एकेकाळचा कुख्यात गुंड आणि सध्या राजकारणात मोठे प्रस्थ निर्माण केलेल्या मुख्तार अन्सारीला काँग्रेसचे नेते अजय राय यांचे भाऊ अवधेश राय यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मागील ३० वर्षांपासून हा खटला सुरू होता. ३ ऑगस्ट १९९१ रोजी अवधेश राय यांची हत्या करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर अवधेश राय हत्या प्रकरण नेमके काय आहे? मुख्तार अन्सारीवर नेमके कोणते आरोप करण्यात आले होते? हे जाणून घेऊ या….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्तार अन्सारी याला जन्मठेपेची शिक्षा

अगोदर कुख्यात गुंड असलेला आणि नंतर राजकारणात आलेल्या मुख्तार अन्सारीला सोमवारी (५ जून) न्यायालयाने अवधेश राय हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अवधेश राय हे काँग्रेसचे नेते अजय राय यांचे मोठे बंधू होते. वाराणसीमधील मालदिया येथील घरासमोर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. हत्या झाली तेव्हा ते ३० वर्षांचे होते. अवधेश राय यांचे बंधू अजय राय हे मोठे राजकारणी आहेत. ते सध्या काँग्रेसमध्ये असून याआधी ते भाजपामध्ये होते. विशेष म्हणजे २०१९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

हेही वाचा >> विश्लेषण: आता चक्क सिगारेटवरही सावधानतेचा इशारा… कॅनडात सिगारेटविषयी नवे नियम काय आहेत?

अवधेश राय हत्या प्रकरण नेमके काय आहे?

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार ३ ऑगस्ट १९९१ रोजी अवधेश राय हे वारणसीमधील मालदिया येथे त्यांच्या राहत्या घराच्या बाहेर उभे होते. यावेळी काही मारेकरी त्यांच्या कारकडे आले आणि त्यांनी अवधेश राय यांच्यावर गोळीबार केला. यावेळी अजय राय आणि त्यांचे सहकारी विजय पांडे घटनास्थळी उपस्थित होते. या दोघांनी अवधेश राय यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र उशीर झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वर्चस्ववादाच्या लढाईतून झाली होती हत्या

या घटनेनंतर चेतगंज पोलिसांनी मुख्तार अन्सारी, अब्दुल कलाम, भीम सिंह, कमलेश सिंह, राकेश कुमार श्रीवास्तव अशा एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. अजय राय यांनी या पाच जणांविरोधात पोलिसांनी तक्रार दिली होती. अवधेश राय यांच्यावर गोळीबार होताना मुख्तार अन्सारी घटनास्थळी उपस्थित होता, असा दावा अजय राय यांनी केला होता. माजी सरकारी वकील अलोक चंद्रा यांच्या म्हणण्यानुसार स्थानिक पातळीवर वर्चस्ववादाच्या लढाईनतून अवधेश राय यांची हत्या करण्यात आली होती.

हेही वाचा >> विश्लेषण : जडेजा की अश्विन; की दोघेही? ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम लढतीत कोणाला मिळणार संधी?

सुनावणीदरम्यान दोघांचा मृत्यू

दरम्यान, काही काळानंतर या खटल्याचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांकडे सोपवण्यात आला होता. मागील अनेक वर्षांपासून या खटल्यासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू होती. त्यामुळे या खटल्यातील आरोपी अब्दुल कलाम आणि कमलेश यांचा मृत्यू झालेला आहे. तर भीम सिंह आणि राकेश श्रीवास्तव यांच्या विरोधातील खटला अद्याप सुरूच आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर अजय राय यांनी काय प्रतिक्रिया दिली?

अवधेश राय हत्याप्रकरणात मुख्तार अन्सारी याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्यानंतर अवधेश राय यांचे बंधू अजय राय यांनी समाधान व्यक्त केले आहे. “मागील अनेक वर्षांपासून आम्ही न्याय मिळण्याची वाट पाहात होतो. आता आमचे वाट पाहणे संपलेले आहे. माझे पालक, मी, अवधेशची मुलगी आणि आमच्या संपूर्ण कुटुंबाने या काळात खूप वाट पाहिली. मागील काही वर्षांमध्ये अनेक पक्षांचे सरकार आले आणि गेले. त्यामुळे मुख्तार अन्सारीची ताकद चांगलीच वाढली होती. मात्र आम्ही हार मानली नाही. आमच्या वकिलांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळे माझ्या भावाच्या हत्या प्रकरणात आज मुख्तार अन्सारीला दोषी ठरवले गेले,” अशी प्रतिक्रिया अजय राय यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >> ओपेक प्लस देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन का घटवले?

अजय राय कोण आहेत?

अजय राय आतापर्यंत पाच वेळा आमदार झालेले आहेत. याआधी त्यांचे कुख्यात गुंड ब्रिजेश सिंह यांच्याशी जवळचे संबंध होते, असे म्हटले जायचे. ते भूमिहार समाजातून येतात. त्यामुळे वाराणसी मतदारसंघात ते भूमिहार आणि ब्राह्मण मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करताना दिसतात. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी ते भाजपा, समाजवादी पक्षात होते. अजय राय यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपा पक्षातून केली. ते कोलासा या मतदारसंघातून तीन वेळा निवडून आले होते. पुढे भाजपाने २००९ साली या मतदारसंघातून मुरली मनोहर जोशी यांना तिकीट देण्याचे ठरवल्यानंतर अजय राय यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आणि समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत मात्र ते तिसऱ्या स्थानी राहिले. २०१२ साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या मध्यस्थीने राय यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला होता.

अजय राय यांना सुरक्षा पुरवण्याची काँग्रेसने केली होती मागणी

हेही वाचा >>घातपात की तांत्रिक बिघाड? कोरोमंडल रेल्वेचा अपघात नेमका कशामुळे? जाणून घ्या…

२०१४ साली अजय राय यांनी मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी मुख्तार अन्सारी यांच्या कौमी एकता दल पक्षाने राय यांना पाठिंबा दिला होता. उत्तर प्रदेश पोलिसांनी २०२१ साली पंजाब पोलिसांकडून मुख्तार अन्सारी यांच ताबा घेतला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पाटेल यांना पत्र लिहून अजय राय यांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी केली होती.