Mounjaro Injection Price in India : अमेरिका आणि युरोपसह पाश्चात्त्य देशांमध्ये ब्लॉकबस्टर ठरलेल्या वजन कमी करणाऱ्या औषधाला आता भारतातही मान्यता मिळाली आहे. अमेरिकेतील औषधनिर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी एली लिलीनं वजन कमी करणारं एक औषधं गुरुवारी (२० मार्च) भारतात सादर केलं आहे. या औषधाच्या मदतीनं लठ्ठपणावरही मात करता येईल, असा दावा केला जात आहे. लवकरच हे औषध बाजारात विक्रीसाठी येणार आहे. दरम्यान, अमेरिकेच्या या नवीन औषधाचं नाव काय? ते वजन कमी करण्यासाठी किती प्रभावी ठरणार? त्याचे शरीरावर काय परिणाम होणार? बाजारात या औषधाची किंमत किती असणार? असे असंख्य प्रश्न भारतीयांना पडले आहेत, याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
जगभरातील १० कोटी लोक लठ्ठपणाने ग्रस्त
जागतिक आरोग्य संघटना आणि इम्पेरियल कॉलेज लंडन यांनी नुकत्याच केलेल्या एका नवीन संशोधनानुसार, सध्या जगभरातील विकसनशील, तसेच विकसित देशांमध्ये सुमारे १० कोटी लोक लठ्ठ आहेत. मागील काही वर्षांत भारतातही लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. अगदी लहानग्यापासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव यांसारख्या गोष्टी लठ्ठपणाला कारणीभूत असल्याचं सांगितलं जात आहे. वजनवाढीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लोक वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहेत. मात्र, तरीही त्यांना अपयश येत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
लठ्ठपणाबाबत लॅन्सेटचा अहवाल चिंता वाढवणारा
लॅन्सेट संस्थेने नुकत्याच लठ्ठपणाच्या समस्येविषयी त्यांचा एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात असं म्हटलं होतं की, २०५० पर्यंत भारतातील २१.८ कोटी पुरुष आणि २३.१ कोटी महिला जादा वजन किंवा लठ्ठपणाच्या बळी ठरतील. जागतिक स्तरावर, २०५० पर्यंत सर्व प्रौढांपैकी अर्ध्याहून अधिक आणि मुले व किशोरवयीन मुलांपैकी एक-तृतियांश मुले लठ्ठपणामुळे त्रस्त होतील, असंही अभ्यासात नमूद करण्यात आलं होतं. लठ्ठपणा हा शरीरामध्ये अतिरिक्त चरबीच्या रूपातील साठ्यामुळे होणारा आजार आहे. या गुंतागुंतीच्या आजारामुळे मानवी आरोग्याची विविध प्रकारची हानी होऊ शकते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. वाढत्या वजनामुळे मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात, असंही त्यांनी सांगितलं होतं.
आणखी वाचा : मुघलांना सळो की पळो करणाऱ्या ताराबाईंचा इतिहास काय सांगतो?
लठ्ठपणावर प्रभावी ठरणाऱ्या नवीन औषधाचं नाव काय?
अमेरिकेच्या दिग्गज कंपनीनं भारतात सादर केलेल्या नवीन औषधाचं नाव टिर्झेपाटाइड ‘मोनजारो’ असं आहे. या औषधामुळे मधुमेह आणि लठ्ठपणावर मात करता येईल, असं सांगितलं जात आहे. वाढतं वजन, लठ्ठपणा व टाईप-२ डायबिटीसच्या रुग्णांसाठी मोनजारो औषध तयार करण्यात आल्याचा दावा अमेरिकन कंपनीनं केला आहे. हे औषध एकाच डोसच्या स्वरूपात असून, आठवड्यातून एकदा स्वत:हून इंजेक्शन घेता येईल, अशी याची रचना करण्यात आली आहे. भारतात हे औषधाच्या चिठ्ठीवरही उपलब्ध असेल, असं सांगण्यात आलं आहे.
मोनजारो औषधाची किंमत किती?
‘बिझनेस स्टँडर्ड’च्या वृत्तानुसार , मोनजारो हे औषध लसीच्या स्वरूपात दिलं जाईल. भारतात या औषधाच्या २.५ मिलिग्रामची किंमत तीन हजार ५०० रुपये आणि ५ मिलिग्रामची किंमत चार हजार ३७५ रुपये आहे; तर अमेरिकेमध्ये त्याची किंमत भारतीय चलनात २३,००० ते २५,००० रुपयांच्या आसपास आहे. निश्चित डोसनुसार रुग्णांना हे औषध घेण्यासाठी महिन्याला किमान १४ हजार रुपये खर्च करावे लागणार आहे. औषधाची वैध चिठ्ठी दाखविल्यानंतरच नोंदणीकृत औषधालयात ‘मोनजारो’ (टीर्झेपेटाईड) उपलब्ध होईल, असं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. ज्या कंपनीने हे औषध तयार केलं आहे, त्या कंपनीचे २०२४ पर्यंतचे मार्केट व्हॅल्युशन ८४२ अरब डॉलरच्या जवळपास आहे. कंपनीचा अंदाज आहे की, २०३० पर्यंत या औषधाची विक्री १५० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते.
मोनजारो औषध नेमकं कसं काम करतं?
मोनजारो हे एक GIP आणि GLP-1 रिसेप्टर अॅगोनिस्ट औषध आहे. या औषधामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते आणि शरीरात इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते. त्याचबरोबर हे औषध भूक नियंत्रित करतं आणि चयापचय क्रिया वाढवतं. ज्यामुळे झटपट वजन कमी होण्यास मदत होते. एली लिली कंपनीनं मोनजारो औषधाचा प्रभाव तपासण्यासाठी एक संशोधन केलं होतं. त्यात असं दिसून आलं की, हे औषध लठ्ठ व्यक्तींचं सरासरी २०% वजन कमी करण्यास मदत करू शकतं. विशेष बाब म्हणजे या औषधाच्या डोसमुळे एक-चतुर्थांश वजन कमी होतं, असा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे. ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’कडून प्रकाशित करण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायलनुसार, “ज्या लोकांनी या औषधाचा १५ मिली डोस घेतला, त्यांचं ७२ आठवड्यांत जवळपास २१.८ किलो वजन कमी झालं आहे. तर ५ मिली डोस घेणाऱ्या व्यक्तींचं १५.४ किलोपर्यंत वजन कमी होण्यास मदत झाली आहे.”
हेही वाचा : Shivaji Maharaj: महाराष्ट्रात उभे राहिले शिवाजी महाराजांचे मंदिर; काय आहेत या मंदिराची वैशिष्ट्ये?
मोनजारोच्या डोसबाबत आरोग्यतज्ज्ञ काय म्हणाले?
‘लिली इंडिया’चे अध्यक्ष व महाव्यवस्थापक विन्सलो टकर म्हणाले, “लठ्ठपणा आणि टाईप-२ मधुमेह या आजारांमुळे भारतीयांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. या आजारांचा मुळापासून नायनाट करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. झटपट वजन कमी करण्यास आतुर असलेल्या भारतीयांसाठी मोनजारो औषधाचा डोस नवसंजीवनी ठरेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आरएमएल रुग्णालयातील प्राध्यापक व औषध विभागाचे प्रमुख डॉ. सुभाष गिरी यांच्या मते, मोनजारो औषध टाईप-२ मधुमेहावरही प्रभावी आहे. या औषधाचा डोस घेणाऱ्या व्यक्तींना जास्त भूक लागत नाही. त्यांना बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे अतिरिक्त पदार्थ खाण्यावर नियंत्रण राहते आणि शरीरातील चरबीचे प्रमाणदेखील कमी होते.
मोनजारोचे आरोग्यावर काय परिणाम होतात?
दरम्यान, एकीकडे लठ्ठपणा आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मोनजारो औषध प्रभावी ठरल्याचा दावा केला जात आहे. तर, दुसरीकडे काही तज्ज्ञांनी या औषधाबाबत सावधगिरी बाळण्याचा सल्ला दिला आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) येथील एंडोक्रायनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. निखिल टंडन यांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय या औषधाचा डोस घेऊ नये, असा सल्ला नागरिकांना दिला आहे. या औषधाच्या डोसमुळे मळमळ, अपचन, बद्धकोष्ठता, अतिसार यांसारख्या समस्या जाणवू शकतात, असं आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं आहे. मोनजारो औषधाचा डोस वजन कमी करण्यास मदत करू शकतो. परंतु, औषध घेणं बंद केल्यानंतर पुन्हा वजन वाढूही शकते, असंही तज्ज्ञांनी लोकांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. त्यामुळे हे औषध लठ्ठपणा आणि वजन कमी करण्यासाठी कितपत प्रभावी ठरणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल.