मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक सागरी किनारा मार्गाच्या (कोस्टल रोड) एका टप्प्याचे उद्घाटन येत्या १९ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची चर्चा आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नसतानाही लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी काही भाग सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यावरून सध्या राजकीय वाद सुरू आहे.
कसा आहे प्रकल्प?
मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दक्षिण टोकापर्यंतचे बांधकाम सुरू असून प्रकल्पाचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गाची लांबी १०.५८ किलोमीटर आहे. समुद्राखालून जाणारे दोन समांतर बोगदे हे या सागरी किनारा मार्ग प्रकल्पाचे खास वैशिष्ट्य आहे. हा प्रकल्प प्रचंड व गुंतागुंतीचा आहे. या प्रकल्पात समुद्रात भराव टाकणे, भिंत बांधणे, रस्ता, बोगदे, समुद्री पदपथ, हिरवळीच्या जागा, वाहनतळ, उद्यान तयार करणे अशी अनेक कामे समाविष्ट आहेत.
प्रकल्पाचा खर्च किती?
या प्रकल्पाची मूळ किंमत १२,७२१ कोटी होती. मात्र जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के झाल्यामुळे व वरळी येथे पुलाच्या खांबांमधील अंतर वाढवून देण्याच्या मागणीमुळे या प्रकल्पाचा खर्च १३,९८३ .८३ कोटींवर गेला आहे. त्यात बांधकाम खर्च आणि इतर प्रशासकीय शुल्क यांचा समावेश आहे. आतापर्यंत ७९ टक्के म्हणजेच ११ हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत.
हेही वाचा : Indo-China relations: चीनचा महत्त्वाकांक्षी लष्करी प्रकल्प ‘शाओकांग’ आहे तरी काय?
प्रकल्पाचे किती काम पूर्ण झाले आहे?
प्रकल्पाचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांतर्गत २ महाबोगदे तयार करण्यात आले आहे. या दोन्ही बोगद्यांचे खनन पूर्ण झाले आहे. केवळ दक्षिण दिशेला जाणाऱ्या बोगद्याची आतील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. भराव टाकण्याचे काम ९७ टक्के पूर्ण झाले आहे. मात्र समुद्रभिंत बांधण्याचे काम ८४ टक्केच झाले आहे. आंतरबदलाचे काम ८५.५ टक्के पूर्ण झाले असून पूलाचे बांधकाम ८३ टक्के झाले आहे. वरळी डेअरी ते मरीन ड्राईव्हपर्यंतच्या टप्प्यात एका दिशेचे काम पूर्ण झाले असून समुद्राच्या जवळची उत्तर मुंबईत जाणारी बाजू अद्याप पूर्ण झालेली नाही.
प्रकल्पाच्या कामाला विलंब का?
या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाले होते. न्यायालयीन स्थगितीमुळे व टाळेबंदीमुळे अंतिम मुदत वारंवार वाढवण्यात आली होती. नंतर वरळी येथे पुलाच्या खांबांमधील अंतर वाढवून दिल्यामुळे कालावधी वाढला.
प्रकल्पाच्या उद्घाटनाची घाई का?
लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पाचा काही भाग सुरू करून मतदारांना आकर्षित करण्याचा भाजप-शिवसेना सरकारचा प्रयत्न आहे. या प्रकल्पांतर्गत असलेल्या दोन महाबोगद्यांपैकी दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याचा क्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जून २०२३ मध्ये साजरा करण्यात आला. तेव्हा या प्रकल्पाचा काही भाग तरी या वर्षाअखेरीस सुरू करावा अशी सूचना उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे या प्रकल्पाचा काही भाग नोव्हेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाने ठेवले होते. मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे आता एक टप्पा १९ फेब्रुवारीला सुरू होण्याची शक्यता आहे.
प्रकल्पाचा कोणता भाग सुरू होणार?
या मार्गाची वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंतची बाजू सुरू करण्यात येणार आहे. वरळी ते मरीन ड्राईव्हपर्यंतचा ९ किमीचा मार्ग फेब्रुवारीपासून सुरू होणार त्यात २.७ किमीच्या बोगद्याचाही समावेश आहे. समुद्राखालून जाणाऱ्या या बोगद्यातून किमान दोन-तीन मिनिटांचा प्रवास करता येणार आहे.
वेगमर्यादा किती?
या मार्गावर ताशी १०० किमी वेगाने वाहने धावू शकतात. मात्र या मार्गावर ताशी ७० ते ८० किमी वेगमर्यादा असेल. संपूर्ण मुंबईतील इतर रस्त्यांची वेगमर्यादा ताशी २१ किमी असताना सागरी किनारा मार्गावरील वेगामुळे प्रवासाचा कालावधी ७० टक्के वाचणार आहे, तर इंधनात ३४ टक्के बचत होईल असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
हेही वाचा : लडाखी जनता रस्त्यावर का उतरली? गिलगिट-बाल्टिस्तान संदर्भात त्यांची मागणी नेमकी काय आहे?
प्रकल्पाचे उर्वरित काम कसे करणार?
समुद्राजवळची उत्तर मुंबईत जाणारी बाजू अद्याप पूर्ण झालेली नाही. या मार्गाचे काम अद्याप सुरू असल्यामुळे दोन बाजूंमध्ये हिरवे पडदे लावण्यात येणार आहेत. वरळीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेची कामे शिल्लक असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सुरुवातीला केवळ सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेतच वरळी ते मरीन ड्राईव्ह ही एक बाजू सुरू राहू शकेल. त्यानंतर रात्रीच्या वेळी दुसऱ्या बाजूची कामे सुरू राहणार आहेत. तसेच शनिवार, रविवारीदेखील हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
संपूर्ण प्रकल्प कधी सुरू होणार?
वरळी येथे पुलाच्या खांबांमधील अंतर वाढवून देण्याच्या मागणीमुळे हा प्रकल्प रखडला होता. त्यामुळे हा मार्ग वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडण्याचा महत्त्वाचा टप्पा पार पाडण्यास वेळ लागणार आहे. हा टप्पा पूर्ण होण्यास मे २०२४ उजाडणार आहे. तर हिरवळ आणि वाहनतळासाठी अद्याप प्रतीक्षा करावी लागणार आहे. सागरी किनारा रस्त्यालगतच्या भराव भूमीमध्ये विविध नागरी सेवा सुविधा देण्यात येणार आहेत. भराव क्षेत्रापैकी २५ ते ३० टक्के क्षेत्रात सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित सुमारे ७० ते ७५ टक्के क्षेत्रात म्हणजेच ७५ लाख ३१ हजार ५२५ चौरस फूट परिसराचा उपयोग हा लॅडस्केपिंगसह विविध नागरी सुविधांसाठी करण्यात येणार आहे. ७५ लाख चौरस फुटात होणार उद्याने, जॉगिंग ट्रॅक, स्वच्छतागृहे, खुले नाट्यगृह तयार केले जाणार असून त्याला अजून दोन वर्षे लागणार आहेत. हिरवळीची कामे करण्यासाठी जून महिन्यात निविदा काढण्यात येणार आहेत.
हेही वाचा : पुलवामा: दहशतवादी हल्ल्याची पाच वर्षे- नक्की काय घडले होते?
प्रकल्पाची आणखी वैशिष्ट्ये काय?
मरीन ड्राईव्ह प्रमाणेच वरळी येथे सागरी किनारा मार्गाला समांतर असा समुद्री पदपथ बांधण्यात येणार असून हा पदपथ मरीन ड्राईव्ह येथील समुद्री पदपथापेक्षा मोठा व रुंद असेल. हा पदपथ ७.५ किमी लांब व तब्बल २० मीटर रुंद असेल. या पदपथावर मरीन ड्राईव्हप्रमाणेच बसण्यासाठी दगडाची सलग व्यवस्था असेल. भरतीच्या लाटांपासून संरक्षणासाठी या समुद्री पदपथाला लागून सागरी भिंत (सी वॉल) बांधण्यात येत आहे. या समुद्री भिंतीचे काम ८४ टक्के झाले आहे. प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी फेसपर्यंत हा पदपथ असेल. तेथे चालण्यासाठी जागा तसेच सायकल मार्गिकाही असेल. या पदपथावर येण्यासाठी पादचाऱ्यांना भुयारी मार्गातून यावे लागणार आहे. सागरी किनारा मार्गावर कुठेही सिग्नल नसल्यामुळे व वाहने ताशी ७० त ८० किमी वेगाने येत असल्यामुळे रस्ता ओलांडून येता येणार नाही. त्यामुळे या पदपथावर येण्यासाठी सागरी किनारा मार्गावर २० ठिकाणी भुयारी मार्ग असतील.