समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे ८२ व्या वर्षी निधन झाले. ऑगस्ट महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. २ ऑक्टोबर रोजी त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मुलायमसिंह यादव यांच्या जाण्याने देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून देशाची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा >>> विश्लेषण: दिल्लीतील सामूहिक धर्मांतरानंतर वाद का झाला? भाजपा ‘आप’वर देश फोडण्याचा आरोप का करतंय?
मुलायमसिंह यादव यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९३९ रोजी उत्तर प्रदेशमधील इटावा जिल्ह्यातील सैफाई या गावी झाला. त्यांनी सलग तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद तसेच केंद्रीय संरक्षणमंत्रीपदही भुषवले होते. ते मागील पाच दशकांपासून राजकारणात होते. ते आमदार म्हणून एकूण १० वेळा तर खासदार म्हणून एकूण ७ वेळा निवडून आलेले होते. ते संसदेतील एक वरिष्ठ आणि अनुभवी सदस्य होते. आझमगड, सांभाल तसेच मैनपुरी या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेले होते. त्यांना लोक आदराने नेताजी म्हणत. उत्तर प्रदेशमध्ये ते पहिल्यांदा १९६७ साली वयाच्या २८ व्या वर्षी आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
हेही वाचा >>> विश्लेषण : रणबीर कपूरने बाळासाठी घेतलेल्या पॅटर्निटी लीव्हचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या कायदा आणि तरतुदी
मुलायमसिंह यादव यांना एकूण चार भाऊ आणि एक बहीण आहे. त्यांच्या बहिणीचे नाव कमलादेवी आहे. राम गोपाल यादव आणि गीता देवा हे त्यांचे चुलत भाऊ-बहीण आहेत. मुलायमसिंह यादव हे बंधू अभय राम, शिवपाल, राम गोपाल सिंह, बहीण कमलादेवी यांच्यापेक्षा मोठे तर बंदू रतनसिंह यांच्यापेक्षा लहान होते. मुलायमसिंह यादव यांनी दोन लग्नं केली. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मालती देवी असून दुसऱ्या पत्नीचे नाव साधना गुप्ता असे आहे. मुलायमसिंह यादव यांना अखिलेश यादव आणि प्रतिक यादव अशी दोन मुलं आहेत. प्रतिक यादव यांच्या पत्नी अपर्णा यादव यांनी २०२२ साली भाजपामध्ये प्रवेश केला. सून डिंपल या खासदार आहेत.
हेही वाचा >>> विश्लेषण : शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ चिन्ह निवडणूक आयोगानं का गोठवलं?
मुलायमसिंह यादव यांचे मोठे पुत्र अखिलेश यादव हे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष आहेत. अखिलेश यादव करहाल मतदारसंघातून आमदार आहेत. सध्या ते विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. मुलायमसिंह यादव यांचे बंधू शिवपालसिंह यादव हे प्रगतीशील समाजवादी पार्टीचे अध्यक्ष तथा आमदार आहेत. तर चुलत बंधू राम गोपाल यादव हे राज्यसभेचे सदस्य आहेत. राम गोपाल यादव यांचे पुत्र अक्षय यादव हे फिरोजाबादचे माजी खासदार आहेत. धर्मेंद्र यादव हे मुलायमसिंह यादव यांचे पुतणे असून तेही बदायूँ लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. मैनपुरीचे माजी खासदार तेजप्रताप यादव हे मुलायमसिंह यांचे नातू आहेत.