमचे नाव त्यानंतर अनुक्रमे आई व नंतर वडिलांचे नाव, त्यानंतर आडनाव असणे गरजेचे आहे. सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांच्या नावाचे फलक प्रकाशित केले. यात त्यांची नावं एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस आणि अजित आशाताई अनंतराव पवार अशी होती. राज्य सरकारचा हा निर्णय १ मे पासून लागू होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे महिला वर्गाकडून स्वागत केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील आईचे नाव लावण्याच्या प्राचीन परंपरेविषयी जाणून घेणे रंजक ठरणारे आहे.
अधिक वाचा: किंग्ज सर्कल रेल्वे स्थानकाला नाव देण्यात आलेले तीर्थंकर पार्श्वनाथ कोण आहेत?
हा गौतमीपुत्र कोण होता?
भारताच्या इतिहासात एका राजवंशाने दीर्घ कालखंडासाठी राज्य केले. इतकेच नाही महाराष्ट्राच्या इतिहासात या वंशाचे योगदान महत्त्वाचे आहे. इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात आधुनिक महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा,आणि मध्यप्रदेशाचा काही भाग या प्रदेशांवर राज्य करणाऱ्या सातवाहन राजवंशातील एक राजा स्वतःचा उल्लेख मोठ्या गौरवाने गौतमीपुत्र सातकर्णी असा करत होता. गौतमी बलश्री हे त्याच्या आईचे नाव होते.
सातवाहन कालखंडातील मातृनावांची परंपरा
सातवाहन हे प्राचीन भारतीय इतिहासातील महत्त्वाचे साम्राज्य असून पौराणिक वाङ्मयात सातवाहनांचा उल्लेख आंध्रभृत्य केल्याचा संदर्भ आढळतो. इसवी सनपूर्व पहिल्या शतकात सातवाहन साम्राज्य त्यांच्या प्रगतीच्या शिखरावर होते. या साम्राज्याने जवळपास ४०० वर्षे राज्य केले. इतक्या प्रदीर्घ कालखंडावर राज्य करणारे हे दक्षिण भारतातील पहिलेच साम्राज्य मानले जाते. गौतमीपुत्र सातकर्णी हा सातवाहन वंशातील २३ वा सम्राट होता. गौतमीपुत्र सातकर्णीच्या वडिलांचे नाव शिवस्वती आणि आईचे नाव गौतमी बलश्री होते. हा सातवाहन वंशातील सर्वात महत्त्वाचा शासक होता. त्यांनी शक, यवन, पहलवांसारख्या परकीय आक्रमकांचा पराभव केला. गौतमीपुत्र सातकर्णीची आई गौतमी बलश्री होती, याविषयीचे संदर्भ आपल्याला नाशिक लेणी क्रमांक ३ मधील शिलालेखात सापडतात. हा शिलालेख वसिष्ठिपुत्र पुलुमावी याच्या कारकीर्दीच्या १९ व्या वर्षी कोरला गेला आहे. महाराष्ट्राच्या काही आद्य प्रस्तर लेखांपैकी हा एक असल्यामुळे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. हा लेख ब्राह्मी लिपीत असून लेखाची भाषा प्राकृत आहे.
गौतमीपुत्र सातकर्णीची प्रशस्ती
प्रसिद्ध पुरातत्त्व अभ्यासक शोभना गोखले यांनी नमूद केल्याप्रमाणे या लेखाच्या भाषेवर संस्कृतची छाप आहे. हा लेख वसिष्ठिपुत्र पुलुमावी याच्या कालखंडात कोरला गेला असला तरी या लेखात गौतमीपुत्र सातकर्णीची प्रशस्ती आहे. गौतमीपुत्र सातकर्णी याची आई गौतमी बलश्री हीने नाशिक येथे बौद्ध भिक्षूसंघासाठी लेणं खोदलं आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पिसाजीपद्रक हे गाव दान दिलं. त्याच निमित्ताने हा शिलालेख कोरविला गेला आहे. या लेखात गौतमीपुत्राच्या पराक्रमाची यशोगाथा आहे. त्याची तुलना राम, कृष्ण, अर्जुन, भीम, नाभाग, नहुष, जनमेजय, ययाती, परशुराम, अंबरीष या पुरुषश्रेष्ठांशी केली आहे. एकूणच या लेखातील अतिशयोक्तीचा भाग सोडला तर यातून सातवाहन कुलाची महिमा प्रस्थापित करण्याच्या गौतमी बलश्री हीच्या पुत्राच्या गौतमीपुत्र सातकर्णीच्या पराक्रमाविषयी माहिती मिळते.
मातांचा सन्मान…
गौतमीपुत्र सातकर्णी, वसिष्ठीपुत्र पुलुवावी, हरितिपुत्र शकसेना, माढरीपुत्र सातकर्णी हे या राजवंशातील काही शासक होते, ज्यांच्या नावांची सुरुवात त्यांच्या आईच्या नावाने होते. या प्रकारच्या नावांनी इतिहासकारांना चकित केले. इतर राजवंशांप्रमाणे सातवाहनांमध्येही राजानंतर ज्येष्ठपुत्र गादीवर विराजमान होण्याची परंपरा होती, इतिहासकारांच्या मते ही परंपरा पुरुषसत्ताक समाजाची द्योतक असली तरी आईचे नाव धारणकरून सातवाहन राजे मातांचा सन्मान करताना दिसतात. सातवाहनांचे सातकर्णी हे नाव विशेष महत्त्वाचे आहे. सातवाहन राजे सातकर्णी हे नाव बिरुदाप्रमाणे वापरत असतं असे काही इतिहासकार मानतात. किंबहुना त्यांच्या मांडलिकांनीही सातकर्णी हे नाव वापरल्याचे दिसते.
सातवाहनानंतरही मातृनावांची परंपरा
सातवाहन सम्राटांनी वेगवेगळ्या राजघराण्यातील स्त्रियांशी विवाह केला, तसेच एकाच राजाचे अनेक विवाह झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मातृवंशाची ओळख पटविण्यासाठी सातवाहन राजांनी आपल्या नावासमोर आपल्या मातेचे नाव धारण केल्याचे काही अभ्यासक मानतात. परंतु मातृनावांचा हा वापर फक्त सातवाहनांपुरता मर्यादित नव्हता. सातवाहनांच्या मांडलिकांनीही ही परंपरा पुढे चालू ठेवल्याचे दाखले उपलब्ध आहेत. आधुनिक कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यावर राज्य करणारे आणि प्रारंभिक कालखंडात सातवाहनांचे मांडलिक म्हणून राज्य केलेल्या चुटू शासकांचीही अशीच मातृनाव होती. मुलानंद नावाचा एक प्रमुख चुटू शासक होऊन गेला. ज्याच्या नावाचा अर्थ ‘मुलाच्या कुळातील राणीचा मुलगा (नंद)’ असा आहे. त्याचा उत्तराधिकारी शिवलानंद होता, शिवलानंद म्हणजे ‘शिवला कुळातील राणीचा मुलगा’ होय. काही चुटू राज्यकर्त्यांकडे सातकर्णी हे नाव देखील होते. हरितिपुत्र विष्णुकदा कटु-कुलानंद सातकर्णी आणि हरितिपुत्र शिव-स्कंदवर्मन ही दोन नाव यासाठी महत्त्वाची ठरतात. त्यामुळे सातकर्णी हे नाव एखाद्या बिरुदाप्रमाणे वापरले जात असावे असा तर्क इतिहासकार मांडतात. त्याचप्रमाणे, सातवाहनांचे वंशज असल्याचा दावा करणाऱ्या आंध्र इश्वाकू शासकांनी त्यांच्या पूर्वजांप्रमाणेच नामकरणाची पद्धती पाळली. त्यांच्या राजांची वशिष्ठीपुत्र वसुसेना, वसिष्ठीपुत्र चामटमुल, माथरीपुत्र विरपुरुषदत्त, वसिष्ठीपुत्र एहुवल चामटमुल, हरितीपुत्र विरपुरुषदत्त, वसिष्ठीपुत्र रुद्रपुरुषदत्त इत्यादी नावं होती.
अधिक वाचा: शत्रूच्या कवट्या गोळा करणाऱ्या राजाचे मतपरिवर्तन कसे झाले? काय होते मध्ययुगीन जैन धर्माचे स्वरूप?
मध्ययुगीन भारत आणि मातृनावांची परंपरा
किंबहुना ६ व्या ते १२ व्या शतकादरम्यान दक्षिण भारतात होऊन गेलेल्या चालुक्य वंशाच्या शासकांनी स्वतःच्या नावापुढे त्यांच्या आईचे नाव लावले होते. चालुक्य राजवंशाच्या अनेक शाखा होत्या. पश्चिम आणि पूर्व चालुक्य या दोन्ही शाखांनी मातृनामांची परंपरा पाळली होती. पूर्व चालुक्य शासक विष्णुवर्धन याच्या आईचे नाव विष्णुवर्धिनी होते. उपलब्ध पुराव्यांच्या माध्यमातून या कालखंडात मातृनावांनी नेमका कोणता उद्देश साधला गेला यावर अद्याप वाद आहे. तरीही हा भारतीय इतिहासातील एक अद्वितीय पैलू असल्याचे म्हटल्यास गैर ठरू नये.