–संदीप कदम
यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामाला शुक्रवारपासून (२२ मार्च) सुरुवात होणार आहे. दहा संघांचा सहभाग असलेल्या लीगच्या या हंगामात काही संघांच्या कामगिरीकडे विशेष लक्ष राहील.
मुंबई इंडियन्स (२०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२०)
इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासात सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्स संघाकडे पाहिले जाते. मुंबईचा संघ २४ मार्चला गुजरात जायंट्सविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. मुंबईने आतापर्यंत पाच जेतेपदे मिळवली आहेत. यंदा संघाची धुरा गुजरात संघातून मुंबईत आलेल्या हार्दिक पंड्याकडे असेल. त्याला रोहित शर्माच्या जागी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या हंगामात मुंबईला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले होते.
संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे निर्णायक क्षणी चमकदार कामगिरी करू शकतात. इशान किशन व सूर्यकुमार यादव आपल्या आक्रमक खेळीसाठी ओळखले जातात. तर, गुजरातकडून गेल्या दोन हंगामांत चांगली कामगिरी करून पंड्या मुंबईत आला आहे. संघासाठी गोलंदाजांच्या दुखापती चिंतेचा विषय ठरू शकतो. जसप्रीत बुमरा व जेराल्ड कोएट्जी तंदुरुस्त आहे. जेसन बेहरनडॉर्फने दुखापतीमुळे हंगामातून माघार घेतली आहे. तसेच, दिलशान मदुशंकाही जायबंदी आहे. संघात मोहम्मद नबी, पीयूष चावला व श्रेयस गोपालच्या रूपात फिरकीपटू आहेत. मात्र, तरीही त्यांची फिरकीची बाजू कमकुवत दिसत आहे.
बलस्थाने
मुंबईच्या संघाकडे जागतिक स्तरावरचे फलंदाज आहेत. सलामीला संघाकडे अनुभवी रोहित शर्मा व इशान किशन असतील. यानंतर संघाकडे सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड व हार्दिक पंड्या यांचा क्रमांक लागतो.
मुंबईच्या संघाकडे चांगले अष्टपैलू आहेत. ज्यामध्ये फिरकी व वेगवान गोलंदाजीचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे कर्णधाराकडे फलंदाजी व गोलंदाजीकरिता चांगले पर्याय आहेत. कोएट्जी, नुवान तुषारा, मदुशंका व त्यातच पंड्याची भर पडल्याने गोलंदाजी आक्रमक आणखी भक्कम दिसत आहे.
कच्चे दुवे
मुंबईने रोहितच्या नेतृत्वात पाच जेतेपदे मिळवली आहेत. त्याच्या जागी या हंगामात पंड्या संघाचे नेतृत्व करेल. पंड्याने गुजरात संघाचे नेतृत्व करताना संघाला दोन्ही वेळा अंतिम फेरीपर्यंत पोहोचवले व एकदा जेतेपद मिळवून दिले. त्यामुळे कर्णधार बदलण्याचा निर्णय संघाच्या पथ्यावर पडतो का हे पाहावे लागेल.
संघाकडे पीयूष चावला व कुमार कार्तिकेयच्या रूपात दोन फिरकीपटू आहेत. संघाकडे फिरकी गोलंदाजांचे पर्याय कमी आहेत.
चेन्नई सुपर किंग्स (२०१०, २०११, २०१८, २०२१, २०२३)
गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सचा सामना यंदाच्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाशी होणार आहे. कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईचा संघ हा यंदाही चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असेल. धोनीने गेल्या हंगामात १८२.४६च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. ऋतुराज गायकवाड व रवींद्र जडेजाही संघासाठी निर्णायक ठरू शकतात.
डेव्हॉन कॉन्वे व मथीश पथिराना जायबंदी झाल्याने संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. चेन्नईने गेल्या लिलावात सहा खेळाडू आपल्या ताफ्यात घेतले. यामध्ये समीर रिझवी, डॅरेल मिचेल, शार्दूल ठाकूर, रचिन रवींद्र, अवनीश राव अरावेली व मुस्तफिझुर रहमान यांचा समावेश आहे. संघाकडे चांगल्या अष्टपैलूंचा भरणा आहे. जी संघाच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
बलस्थाने
चेन्नईची फलंदाजी भक्कम दिसत आहे. सलामीवीर ऋतुराज गेल्या काही हंगामात संघासाठी निर्णायक कामगिरी करीत आहे. त्याला रवींद्र व अजिंक्य रहाणे यांची साथ मिळेल. यासह संघाच्या मध्यक्रमात मोईन अली, जडेजा, मिचेल व धोनी यांचा क्रमांक लागतो.
गेल्या लिलावातील खेळाडूंच्या खरेदीमुळे चेन्नईकडे अष्टपैलूंचे चांगले पर्याय उपलब्ध झाले आहेत. संघाकडे सध्या नऊ अष्टपैलू आहेत.
रहमान व शार्दूल संघात आल्याने सामन्याच्या निर्णायक षटकांमध्ये गोलंदाजीसाठी संघाकडे पर्याय आहेत. यासह जडेजा, अली, सँटनर व महीश थिकसाना यांच्याकडे संघाकडे चांगले फिरकीपटू आहेत.
कच्चे दुवे
कॉन्वे दुखापतीमुळे ‘आयपीएल’च्या काही सामन्यांना मुकणार आहे. त्यामुळे ऋतुराजसोबत नवीन पर्याय संघाला शोधावा लागेल.
संघाकडे मुस्तफिझुर व शार्दूल यांच्या रूपात मध्यमगती गोलंदाज आहेत. मात्र, संघाला वेगवान गोलंदाजाची कमतरता जाणवेल. तसेच, विदेशी खेळाडूंचे पर्याय संघाकडे असल्याने अंतिम अकराची निवड करताना संघ व्यवस्थापनाची कसरत होईल.
आणखी वाचा- आइन्स्टाईनच्या मेंदूची चोरी आणि २४० तुकडे; जाणून घ्या महान वैज्ञानिकाच्या मृत्यूनंतरचे गूढ
गुजरात टायटन्स (२०२२)
गुजरात संघाने गेल्या दोन हंगामांत आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. २०२२मध्ये जेतेपद मिळवल्यानंतर गेल्या वर्षी त्यांनी अंतिम फेरी गाठली होती. मात्र, त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या वेळी संघात हार्दिक पंड्याही नसेल. संघाची धुरा ही सध्या शुभमन गिलकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे यंदाही संघाकडून सातत्यपूर्ण कामगिरीची अपेक्षा असेल.
संघाची फलंदाजी सध्या भक्कम दिसत आहे. गिल, केन विल्यम्सन, मॅथ्यू वेड व बी साई सुदर्शनसारखे खेळाडू संघाकडे आहेत. संघातील अष्टपैलू खेळाडूंचा भरणा ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. गोलंदाजीत संघाला अनुभवी मोहम्मद शमीची कमतरता जाणवेल. गुजरातकडे चांगले फिरकी गोलंदाज आहेत. रशीद खान, साई किशोर, नूर अहमद सारखे गोलंदाज सामन्याचे चित्र पालटण्यास सक्षम आहेत.
बलस्थाने
संघाकडे चांगले फलंदाज आहे. तसेच, ते आक्रमक खेळ करण्यास सक्षम आहेत. संघाची सर्वस्वी मदार ही गिल, मिलर व विल्यम्सन यांच्यावर असेल.
संघात फिरकीपटूंचे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे ते प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना अडचणीत आणू शकतात.
कच्चे दुवे
पंड्या अनुपस्थितीत संघाची धुरा ही गिलवर आहे. त्यामुळे गिलच्या नेतृत्वाचा चांगला कस या हंगामात लागेल. तसेच, कर्णधारपदाच्या जबाबदारीसह तो कशी फलंदाजी करतो याकडे सर्वांचे लक्ष राहील.
मोहम्मद शमी सहभाग नोंदवत नसल्याने संघाकडे वेगवान गोलंदाजांचे कमी पर्याय आहेत. मोहित शर्मा वगळल्यास इतर वेगवान गोलंदाजांकडे अनुभवाची कमतरता आहे.
आणखी वाचा- SL vs Ban: नागीण डान्स, टाईम आऊट मिमिक्री, हुज्जत आणि बाचाबाची- श्रीलंका बांगलादेश एवढं हाडवैर का?
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु
यंदाच्या हंगामतील बंगळूरु आपला पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळणार आहे. बंगळूरु संघ आपल्या मजबूत फलंदाजीसाठी ओळखला जातो. कर्णधार फॅफ ड्युप्लेसिस, विराट कोहली, कॅमेरुन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल आणि दिनेश कार्तिकसारखे आक्रमक फलंदाज आहेत.
मॅक्सवेलने गेल्या हंगामात ४०० धावा केल्या होत्या. तर, ग्रीनने ४५२ धावा करीत चमक दाखवली होती. संघाकडे चांगले फलंदाज असले तरीही, संघाला निर्णायक क्षणी खेळ उंचावताना अडचणी येत आहेत. त्यामुळे संघाला अजून एकदाही जेतेपद मिळवता आलेले नाही. संघाने गेल्या लिलावात मोहम्मद सिराज, अल्जारी जोसेफ व लॉकी फर्ग्युसनसारख्या गोलंदाजांना आपल्या ताफ्यात घेतले.
बलस्थाने
फॅफ, विराट, रजत पाटीदार, मॅक्सवेल, ग्रीनसारख्या फलंदाजांमुळे संघ मजबूत भासत आहे. तसेच, मॅक्सवेल व ग्रीन हे विजयवीराची भूमिकाही पार पाडण्यात सक्षम आहेत.
जोसेफ व फर्ग्युसन संघात आल्याने गोलंदाजी भक्कम झाली आहे. त्यातच जोसेफ संघाच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकतो.
कच्चे दुवे
संघाकडे अनुभवी फिरकीपटूंची कमतरता आहे. त्यांच्याकडे मयांक डागर, राजन कुमार, हिमांशु शर्मा व कर्ण शर्मासारखे गोलंदाज आहेत.
संघाची कामगिरी निर्णायक क्षणी खालावते. संघाने आजवर पाच वेळा ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवले आहे. पण, त्यांना जेतेपद मिळवण्यात अपयश आले आहे. यंदा त्यांचा प्रयत्न महिला संघाप्रमाणे चमकदार कामगिरी करण्याचा राहील.
आणखी वाचा- पाकिस्तानच्या बंदरात चीनचं गुप्तहेर जहाज; भारताची काळजी का वाढली?
दिल्ली कॅपिटल्स
अपघातातून सावरलेल्या ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ यंदा जेतेपद मिळवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. पंतच्या पुनरागमनाने संघ मजबूत दिसत आहे. त्यामुळे संघात आक्रमक फलंदाजांच्या संख्येत भर पडली आहे. मात्र, अष्टपैलूंची कमतरता संघासाठी चिंतेची बाब आहे.
पंत आल्याने संघाची फलंदाजी भक्कम दिसत आहे. तो येण्याने संघाचे मनोबलही वाढेल. संघाकडे डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, पंत व रिकी भुईसारखे फलंदाज आहेत. तर, आनरिक नॉर्कीए, मुकेश कुमार, झाय रिचर्डसनसारखे वेगवान गोलंदाजांचे पर्याय संघाकडे आहेत. तसेच, फिरकीपटू कुलदीप यादवही चांगल्या लयीत आहे.
बलस्थाने
पृथ्वी, वॉर्नर आणि मार्शसारखे तीन आक्रमक फलंदाज संघाकडे आहेत. पंत आल्याने संघाचा मध्यक्रम मजबूत झाला आहे.
संघाकडे नॉर्कीए व झाय रिचर्डसनच्या रूपाने विदेशी वेगवान गोलंदाज आहेत. त्यांना मुकेश, इशांत शर्मा व खलील अहमद यांची साथ लाभेल.
कच्चे दुवे
मार्श व अक्षर पटेलच्या रूपाने संघात दोन अष्टपैलू आहेत. मात्र, इतर अष्टपैलूंचा अनुभव कमी असल्याने या दोघांवर जबाबदारी वाढली आहे. संघात ‘विजयवीरा’ची भूमिका सांभाळणाऱ्या खेळाडूंचीही कमरता आहे.
अक्षर व कुलदीपच्या रूपाने संघाकडे दोनच फिरकीपटू आहेत. या दोघांपैकी एकालाही दुखापत झाल्यास संघाला त्याचा फटका बसू शकतो.