Buddha Purnima 2023: आज वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा. भगवान गौतम बुद्धांचा आजच्या तिथीला जन्म झाला, याच तिथीला त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि याच तिथीला त्यांचे महापरिनिर्वाण झाले. गौतम बुद्धांची मूर्ती ही कायम करुणा, शांती यांचे प्रतीक ठरली आहे. परंतु, आपण विविध मुद्रांमधील बुद्धमूर्ती पाहतो. बुद्ध पौर्णिमेनिमित्त या विविध मुद्रांचे अर्थ आणि इतिहास जाणून घेणे उचित ठरेल.

‘बुद्ध’ म्हणजे काय ?

बुद्ध हा शब्द केवळ भगवान गौतम यांच्यापुरता मर्यादित नाही. बुद्ध हे एका व्यक्तीचे नाव नसून हे पद आहे. बुद्ध म्हणजे अशी व्यक्ती जिने आत्मज्ञान आणि बुद्धत्व प्राप्त केले आहे. पाली भाषेत बुद्ध म्हणजे सर्वज्ञानी होय. भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली होती, त्यामुळे ते ‘बुद्ध’ पदास प्राप्त झाले.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Wildlife scientists and animal researchers claim about the golden fox thane news
मानवी वस्तीत येणारे सोनेरी कोल्हे निवासीच! वन्यजीव शास्त्रज्ञ, प्राणी अभ्यासकांचा दावा
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?

भगवान गौतम बुद्धांच्या मुद्रांचे वर्णन

‘साधनमाला’ या बौद्ध ग्रंथात बुद्धमूर्तीच्या संदर्भाने काही उल्लेख सापडतात. ते पुढीलप्रमाणे – बुद्ध मूर्ती डाव्या हाताने भूमिस्पर्शमुद्रेत असावी. उजवा हात मांडीवर असावा. कषाय वस्त्रे परिधान केलेली असावीत. देहावर शुभ लक्षणे आणि चिन्हे असावीत. गौतम बुद्धांचे ध्यानवर्णन पुराणग्रंथांमध्येही पाहायला मिळते. बुद्धमूर्ती गौरवर्णी व पद्मासनी असावी. एक हात वरदमुद्रेत व दुसरा हात अभयमुद्रेत असावा. कान लांब असावेत. मुख शांतवृत्तीचे असावे. कनिष्क राजाच्या कारकिर्दीत बुद्ध आणि बोधिसत्त्व यांच्या विशालकाय मूर्तीची निर्मिती होऊ लागली. इसवी सन ५००-६०० या गुप्त साम्राज्याच्या कालखंडात मथुरा येथील कला परमोत्कर्षाला गेली होती. त्या काळातील मूर्ती या प्रमाणबद्ध आणि आध्यात्मिक भावनांनी संपन्न आहेत. बुद्धाच्या मुखकमलावर शांती, करुणा, आनंद या भावनांची अभिव्यक्ती तत्कालीन कलाकारांनी केलेली आहे. याच काळात सारनाथ येथे पद्मासनस्थ आणि धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील बुद्ध मूर्ती सापडली. तिचे नेत्र अर्धोन्मीलित म्हणजे अर्धेच उघडलेले असून पृष्ठभागी कलापूर्ण प्रभामंडल आहे.

हेही वाचा : कायद्याच्या दृष्टिकोनातून पत्रकारितेचे स्वातंत्र्य !

भगवान गौतम बुद्धांच्या मुद्रा

भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या हातांद्वारे जे अनेक भाव व्यक्त होतात, त्या भावविशेषांना मुद्रा असे म्हणतात. ध्यानमुद्रा, अभयमुद्रा, भूमिस्पर्शमुद्रा व धर्मचक्रपरिवर्तन मुद्रा या चार मुद्रा मथुरेच्या कलापरंपरेत आढळतात. याशिवाय वरदमुद्रा दुर्मिळरीत्या आढळते. गांधार देशातील बुद्धमूर्ती ग्रीक परंपरेला अनुसरून आहेत, असे दिसते. अन्य देशांमध्ये बुद्धमूर्ती गेल्यावर तेथील कलाकारांनी मथुरा कलाशैलीतील बुद्धांना प्रमाण जरी मानले असले, तरी आपल्या वांशिक संस्कारातून अन्य गौतम बुद्धांच्या मूर्ती निर्माण केल्या. त्यातून अन्य काही हस्तमुद्रा, भावमुद्रा निर्माण झालेल्या दिसतात. त्यांच्या प्रत्येक हस्तमुद्रेला एक तत्त्वज्ञान आहे, त्या प्रत्येक मुद्रेचा एक अर्थ आहे. त्यांची शिल्पे जेवढी शांत, प्रसन्न वाटतात, तशीच ती बोधप्रद असतात. त्यांच्या काही हस्तमुद्रांचा अन्वयार्थ पाहू या…

अभयमुद्रा

अभयमुद्रेतील गौतम बुद्धांची मूर्ती आपण अनेक वेळा बघितली आहे. गौतम बुद्धांची ही मुद्रा निर्भयता आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे. ही मुद्रा सुरक्षा, शांती, परोपकार आणि निर्भयता यांचे प्रतिनिधित्व करते. या मुद्रेत उजव्या हाताला खांद्यापर्यंत उचलून, बाहू दुमडून हाताची बोटे वरच्या दिशेला असतात. या मुद्रेत ‘अभय’ भाव आहे. ही अभयता येण्यासाठी चार आर्यसत्ये माहीत असणे आवश्यक आहेत. या आर्यसत्यांची प्राप्ती होवो, अशी आश्वासक असणारी अभयमुद्रा आहे. अभयमुद्रा हिंदू, बौद्ध आणि शीख धर्मामध्ये आढळते.

ध्यान -समाधीमुद्रा

गौतम बुद्धांच्या ध्यानमुद्रेला समाधी किंवा योगमुद्रा म्हणून ओळखले जाते. या मुद्रेत पद्मासनात उजवा हात डाव्या हातावर पूर्णपणे बोट उघडून मांडीवर ठेवण्यात येतो. गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गातील समाधी ही या मुद्रेमध्ये साधली जाते. योगशास्त्रामध्ये ध्यान करण्याआधी ध्यानमुद्रा सांगितली आहे.

धम्मचक्रमुद्रा (धर्मचक्रपरिवर्तनमुद्रा)

धर्मचक्रपरिवर्तनमुद्रेला ‘धम्मचक्र ज्ञान’ चिन्ह म्हणून ओळखले जाते. त्यांनी या मुद्रेचे प्रदर्शन सर्वप्रथम ज्ञानप्राप्तीनंतर सारनाथ येथील त्यांच्या पहिल्या धर्मोपदेशात केले होते, असे उल्लेख आढळतात. या मुद्रेत दोन्ही हातांना छातीसमोर ठेवून डाव्या हाताचा पृष्ठभाग आतल्या बाजूने तर उजव्या हाताचा पृष्ठभाग बाहेरील बाजूने ठेवण्यात येतो. धर्मचक्रप्रवर्तनमुद्रा ही गौतम बुद्धांनी आपल्या चार शिष्यांना पहिले प्रवचन देताना धारण केलेली मुद्रा होय. हे धर्मचक्राचे परिवलन होते, असा संकेत आहे. बौद्ध तत्त्वज्ञानात या मुद्रेचा अर्थ ‘मी सर्व जाणले आहे’ असा होतो.

भूमिस्पर्शमुद्रा

गौतम बुद्धांच्या भूमिस्पर्शमुद्रेला पृथ्वीला स्पर्श करणे, असेही म्हटले जाते. ही मुद्रा भगवान बुद्धांची ज्ञानप्राप्ती दर्शवते. कारण, बौद्ध तत्त्वज्ञानानुसार पृथ्वी त्यांच्या ज्ञानाची साक्षी आहे. कारण, बोधिवृक्षाच्या खाली बसलेले असताना गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, तेव्हा भगवान बुद्ध या मुद्रेत होते. या मुद्रेत पद्मासनात उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवून तळहात आतल्या बाजूला ठेवून तो भूमीला स्पर्श करतो आणि डावा हात पावलांवर उलटा ठेवण्यात येतो. शाक्यमुनींना ज्ञानप्राप्ती झाली, तेव्हा ते भूमिस्पर्शमुद्रेत होते, असे उल्लेख आढळतात.

करणमुद्रा

​गौतम बुद्धांची ही मुद्रा अभद्रापासून स्वतःचे रक्षण करण्यास सूचित करते. या मुद्रेत तर्जनी आणि करंगळीला वर उचलून इतर बोटांना मोडले जाते. ही मानवाला स्वार्थ सोडून रोग अथवा नकारात्मक विचारांमधून बाहेर निघण्यास मदत करते, असे सांगितले जाते. आपल्यामध्ये असणारी ऊर्जा करणमुद्रेमुळे जागृत होते. बौद्ध परंपरेमध्ये ही मुद्रा आश्वासकतेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे.

वरदमुद्रा

गौतम बुद्धांची ही मुद्रा अर्पण, स्वागत, दान, दया आणि प्रामाणिकपणा यांना दर्शवते. या मुद्रेत डावा हात पूर्णपणे उघडून तळहात बाहेरील बाजूने असतो, तर उजवा हात हा शरीरासोबत नैसर्गिकरीत्या ठेवण्यात येतो. अभयमुद्रेसह वरदमुद्रा असणाऱ्या बुद्ध मूर्ती आपल्याला दिसतात.

हेही वाचा : आत्महत्यांचा इतिहास आणि आजचे गंभीर स्वरूप

वज्रमुद्रा

गौतम बुद्धांची ही मुद्रा पंचतत्त्व म्हणजेच वायू, जल, अग्नी, पृथ्वी आणि आकाश यांना दर्शवते. या मुद्रेत उजव्या हाताची मूठ करून त्यात डाव्या हाताच्या तर्जनीला वरील दिशेने अशा प्रकारे ठेवले जाते की, उजव्या हाताची तर्जनी तिला स्पर्श करू शकेल. परंतु, यामध्ये भेद आढळतात. काही ठिकाणी वज्रमुद्रेत तर्जनी सरळ रेषेत ठेवून उर्वरित तीन बोटे मिटली जातात. त्यांना अंगठ्याच्या नखाचे टोक स्पर्श करेल असा अंगठा दुमडला जातो. नाग मुद्रा आणि वज्र मुद्रा यामध्ये अभ्यासकांचे मतैक्य नाही आहे.

वितर्कमुद्रा

अभय आणि वरदमुद्रेला समानच असणारी वितर्कमुद्रा आहे. या मुद्रेत अंगठा आणि तर्जनीच्या वरील भागाला जोडले जाते आणि इतर बोटांना सरळ ठेवले जाते. या मुद्रेचा अर्थ ज्ञानावरती वाद-प्रतिवाद करणे असा होतो.

हेही वाचा : कथा सीतेची…

उत्तरबोधीमुद्रा

गौतम बुद्धांची ही मुद्रा दिव्य सार्वभौमिक ऊर्जेसोबत स्वतःला जोडून सर्वोच्च आत्मज्ञानाची प्राप्ती दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हृदयाजवळ ठेवून दोन्ही हातांच्या तर्जनी एकमेकांना स्पर्श करीत वरच्या दिशेने असतात तर इतर बोटे ही आतल्या बाजूने मोडलेली असतात.

​अंजली -नमस्कारमुद्रा

गौतम बुद्धांच्या अंजलीमुद्रेला ‘नमस्कारमुद्रा’ किंवा ‘हृदयांजलीमुद्रा’, असेही म्हटले जाते. ही मुद्रा अभिवादन, प्रार्थना आणि आराधना दर्शवते. या मुद्रेत दोन्ही हात हे पोटाच्या वर मोडलेल्या स्थितीत असतात, हातांचे तळहात हे एकमेकांना जोडलेले असून दोन्ही हातांची बोटे एकमेकांना स्पर्श करीत असतात.

गौतम बुद्धांनी आपल्या तत्त्वज्ञानातून ज्ञानप्रसार केलाच. पण, त्यांच्या हस्तमुद्रा आणि भावमुद्राही ज्ञानपूर्ण आणि अर्थपूर्ण राहिल्या आहेत.

Story img Loader