२००८ साली झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पाप लोकांना तसंच अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. या हल्ल्यातील एक आरोपी दहशतवादी तहव्वूर राणा याला अमेरिकी पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर भारताने त्याचे प्रत्यार्पण व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले होते. अखेर आता त्याची रवानगी अमेरिकेतून भारतात होणार असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
तहव्वूर राणा या २६/११ च्या हल्ल्यातील आरोपीचा खटला येत्या काळात दिल्लीत चालवण्यात येण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून त्याच्या प्रत्यार्पणाचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. आता नवी दिल्लीत त्याला आणण्याची तयारी सुरू झाली आहे. अमेरिकेने याबाबत जाहीर केल्यानंतर एनआयएची एक टीम यासाठी तयार करण्यात आली आहे.

तहव्वूर राणाचा खटला दिल्लीत होणार?

दिल्लीतील न्यायालयाने मुंबई हल्ल्यातील आरोपी राणा याच्यावरील सर्व खटल्याच्या नोंदी मुंबई न्यायालयाकडून मागवल्या आहेत. भारतात एकीकडे राणाच्या प्रत्यार्पणाची तयारी सुरू असतानाच पटियाला हाऊस न्यायालयाने राणावरील न्यायालयीन खटल्याच्या नोंदी मागवल्या आहेत. या हल्ल्यासंबंधित अनेक खटले दोन्ही राज्यांमध्ये सुनावणीसाठी असल्याचे सांगितले जात आहे.

जिल्हा न्यायाधीश विमल कुमार यादव यांनी मुंबई न्यायालयाला खटल्याच्या सर्व नोंदी देण्याचे निर्देश दिले आहेत. खटल्यासंदर्भातील नोंदी मिळवण्यासाठीची याचिका एनआयएने दाखल केल्यानंतर हे निर्देश देण्यात आले होते.

अमेरिकेकडून राणाच्या प्रत्यार्पणाचे मार्ग मोकळे
फेब्रुवारीच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेला भेट दिली होती. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करणार असल्याचे सांगितले. “मला हे सांगताना आनंद होत आहे की, माझ्या प्रशासनाने राणासारख्या जगातल्या सर्वात पापी माणसाला भारतात पाठवण्याची परवानगी दिलेली आहे.” त्याच्यावरील खटल्यासाठी त्याला भारतात पाठवले जाणार असल्याचे ट्रम्प यांनी मोदींसोबत आयोजित एका पत्रकार परिषदेत सांगितले.

यासंदर्भात आमच्याकडे अनेक विनंत्या आल्या आहेत. आम्ही गुन्हेगारीबाबत भारतासोबत कामही करत आहोत आणि भारतासाठी आम्हाला अनेक फायदेशीर गोष्टी करायच्या आहेत, असेही ट्रम्प यांनी यावेळी सांगितले. गेल्या महिन्यात राणाने अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळत त्याचे प्रत्यार्पण करण्याची परवानगी दिली. याआधीही भारतात प्रत्यार्पणाविरोधात राणाच्या अनेक याचिका वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये फेटाळण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात राणाने पुन्हा या विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, २१ जानेवारी २०२५ ला ही शेवटची याचिकादेखील फेटाळत त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग अमेरिकी प्रशासनाने मोकळा केला. स्वत:वरील सर्व आरोप फेटाळणाऱ्या राणाला सध्या लॉस एंजेलिसमधील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटर इथे ठेवलेले आहे.

तहव्वूर राणावर काय आरोप आहेत?

६४ वर्षीय तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडियन नागरिक आहे. त्याच्यावर २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य सूत्रधार डेव्हिड हेडली याला सहकार्य केल्याचा आरोप आहे. काही काळासाठी त्याने पाकिस्तानी सैन्यात डॉक्टर म्हणून काम केले, त्यानंतर तो कॅनडात राहिला. नंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला आणि तिथे त्याने फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन सर्व्हिस देणाऱ्या कंपन्या शिकागो आणि इतर ठिकाणी सुरू केल्या. २००७ ते २००८ च्या दरम्यान राणा हा अनेकदा भारतात आल्याचे हेडली याने सांगितले. हेडली याला २००९ मध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली होती. हेडली याने मुंबईत ही इमिग्रेशन सर्व्हिस कन्सलटन्सी सुरू करण्यासाठी राणाची मदत घेतली होती. याच कन्सलटन्सीच्या मदतीने हेडलीने हल्ल्यापूर्वी ताज हॉटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणांची रेकी केली होती. लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांसाठी संभाव्य धोक्यांचा अभ्यास त्याने केला होता.

२००८ मध्ये झालेल्या या हल्ल्यात १६६ लोकांनी जीव गमावला होता. तसंच २० सुरक्षा कर्मचारी आणि २६ परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते. राणा याला २००९ मध्ये शिकागोमधील ओहारे विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्याच्यावर मुंबई हल्ल्यासाठी साधनसामुग्री पुरवल्याचा आरोप आहे. हेडलीने दिलेल्या साक्षीनुसार, त्याला अमेरिकेतील कारागृहात १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तहव्वूरची सुटका करण्यात आली, पण पाच वर्ष तो पोलिस देखरेखीखाली होता. दरम्यान, राणाला मात्र मुंबई हल्ल्यात मदत केल्याच्या आरोपातून सुटका देण्यात आली. २०११ मध्ये एनआयएने नऊ लोकांविरुद्ध एक चार्जशीट दाखल केली, यामध्ये राणावर हल्ला घडवून आणण्यात मदत केल्याचा आरोप करण्यात आला. याव्यतिरिक्त दहशतवादी कट रचणे, गुन्हेगारी कृत्य करणे, खून असेही आरोप त्याच्यावर आहेत.

Story img Loader