मुंबई-गोवा महामार्गाची सध्या वडखळ ते इंदापूर पट्ट्यात लोणेरेजवळ ठिकठिकाणी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, ज्यामुळे वाहन चालकांना आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी पुन्हा एकदा डिसेंबरअखेरचा वायदा करण्यात आला आहे. मात्र हे काम या मुदतीत तरी पूर्ण होईल का याबाबत साशंकता आहे. आता पाऊस सुरू झाल्यामुळे गैरसोयींचा महामार्ग असे याचे स्वरूप झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महामार्गाच्या कामाची सद्यःस्थिती काय?

मुंबई-गोवा महामार्गावर पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या कामाला २०११ मध्ये सुरुवात झाली होती. हे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. इंदापूर ते कशेडी दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्यातील काम २०१४मध्ये सुरू झाले होते. हे काम दहा वर्षानंतरही पूर्ण झालेले नाही. रायगड जिल्ह्यात कासू ते इंदापूर तर रत्नागिरी जिल्ह्यात आरवली ते काटे आणि काटे ते वाकेड या टप्प्यातील कामे रखडलेली आहेत. इंदापूर, माणगाव येथील बाह्यवळण रस्त्याची कामे ठप्प आहेत. तर कोलाड, लोणेरे येथील उड्डाणपुलांची कामे अपूर्ण आहेत. या शिवाय पूई येथील नदीवरील मोठ्या पुलाचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही.

आणखी वाचा-कर्मठ व्यवस्थेस वाकुल्या दाखवत इराणी जनतेने निवडला सुधारणावादी अध्यक्ष… मसूद पेझेश्कियान इराणला नवी दिशा देतील का?

महामार्गाच्या कामात अडचणी कोणत्या?

महामार्गाच्या कामात सुरुवातीला भूसंपादनातील अडचणी आल्या. नंतर पर्यावरणविषयक परवानग्या मिळण्यास उशीर झाला. इंदापूर ते कशेडी टप्प्यातील प्रकल्प बाधितांना भूसंपादन मोबदला देण्यास दिरंगाई झाली. नंतर कंत्राटदाराची अकार्यक्षमता आडवी आली. ठेकेदार बदलल्याने प्रकरण न्यायालयात गेले. त्यात दीड-दोन वर्षे निघून गेली. या अडचणीमुळे रस्त्याचे काम रखडत गेले. काही ठिकाणी नवीन ठेकेदारही कुचकामी ठरले.

महामार्गाची दुरवस्था कुठे?

ज्या ठिकाणी कामे रखडली आहेत तेथे रस्त्याची दुरवस्था होण्यास सुरुवात झाली आहे. कोलाड आणि लोणेरे येथे उड्डाणपुलांची कामे सध्या सुरू आहेत. मात्र या कामांमुळे जे बाह्यवळण रस्ते उपलब्ध करून देण्यात आले आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. या परिसरात चिखल आणि मातीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी महामार्गावरून प्रवास करणे अवघड बनले आहे. याशिवाय कळंबजे, नवघर, उसरघर, लोणेरे येथील रस्त्याची परिस्थिती दयनीय आहे. कशेडी घाटाला पर्याय म्हणून बोगदा खणण्यात आला आहे. या बोगद्याला सध्या मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने वाहनांवर ठिकठिकाणी जलाभिषेक सुरू आहे.

आणखी वाचा-विश्लेषण: काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानधार्जिणे… आता भारतमित्र… ब्रिटनमधील मजूर पक्षाचे बदलते रंग!

महामार्गाला दरडीचाही धोका?

काही दिवसांपूर्वीच महाडजवळीच्या नांगलवाडी येथे महामार्गावर दरड कोसळली होती. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पण गेल्या पाच वर्षांत महामार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे त्याबाबत ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. रायगड जिल्ह्यात सुकेळी खिंड, टोळ, दासगाव खिंड, केंबुर्ली, नडगाव, चोळई आणि धामणदेवी ही महामार्गावरील ठिकाणे दरडप्रवण आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात परशुराम घाट आणि कशेडी घाटात दरडींचा धोका कायम आहे. या ठिकाणी रुंदीकरणासाठी डोंगर उभे-आडवे कापले गेल्याने पावसाळ्यात सैल झालेली माती आणि दगड रस्तांवर येण्याची शक्यता आहे.

कामाचा दर्जा असमाधानकारक?

महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम ज्या ठिकाणी पूर्ण झाले आहे. तेथील दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. क्राँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी व्हायब्रेशन जाणवत आहेत. महामार्गावर वाहतूक सूचना फलकांचा आभाव आहे. सर्व्हिस रोडची कामे अपूर्ण आहेत. पाण्याचा निचरा होण्यासाठी महामार्गावर योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही. पेण ते हमरापूर दरम्यान नवीन रस्त्याला खड्डे पडल्याने रस्ता फोडून पुन्हा नव्याने करण्याची वेळ आली आहे. कर्नाळा खिंडीत तीव्र वळणे काढण्यात आलेली नाहीत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण जास्त आहे. या सर्व कारणामुळे महामार्गाच्या कामांच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.

आणखी वाचा-पैसे टाकल्यावर वस्तू देणाऱ्या मशीन्स जपानमध्ये चर्चेत का आल्या आहेत?

काम कधी पूर्ण होणार?

महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ अखेर पर्यंत पूर्ण होईल असे सांगण्यात आले होते. नंतर मे अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा वायदा देण्यात आला. आता पुन्हा एकदा डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत काम पूर्ण होईल अशी ग्वाही देण्यात आली आहे. मात्र बाह्यवळण रस्ते आणि उड्डाण पुलांची कामे लक्षात घेतली तर यावेळीही दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होईल का याबाबत साशंकता कायम आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai goa highway is currently in a major state of disrepair in the wadkhal to indapur stretch near lonere print exp mrj
Show comments