राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात वातानुकूलित शयनयान आणि आसन व्यवस्था असलेली शिवशाही दाखल झाली. त्यानंतर, राज्यातील मध्यमवर्गीय प्रवाशांना किफातशीर दरात ही सेवा उपलब्ध झाली. राज्यातील खासगी ट्रॅव्हल कंपन्यांना शिवशाहीने जोरदार टक्कर दिली. परंतु, नादुरुस्त बस, अधूनमधून बंद होणारी वातानुकूलित यंत्रणा, वारंवार होणारे अपघात, कर्तव्यावर असताना चालकाचे गैरवर्तन आदी विविध कारणांमुळे शिवशाही प्रवाशांच्या मनातून उतरू लागली. शिवशाहीतून प्रवास करताना आलेला कटू अनुभव मराठी अभिनेते समाज माध्यमावर कथन करू लागले आहेत. त्यामुळे एकेकाळी राज्यातील खासगी ट्रॅव्हल्सला टक्कर देणारी शिवशाही काळाच्या पडद्याआड जाण्याची चिन्हे आहेत.

कधी सुरू झाली शिवशाही बस?

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची बस सेवा राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी जीवनवाहिनी ठरली आहे. एसटीची लालपरी प्रवाशांसाठी लाभदायी आहे. परंतु, एसटी महामंडळाने प्रवाशांना लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी वातानुकूलित, आरामदायी आणि किफायतशीर दरात सेवा मिळावी म्हणून शिवशाही आपल्या ताफ्यात दाखल केली. तत्कालीन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून शिवशाही बस सुरू करण्यात आली. मुंबई – रत्नागिरी मार्गावर १० जून २०१७ रोजी शिवशाही बस सुरू झाली. राज्यातील ७५ मार्गांवर शिवशाही धावू लागली. शिवशाही बसमध्ये शयनयान आणि आसन असे दोन्ही पर्याय उपलब्ध होते. एसटी महामंडळ आणि खासगी कंत्राटदारांच्या माध्यमातून शिवशाही चालविण्यात येत होती. यासाठी सात कंत्राटदार नेमण्यात आले होते. सातही कंत्राटदार आसन व्यवस्था असलेल्या बस आणि तीन कंत्राटदार शयनयान सेवा असलेली शिवशाही चालवीत होते. मात्र, दोन वर्षांतच वातानुकूलित शयनयान सुविधा असलेली शिवशाही बंद झाली. सध्या फक्त वातानुकूलित आसन व्यवस्था असलेली शिवशाही धावत आहे.

शिवशाहीला प्रवासी का वैतागले?

राज्यातील बहुसंख्य एसटी आगारांतील शिवशाही बस नादुरुस्त आहेत. नादुरुस्त वातानुकूलित यंत्रणा, फाटलेली आसने, मळके पडदे अशी शिवशाहीची दुर्दशा झाली. त्यामुळे शिवशाहीचा बोजवारा उडाला आहे. योग्य सुविधा आणि आरामदायी प्रवासाचा अभाव यामुळे प्रवासी शिवशाहीवर नाराज आहेत. तसेच तक्रार करण्यासाठी वा माहिती मिळविण्यासाठी महामंडळाच्या मदत क्रमांक १८००२२१२५० वर संपर्क होत नाही. त्यामुळे बिघडणाऱ्या शिवशाहीला प्रवासी पुरते वैतागले आहेत.

शिवशाहीऐवजी कोणती बस?

राज्यात ठाणे, मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, सातारा, अक्कलकोट, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, यवतमाळ व इतर भागांत शिवशाही धावत होती. परंतु, शिवशाहीमधील वातानुकूलन यंत्रणा बंद असल्याच्या तक्रारी प्रवासी सातत्याने करीत आहेत. तसेच या बसची देखभाल-दुरुस्ती करणे खर्चिक बाब आहे. वातानुकूलन यंत्रणेमुळे इंजिनवर जास्त भार येतो. त्यामुळे शिवशाहीचे हिरकणी किंवा साध्या बसमध्ये रूपांतरित करण्याची योजना आहे, अशी माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली. आता बसगाड्यांची रंगसंगती बदलण्यात येईल. तसेच इतर अत्यावश्यक बदल केले जातील.

शिवशाही बससेवा बंद होणार का?

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात २९ नोव्हेंबर २०२४ रोजी भंडारा आगाराच्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. शिवशाहीच्या या अपघातात ११ जणांना जीव गमवावा लागला. गेल्या काही दिवसांमध्ये शिवशाहीच्या अपघाताच्या अनेक घटना घडल्या. तसेच पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली. त्यामुळेच शिवशाही बंद होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

एसटी महामंडळाचे म्हणणे काय?

एसटी महामंडळाच्या ताफ्यात ७९२ वातानुकूलित बस आहेत. या बसगाड्यांमध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही. तसेच शिवशाही बंद करण्याचा एसटी महामंडळाचा कोणताही विचार नाही, असे स्पष्टीकरण गोंदियातील अपघातानंतर एसटी महामंडळाने दिले होते

मराठी अभिनेत्याला काय अनुभव?

मराठी अभिनेता ऋतुराज फडके यांनी नुकतान शिवशाही बसमधून प्रवास केला. मात्र, त्यांना या प्रवासात कटू अनुभव आला. ते शिवशाहीमधून दापोली – ठाणेदरम्यान प्रवास करीत होते. त्यावेळी बसमधील वातानुकूलित यंत्रणा बंद पडली होती. बाहेर प्रचंड कडक ऊन पडले होते, त्यातच बसमधील वातानुकूलित यंत्रणेमधून गरम वाफा येत होत्या. त्यामुळे बसमधील प्रवासी कमालीचे हैराण झाले होते. पनवेलमधील थांबा जवळ येताच बस बंद पडली. त्यामुळे पनवेलला उतरून त्यांना खासगी टॅक्सीने घरची वाट धरावी लागली. या कटू अनुभवामुळे त्यांनी शिवशाहीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Story img Loader