भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील ‘दादा’ संघ अशी मुंबईची ओळख होती. मुंबईने विक्रमी ४१ वेळा रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. यात १९५८-५९ ते १९७२-७३ अशा सलग १५ जेतेपदांचाही समावेश आहे. मात्र, गेल्या काही काळापासून मुंबईचा संघ आपले हे वर्चस्व हरवून बसला आहे. मुंबईला २०१५-१६ च्या हंगामानंतर रणजी करंडक उंचावता आलेला नाही. मात्र, हा आठ वर्षांपासूनचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची मुंबईला यंदा संधी आहे.
मुंबईचा साखळी फेरीतील प्रवास कसा राहिला?
यंदाच्या स्पर्धेत साखळी फेरीसाठी मुंबईचा ‘ब’ गटात समावेश होता. या गटात असलेल्या आठ संघांपैकी केवळ मुंबई, बंगाल आणि उत्तर प्रदेश या संघांनाच रणजी जेतेपदाचा अनुभव आहे. त्यामुळे मुंबईला बाद फेरी गाठणे फारसे अवघड जाणार नाही असे अपेक्षित होते आणि तसेच घडले. मुंबईने सातपैकी पाच सामन्यांत विजय नोंदवले. यात बिहार, बंगाल आणि आसाम यांच्यावर डावाने विजयाचा समावेश होता. तसेच हनुमा विहारीचा समावेश असलेल्या आंध्र आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील केरळलाही मुंबईने पराभूत केले. केवळ उत्तर प्रदेशविरुद्ध घरच्या मैदानावर मुंबईला पराभव पत्करावा लागला. मात्र, सात सामन्यांत सर्वाधिक ३७ गुणांसह मुंबईने थाटात बाद फेरी गाठली.
हेही वाचा : विश्लेषण : ‘बार्टी’ विरोधात विद्यार्थ्यांमध्ये वाढता असंतोष का?
बाद फेरीत काय घडले?
साखळी फेरीत सर्वाधिक गुण कमावल्याने मुंबईला बाद फेरीचे सर्व सामने घरच्या मैदानावर खेळण्यास मिळणार हे निश्चित झाले होते. बाद फेरीत प्रथम उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईची बडोदाशी गाठ पडली. बडोदा म्हणजे पूर्वी इरफान आणि युसूफ पठाण, नंतर हार्दिक आणि कृणाल पंड्या असे समीकरण होते. मात्र, पठाण बंधू निवृत्त झाले, तर पंड्या बंधूंनी दुखापतींमुळे प्रथमश्रेणी क्रिकेटकडे पाठ फिरवली. त्यामुळे साहजिकच बडोदा संघाची ताकद आता कमी झाली आहे. असे असले तरी बाद फेरीत कोणताही संघ कोणालाही पराभूत करू शकतो याची जाणीव असलेल्या मुंबईने बडोदाला कमी लेखण्याची चूक केली नाही.
वांद्रे कुर्ला संकुल येथील ‘एमसीए’ अकादमीच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात मुंबईने पहिल्या डावात ३६ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ५६९ धावांचा डोंगर उभारत बडोद्याला विजयापासून दूर ठेवले. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवत मुंबईने उपांत्य फेरी गाठली. यात मुंबईचा सामना तुल्यबळ तमिळनाडूशी झाला. मात्र, नाणेफेकीपासूनच चुकीचे निर्णय घेतलेल्या तमिळनाडूच्या संघाला मुंबईने पूर्णपणे निष्प्रभ केले. तमिळनाडूला दोन्ही डावांत २०० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. त्यामुळे मुंबईने तीन दिवसांतच डावाने विजय मिळवत ४८व्यांदा रणजी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
हेही वाचा : महायुती, मविआत जागावाटपाची चर्चा जोरात; राज्यातील विभागवार चित्र कसे?
कोणत्या खेळाडूंनी चमक दाखवली आहे?
यंदाच्या हंगामात अष्टपैलू तनुष कोटियन मुंबईचा सर्वोत्तम खेळाडू ठरला आहे. मोक्याच्या क्षणी आपण खेळ उंचावू शकतो हे तनुषने गेल्या दोन हंगामांत दाखवून दिले आहे. यंदाच्या बाद फेरीत तनुषने १०व्या क्रमांकावर फलंदाजीला येताना बडोदाविरुद्ध दुसऱ्या डावात नाबाद १२० धावांची, तर उपांत्य सामन्यात तमिळनाडूविरुद्ध नाबाद ८९ धावांची उत्कृष्ट खेळी साकारली. त्याने बडोद्याविरुद्ध अखेरच्या गड्यासाठी तुषार देशपांडेसह तब्बल २२२ धावांची भागीदारी रचली. तुषारनेही प्रथमश्रेणी क्रिकेटमधील आपले पहिले शतक साकारताना १२३ धावांची शानदार खेळी केली. ऑफ-स्पिनर असलेल्या तनुषने २२ गडी बाद करताना आपल्यातील गुणवत्ता सिद्ध केली. तसेच वेगवान गोलंदाज मोहित अवस्थी (३५ बळी) आणि अनुभवी डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानी (३१ बळी) यांचीही कामगिरी प्रभावी ठरली. त्याच प्रमाणे अनुभवाचे महत्त्व कसोटीपटू शार्दूल ठाकूरने दाखवून दिले. उपांत्य सामन्यात तमिळनाडूविरुद्ध मुंबईचा संघ अडचणीत असताना शार्दूलने १०५ चेंडूंत १०९ धावांची अप्रतिम खेळी केली. त्यामुळे एकवेळ ७ बाद १०६ अशा स्थितीत असलेल्या मुंबईला ३७८ धावांची मजल मारता आली. त्यापूर्वी उपांत्यपूर्व सामन्यात बडोद्याविरुद्ध मुशीर खान (पहिल्या डावात २०३ धावा) आणि हार्दिक तामोरे (दोन डावांत अनुक्रमे ५७ आणि ११४ धावा) या युवकांचे योगदान निर्णायक ठरले. युवा सलामीवीर भूपेन लालवानीने या हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्याने मुंबईसाठी सर्वाधिक ५३३ धावा केल्या आहेत.
कर्णधार रहाणेची कामगिरी चिंतेचा विषय?
अनेक प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत २०२०-२१मध्ये भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजय मिळवून देणाऱ्या अजिंक्य रहाणेने आपल्यातील नेतृत्वकौशल्य रणजी करंडकातही सिद्ध केले आहे. गोलंदाजीतील योग्य बदल, क्षेत्ररक्षकांची रचना, युवकांना मोलाचे मार्गदर्शन यासह रहाणेने कर्णधार म्हणून आपले वेगळेपण अधोरेखित केले आहे. मात्र, फलंदाज म्हणून तो सपशेल अपयशी ठरला आहे. या हंगामापूर्वी भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याचे ध्येय रहाणेने बाळगले होते. परंतु सध्या तरी तो ध्येयपासून बराच दूर आहे. यंदाच्या हंगामात त्याला सात सामन्यांत केवळ १३.४च्या सरासरीने १३४ धावाच करता आल्या आहेत. ११ डावांत त्याने केवळ एक अर्धशतक केले आहे. विशेष म्हणजे, मुंबईने यंदाच्या रणजी हंगामात एकूण २२ खेळाडूंना संधी दिली आणि यापैकी १९ जणांनी रहाणेपेक्षा अधिकच्या सरासरीने धावा केल्या. त्यामुळेच फलंदाज म्हणून रहाणेची कामगिरी मुंबईसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा : विश्लेषण: यंदाचा उन्हाळा किती तीव्र असणार?
यंदाचे रणजी जेतेपद का महत्त्वाचे ठरेल?
मुंबईच्या संघाला आठ वर्षांपासून रणजी करंडक पटकावता आलेला नाही. या काळात शेजारील विदर्भाने दोन वेळा रणजीचे जेतेपद मिळवले आहे. आता जेतेपदाचा दुष्काळ संपवायचा झाल्यास मुंबईला याच विदर्भाला नमवावे लागणार आहे. यात मुंबईचा संघ यशस्वी ठरल्यास देशांतर्गत क्रिकेटमधील आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचे पाऊल ठरेल. मुंबईच्या संघात सध्या रहाणे, शार्दूलसह पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यर यांसारख्या कसोटीपटूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी आपला सर्वोत्तम खेळ केल्यास मुंबईला निश्चितच ४२वे रणजी जेतेपद मिळवता येऊ शकेल.