Kulbhushan Jadhav Case Status : पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी मुफ्ती शाह मीर याची शुक्रवारी (तारीख ७ मार्च) गोळ्या झाडून हत्या केली. मशिदीतून नमाज पठणानंतर बाहेर पडत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्याच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात मीर याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये हत्येच्या घटना वाढल्या आहेत. आठवडाभरापूर्वी पाकिस्तानमधील जिहाद विद्यापीठात कट्टरतावाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला होता, ज्यामध्ये तालिबानशी संबंधित हमीद उल हक याच्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, मुफ्ती शाह मीर कोण होता? त्याने भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव याच्या अपहरणात आयएसआयला कशी मदत केली होती? याबाबत जाणून घेऊ.
मुफ्ती शाह मीर कोण होता?
पीटीआयच्या वृत्तानुसार, मुफ्ती शाह मीर हा अनेक वर्षांपासून पाकिस्तानी लष्करासाठी हेरगिरी करत होता. त्याचे आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेबरोबर चांगले संबंध होते. बलूच भागातील प्रत्येक हालचालींची माहिती तो लष्कराला देत होता. मानवी तस्करी आणि शस्त्रास्त्र तस्करीमध्ये सहभागी असलेला मुफ्ती मीर हा इस्लामिक कट्टरपंथी संघटना जमियत उलेमा-ए-इस्लामचा सदस्यही होता. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार, हल्लेखोरांनी मीर याच्यावर गोळ्या झाडल्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.
आणखी वाचा : उंदीर आणि रानडुक्कर खाणे सुरू करा, अमेरिकन संस्थेचा नागरिकांना सल्ला; नेमकं कारण काय?
भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात मुफ्ती मीरने पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयला मदत केली होती. अपहरणानंतर कुलभूषण जाधव यांना इराणमधून पाकिस्तानात नेण्यात आलं. त्यांच्यावर भारतीय हेर असल्याचा आरोप करण्यात आला. एप्रिल २०१७ मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने जाधव यांना हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. भारताने या निर्णयाचा तीव्र निषेध केला होता आणि या प्रकरणात पारदर्शकता राखली गेली नसल्याचं म्हटलं होतं.
कुलभूषण जाधव प्रकरण काय आहे?
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलातील माजी अधिकारी होते. १४ वर्ष सेवा केल्यानंतर त्यांनी मुदतीपूर्वीच निवृत्ती घेतली २००३ मध्ये ते निवृत्त झाल्याचा दावा भारत सरकारने केला आहे. निवृत्ती स्वीकारल्यानंतर कुलभूषण जाधव यांनी इराणमधील चाबहार बंदरमधून आयात-निर्यातचा व्यवसाय सुरु केला. त्यांच्याकडे हुसैन मुबारक पटेल या नावाने पासपोर्टही होता. २००३ मधून पुण्यातील पासपोर्ट शाखेतून त्यांनी हा पासपोर्ट मिळवला होता. ३ मार्च २०१६ रोजी पाकिस्तानी लष्कराने सांगितले की, त्यांनी कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान प्रांतातून अटक केली आहे. त्यांच्यावर हेरगिरी आणि पाकिस्तानविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय आहे. दुसरीकडे भारताने असा दावा केला होता की, पाकिस्तानच्या आयएसआय संघटनेनं कट रचून जाधव यांचे इराणमधून अपहरण केले. कुलभूषण जाधव यांच्या अटकेनंतर भारत सरकारने त्याच दिवशी पाकिस्तानकडे कॉन्सुलर ॲक्सेसची मागणी केली होती.
पाकिस्तानी न्यायालाने सुनावली फाशीची शिक्षा
२१ मार्च २०१७ रोजी पाकिस्तानने एक नोट व्हर्बेल जारी केले, ज्यामध्ये असे म्हटले होते की, भारताने केलेल्या कॉन्सुलर ॲक्सेसच्या मागणीवर पाकिस्तान सरकार विचार करेल. मात्र, त्याच वर्षी पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. यादरम्यान पाकिस्तानने जाधव हे त्यांच्यावरील आरोपांची कबुली देत असल्याचा एक व्हिडीओ शेअर केला. दरम्यान, जाधव यांना पाकमधील लष्करी न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर मे २०१७ मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. भारत सरकारचा असा दावा होता की, जाधव यांनी त्यांच्यावरील आरोपांची कबुली देताना पाकिस्तानने दाखवलेला व्हिडीओ बनावट आहे.
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती
१८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हडेलहप्पी करणाऱ्या पाकिस्तानला फटकारले होते. तीन दिवस चाललेल्या युक्तिवादानंतर आंतरराष्ट्रीय न्यायलयाने फाशीला स्थगिती दिली होती. या प्रकरणी अंतिम निकाल लागेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होता कामा नये, असे न्यायालयाने पाकला बजावले होते. पाकिस्तानने या प्रकरणाचा आढावा घ्यावा आणि कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेचा पुनर्विचार करावा, असे आदेशही आंतराष्ट्रीय न्यायालयाने दिले. सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी या प्रकरणात बाजू मांडली होती. डिसेंबर २०१७ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना त्यांच्या पत्नी आणि आईला भेटण्याची परवानगी दिली.
हेही वाचा : नवरत्न दर्जा म्हणजे काय? तो कशामुळे मिळतो? रेल्वेच्या दोन कंपन्यांना काय होणार फायदा?
कुलभूषण यांना पत्नी आणि आईला भेटण्याची परवानगी
अटकेच्या २२ महिन्यांनतर कुलभूषण जाधव यांची आई अवंती जाधव व पत्नी चेतनकूल जाधव यांच्याशी पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या आघा शाही येथील पार्किंग लॉटमध्ये असलेल्या शिपिंग कंटेनरमध्ये भेट झाली. कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना काचेच्या पलीकडून भेटण्याची परवानगी देण्यात आली होती. यावेळी जाधव यांनी बंद काचेच्या खोलीमधून स्पीकरच्या माध्यमातून त्यांच्या आई व पत्नीशी संवाद साधला होता. यावेळी जाधव यांच्या आईनं अवंती जाधव यांनी मुलासाठी भेटवस्तू आणली होती, परंतु पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी ती भेटवस्तू कुलभूषण यांना दिली नाही.
कुलभूषण जाधव प्रकरणाची सध्याची स्थिती काय?
अंतिम निकाल येईपर्यंत भारताच्या माजी नौदल अधिकाऱ्याला सुरक्षा द्यावी तसेच त्यांची काळजी घेण्यात यावी, असे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तान सरकारला दिले. यानंतर पाकिस्तान सरकारने जाधव यांना पुनर्विचार अर्ज दाखल करण्याची परवानगी देण्यासाठी एक विशेष अध्यादेश जारी केला होता. २०२० मध्ये पाकिस्तान सरकारने जाधव यांचा पक्ष मांडण्यासाठी वकिलाची नियुक्ती करावी असं भारताला सांगितलं होतं. मात्र, नियुक्ती केलेला वकील हा पाकिस्तानमधील असावा अशी अट त्यांनी घातली. परंतु, कुलभूषण जाधव यांची बाजू भारतीय वकीलच मांडेल असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. तेव्हापासून आतापर्यंत पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.