ख्रिश्चनबहुल असलेल्या इंग्लंड आणि वेल्स या देशात लहान मुलांच्या नावांच्या यादीत ‘मुहम्मद’ या नावाने अव्वल स्थान मिळविले आहे. २०२३ या वर्षात ४,६६१ बाळांचे मुहम्मद असे नामकरण करण्यात आले. या नावाने नोआ आणि ऑलिव्हर या लोकप्रिय नावांनाही मागे टाकले. इंग्लंडमध्ये लहान मुलांचे मुहम्मद असे नाव ठेवण्यामागे कारण काय, हा सांस्कृतिक बदल कशामुळे होत आहे, याचा आढावा…
मुहम्मद हे सर्वाधिक लोकप्रिय नाव का?
इंग्लंड आणि वेल्स या देशांमध्ये मुहम्मद या नावाची चलती आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या नावावरून मोहम्मद किंवा मुहम्मद अशी नावे ठेवण्याचा कल या दोन्ही देशांमध्ये वाढत आहे. ‘ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स’च्या (ओएनएस) आकडेवारीनुसार मोहम्मद किंवा मुहम्मद हे या देशांमधील सर्वात लोकप्रिय नाव बनले आहे. २०२३ मध्ये जन्मलेल्या एकूण ४,६६१ बाळांचे नामकरण मुहम्मद करण्यात आले. १९९७ पासून हे नाव पहिल्या १०० मध्ये आपले स्थान राखून होते. २०१६ पासून ते अव्वल १० मध्ये आले, तर २०२२ मध्ये ते दुसऱ्या क्रमांकाचे लोकप्रिय नाव होते. मात्र आता नोआ या नावाला मागे टाकून मुहम्मद हे नाव अव्वल स्थानी आले आहे. २०२३ मध्ये जन्मलेल्या ४,३८२ मुलांची नावे नोआ, तर ३,५८२ मुलांची नावे ऑलिव्हर ठेवण्यात आली. जॉर्ज या लोकप्रिय नावाला या तीनही नावांनी मागे टाकले. २०२२ मध्ये ४,१७७ बालकांचे नाव मुहम्मद ठेवण्यात आले. मुलींमध्ये ऑलिव्हिया, अमेलिया आणि इस्ला ही नावे अव्वल तीन स्थानी कायम आहेत.
हेही वाचा >>>विश्लेषण : ‘उपमुख्यमंत्री’ असे घटनात्मक पदच नाही… मग शपथ घेणे कितपत योग्य? न्यायालय काय म्हणते?
मुहम्मद या नावाविषयी कल का वाढत आहे?
युरोपमधील अनेक देशांमध्ये मुस्लीम धर्मियांची संख्या वाढत आहेत. इस्लाम धर्मसंस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या नावावरून माेहम्मद हे नाव अनेक मुस्लीम धर्मियांमध्ये अजूनही ठेवले जाते. मुस्लिम कौन्सिल ऑफ ब्रिटनच्या मते, इंग्लंड आणि वेल्सची लोकसंख्या सुमारे सहा कोटी आहे, ज्यात ३८ लाख ७० हजार लोकसंख्या मुस्लिमांची आहे. २०२१च्या जनगणनेनुसार ख्रिश्चनांची लोकसंख्या इंग्लंडमध्ये २,६१,६७,८९९ (४६.३ टक्के) तर वेल्समध्ये १३,५४,७७३ (४३.६ टक्के) आहे. मुस्लिमांची लोकसंख्या इंग्लंडमध्ये ३८,०१,१८६ (६.७ टक्के) तर वेल्समध्ये ६६,९४७ (२.२ टक्के) आहे. २०११ आणि २०२१ दरम्यान इंग्लंड आणि वेल्सची लोकसंख्या ३५ लाखांनी वाढली. या वाढीपैकी ११ लाख ६० हजार मुस्लीम धर्मियांचा वाढ आहे. इतर धर्मियांमध्ये लहान मुलांची नावे ठेवण्यामागे विविधता आहे. मुस्लीम धर्मियांमध्ये अशी विविधता असली तरी पवित्र म्हणून मोहम्मद किंवा मुहम्मद हे नाव अधिक प्रमाणात ठेवले जाते.
मोहम्मद, मुहम्मद आणि…
ब्रिटनमधील अधिकृत माहिती व आकडेवारीनुसार इंग्लंड आणि वेल्समधील १० पैकी चार प्रदेशांमध्ये, मुख्यतः उत्तर आणि पश्चिम मिडलँड्स तसेच लंडनमध्ये ‘मुहम्मद’ हे मुलांचे सर्वात लोकप्रिय नाव आहे. मुहम्मद या अरबी नावाची आणखी दोन रूपे म्हणजे इंग्रजी स्पेलिंग बदलून अव्वल १०० नावांमध्ये आहे. जसे Mohammed हे २८ व्या क्रमांकावर तर Mohammad हे ६८ व्या क्रमांकावर आहे. इंग्लंडची राजधानी लंडनमध्येही मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत ओहे. २०२१ च्या जनगणनेनुसार इंग्लंडमध्ये १३,१८,७५५ मुस्लीम असून हा शहरातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा धर्म आहे. लंडनच्या प्रशासनासह अनेक मोठ्या पदांवर मुस्लीम धर्मीय व्यक्ती कार्यरत आहे. २०१६ पासून लंडनच्या महापौरपदी विराजमान सादीक खान हे पाकिस्तानी वंशाचे मुसलमान आहेत. विशेष म्हणजे महापौरपदाची माळ त्यांच्या गळ्यात तिसऱ्यांदा पडली आहे. लंडनमध्येही मोहम्मद हे नाव ठेवण्याचा कल वाढत आहे.
हेही वाचा >>>४०,००० हून अधिक भारतीयांना अटक; अमेरिका-कॅनडा सीमेवर बेकायदा मार्गाने घुसखोरी वाढली, कारण काय?
मोहम्मद या शब्दाचा अर्थ किंवा उत्पत्ती?
जगातील अनेक देशांमध्ये मोहम्मद हे नाव ठेवले जाते. मोहम्मदचा अनुवाद प्रशंसनीय असा होतो. मात्र इस्लाम प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याशी संबंध असल्याने हे नाव ठेवण्यात येते. मुस्लिमांमध्ये या नावाला आदर असल्याने वर्षोनुवर्षे हे नाव टिकले आहे. पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका आणि पाकिस्तानमध्ये मुहम्मद नावाचे अंदाजे ६० टक्के नागरिक राहतात. मोहम्मद आणि अहमद ही दोन्ही नावे ‘हमद’ या मूळ शब्दापासून आली आहेत, ज्याचा अर्थ स्तुती आहे. अहमद या नावाचा अर्थ असा आहे की ज्याची खूप प्रशंसा केली जाते आणि मोहम्मद म्हणजे ज्याचे सुंदर गुण आणि गुणधर्म इतर सर्वांपेक्षा जास्त आहेत. दुसऱ्या शब्दांत, त्याच्याकडे प्रशंसनीय गुणधर्म आहेत.
जगातही मोहम्मद नाव ठेवण्याचा कल?
केवळ इंग्लंड किंवा वेल्स नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये मोहम्मद किंवा मुहम्मद हे नाव ठेवण्याचा कल दिसतो. जगातील सर्वात लोकप्रिय नाव म्हणूनही या नावाने अव्वल स्थान मिळविले आहे. जगातील अंदाजे १५ कोटी लोक मोहम्मद हे नाव धारण करतात, ज्याचे शब्दलेखन ठिकाणानुसार बदलते. पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका आणि पाकिस्तानमध्ये मुहम्मद नावाचे अंदाजे ६० टक्के नागरिक राहतात. अल्जीरिया, इजिप्त, लिबिया, मोरोक्को, अरब देश, इराण, इस्रायल, जॉर्डन, मलेशिया, पाकिस्तान, ताजिकिस्तान या देशांमध्ये मोहम्मद हेच नाव अव्वल स्थानी आहे. युरोपमध्ये केवळ इंग्लंड आणि वेल्स या देशांमध्येच मुहम्मद नाव अव्वल स्थानी आहे. इतर युरोपीय देशांमध्ये नोआ, ऑलिव्हर, मार्क, जॅक, लुका, गॅब्रियल ही नावे प्रसिद्ध आहेत.
भारतात कोणती नावे ठेवण्याचा कल?
भारतात बाळांची नावे ठेवण्याचा कल काळानुसार बदलला. १९६०च्या दशकापूर्वी देवांची, महान राजांची किंवा धार्मिक नावे ठेवण्याचा कल होता. त्यानंतर लोकप्रिय नावे ठेवण्याकडे कल वाढला. पुढे आई-वडिलांना अर्थ माहीत असलेली वेगळी नावे ठेवण्याचा कल वाढला. भारतातही सर्वाधिक मुलांची नावे मोहम्मदच ठेवत असल्याचे आकडेवारी सांगते. भारतात मुस्लीम लोकसंख्या आणि मोहम्मद नाव ठेवण्याकडेच असलेला कल यांमुळे मुस्लिमांमध्ये हेच नाव अधिक प्रमाणात ठेवले जाते. मोहम्मदनंतर आरव, शिवांश, हृदयन, ध्रुव, कबिर, वेदांत, किआन, विराज यांसारखी भारतीय संस्कृतीशी संबंधित असलेली नावे ठेवली जात आहेत. मुलींमध्येही आर्या, कियारा, आध्या, वामिका, परी, जिया या नावांची चलती आहे. भारतातील पालकांमध्ये संस्कृती आणि विश्वासाशी निगडित नावे हा स्पष्ट कल आहे. अथर्व, श्लोक, वेद, रुद्र आणि क्रिश ही २०२३ मधील लहान मुलांची ठेवलेली लोकप्रिय नावे आहेत. इब्राहीम, डॅनियल, एथन आणि सय्यद ही नावेही धर्मानुसार मोठ्या प्रमाणात ठेवली जात आहे.
sandeep.nalawade@expressindia.com