केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षाही वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात येणार आहेत. या निर्णयाचा फेरविचार केला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत नुकतेच स्पष्ट केले. ‘एमपीएससी’ची परीक्षा आणि अभ्यासक्रमातील बदलाची सुरुवात राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ पासून होणार असून वर्णनात्मक परीक्षेचे स्पर्धा परीक्षार्थींसमोर काय आव्हान राहणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
परीक्षेचे वर्णनात्मक स्वरूप काय आहे?
राज्यसेवा पूर्वपरीक्षेतील प्रश्नपत्रिका क्रमांक दोन अर्थात ‘सी सॅट’ हा विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने ‘एमपीएससी’ने माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक धनंजय कमलाकर, माजी कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांची समिती नियुक्त केली होती. समितीने केलेल्या शिफारशीनुसार ‘सी सॅट’ विषय पात्रतेसाठी ग्राह्य धरण्याचा निर्णय ‘एमपीएससी’ने घेतला. या समितीच्या कार्यकक्षेत राज्यसेवेची परीक्षा आणि अभ्यासक्रम सुधारणांचाही समावेश होता. यासंदर्भातील समितीच्या शिफारशी ‘एमपीएससी’ने स्वीकारल्या. त्यानुसार सुधारित पद्धतीत वर्णनात्मक स्वरूपाच्या नऊ प्रश्नपत्रिका असतील. त्यापैकी मराठी आणि इंग्रजी भाषेच्या प्रश्नपत्रिका प्रत्येकी ३०० गुणांच्या असतील. मराठी किंवा इंग्रजी निबंधाची एक, सामान्य अध्ययनाच्या एकूण चार, वैकल्पिक विषयांच्या दोन अशा एकूण सात प्रश्नपत्रिका प्रत्येकी २५० गुणांसाठी असतील. मुलाखतीसाठी २७५ गुण असतील. त्यामुळे एकूण गुण २ हजार २५ गुणांची राज्यसेवा परीक्षा राहणार आहे. काळानुरूप बदल करून परीक्षा आणि अभ्यासक्रमाची रचना नव्याने करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक गुणवत्ताधारक उमेदवार मिळण्यास मदत होईल. तसेच सुधारित रचनेमुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यातील उमेदवारांचा टक्का वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा तज्ज्ञांना आहे.
संयुक्त परीक्षेवर कसा परिणाम होणार?
राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट-अ आणि गट-ब संवर्गासाठी महाराष्ट्र संयुक्त पूर्वपरीक्षा या नावाने एकच पूर्वपरीक्षा होईल. परीक्षेचा अर्ज भरताना उमेदवारांना त्यांचा पसंतीक्रम द्यावा लागेल आणि त्यानुसार अर्ज भरावा लागेल. जितके अर्ज पूर्वपरीक्षेला आले असतील त्यानुसार मुख्य परीक्षेतील उमेदवारांची संख्या निश्चित करण्यात येईल व पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्यावर मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची संबंधित संवर्गासाठी म्हणजेच राज्यसेवा पूर्वपरीक्षा, स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य सेवा, कृषी सेवा मुख्य परीक्षा आदी वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्र परीक्षा घेण्यात येतील.
२०२३ पासून लागू करण्यास विरोध का होता?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जून २०२२ मध्ये राज्यसेवा परीक्षेची पद्धत व अभ्यासक्रमात महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी २०२३ पासून होणार होती. मात्र, एका वर्षातच परीक्षेत इतका मोठा बदल होत असल्याने जुन्या परीक्षा पद्धतीने अभ्यास करणाऱ्यांचे नुकसान होईल, नवीन परीक्षा पद्धती लागू करताना आयोगाने किमान तीन वर्षांचा वेळ द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती. या बदलामुळे त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागणार होती आणि त्यासाठी पुरेसा वेळही मिळणार नव्हता. त्यामुळे परीक्षेतील नवा बदल हा २०२५ पासून लागू करावा, या मागणीसाठी राज्यातील प्रमुख शहरांत विद्यार्थ्यांनी आंदोलने केली. राजकीय पक्षांनीही या आंदोलनांत उडी घेतली होती. राज्य शासनाने मध्यस्थी केली व ‘एमपीएससी’ने राज्यसेवा परीक्षेचे वर्णनात्मक स्वरूप २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला होता.
परीक्षेची काठीण्यपातळी वाढणार?
‘एमपीएससी’तर्फे आतापर्यंत पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन पातळ्यांवर परीक्षा होती. मुख्य परीक्षा ही बहुपर्यायी पद्धतीची होती. यात सहा प्रश्नपत्रिका राहत होत्या. तर सामान्य अध्ययनाच्या प्रत्येकी १५० गुणांच्या चार प्रश्नपत्रिका राहत होत्या. संपूर्ण परीक्षा ही फक्त आठशे गुणांची राहत होती. परंतु परीक्षा आणि अभ्यासक्रमातील नव्या बदलामुळे २०२५ पासून २ हजार २५ गुणांची राज्यसेवा परीक्षा राहणार आहे. यात सामान्य अध्ययन एक, सामान्य अध्ययन दोन, सामान्य अध्ययन तीन या पेपरसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्याशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रमात समावेश असेल. तर सामान्य अध्ययन चार हा पेपर उमेदवारांची नैतिकता, चारित्र्य आणि योग्यता या विषयावर राहील. तसेच एकूण २४ विषयांतून उमेदवारांना १ वैकल्पिक विषय निवडता येईल. त्यामुळे परीक्षेची काठीण्यपातळी वाढणार असून विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.
‘यूपीएससी’मधील टक्का वाढेल का?
‘यूपीएससी’मध्ये ‘सी-सॅट’ परीक्षा ही पात्रतेसाठी घेतली जाते. तर मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक पद्धतीने होते. आता हीच पद्धत ‘एमपीएससी’मध्ये लागू होत आहे. केवळ यूपीएससीमधील अभ्यासक्रमाचे स्परूप हे अधिक विस्तारित असते. त्यात भारतासह जागतिक विषयांचा अभ्यास असतो. तर ‘एमपीएससी’चा अभ्यासक्रम हा महाराष्ट्र आणि भारतापुरता मर्यादित असतो. जागतिक घडामोडींचा यात ओझरता समावेश असतो. परंतु, परीक्षेची पद्धत सारखी असल्याने ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ‘यूपीएससी’ची परीक्षा देणे सोयीचे होणार आहे.
उमेदवारांच्या गुणवत्तेवर काय परिणाम?
‘एमपीएससी’मधून राज्याला गुणवत्ताधारक अधिकारी मिळावेत हा सरकारचा उद्देश असतो. बहुपर्यायी परीक्षा पद्धतीने उमेदवार हा योग्य उत्तरासमोर खूण करतो. त्यामुळे त्यांच्या बौद्धिक पातळीचा कस लागत असला तरी त्याची वैचारिक क्षमता, एखाद्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन, सामाजिक जाणीव याची माहिती होत नाही. उलट वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमध्ये उमेदवारांना प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नांची उत्तरे ही लेखी स्वरूपात द्यावी लागतात. निबंधाच्या विषयामधून उमेदवारांच्या वैचारिक पातळीचे आकलन होते. त्यामुळे गुणवत्ताधारक उमेदवार निवडीसाठी वर्णनात्मक पद्धतीचा अधिक लाभ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd