अडखळती सुरुवात, मग सामन्यागणिक खेळ उंचावून जेतेपदापर्यंत मजल, असा मुंबई इंडियन्स संघाचा ‘आयपीएल’मधील आजवरचा इतिहास आहे. यंदाच्या हंगामातही याच इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘आयपीएल’च्या सध्या सुरू असलेल्या १८व्या हंगामात मुंबईने सुरुवातीच्या पाचपैकी चार सामन्यांत हार पत्करली होती. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या आणि मुंबईच्या संघ व्यवस्थापनावर बरीच टीका झाली. गतहंगामात गुणतालिकेत तळाला राहिलेला मुंबईचा संघ यंदाही निराशा करणार अशी भीती चाहत्यांना वाटू लागली होती. परंतु मुंबईच्या संघाने दमदार पुनरागमन करताना सलग चार सामने जिंकले असून गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. मुंबईच्या या उभारीमागे नक्की कारणे कोणती आणि त्यांना रोखणे आता प्रतिस्पर्ध्यांना का अवघड जाणार, याचा आढावा.
जसप्रीत बुमराचे पुनरागमन
या वर्षीच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान भारताचा तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला पाठीची दुखापत झाली. त्यामुळे त्याला तीन महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहावे लागले. संपूर्ण चॅम्पियन्स करंडक स्पर्धेपाठोपाठ तो ‘आयपीएल’च्या सुरुवातीच्या सामन्यांनाही मुकला. याचा मुंबई संघाला फटका बसला. सुरुवातीच्या चार सामन्यांत बुमरा उपलब्ध नव्हता आणि मुंबईने यापैकी तीन सामने गमावले. हंगामातील पाचव्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध त्याचे पुनरागमन झाले. या लढतीत तो लय मिळविण्यासाठी झगडताना दिसला. त्यानंतर मात्र सामन्यागणिक बुमराच्या कामगिरीत सुधारणा झाली. त्याच्या पुनरागमनामुळे अन्य गोलंदाजांवरील दडपणही कमी झाले. परिणामी ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहर यांनीही चमकदार कामगिरी करण्यास सुरुवात केली. बोल्टने सुरुवातीच्या चार सामन्यांत मिळून केवळ तीन गडी बाद केले होते. मात्र, बुमराच्या ‘कमबॅक’चा बोल्टलाही मोठा फायदा झाला असून त्यानंतरच्या पाच सामन्यांत त्याने सात बळी मिळवले आहेत.
रोहित शर्मा पुन्हा लयीत
रोहित शर्माची निराशाजनक कामगिरी हा मुंबई इंडियन्ससाठी चिंतेचा विषय ठरत होता. सुरुवातीच्या सहा सामन्यांत मिळून रोहितला केवळ ८२ धावा करता आल्या होत्या. त्याने एकाही डावात ३० धावांचा टप्पा ओलांडला नव्हता. मात्र, मुंबईच्या संघाने त्याला पूर्ण पाठिंबा दिला. अखेर त्याला सूर गवसला आणि त्याने हंगामातील सातव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ४६ चेंडूंत नाबाद ७६ धावांची शानदार खेळी केली. ‘मला मोठी खेळी करण्यात अपयश येत होते, पण मी स्वत:च्या क्षमतेवर कधीही प्रश्न उपस्थित केला नाही,’ असे रोहित म्हणाला. पुढच्याच सामन्यात पुन्हा हैदराबादविरुद्ध रोहितने ४६ चेंडूंत ७० धावांची खेळी करत आपण पूर्णपणे लयीत आल्याचे दाखवून दिले. त्याने अशीच कामगिरी सुरू ठेवल्यास मुंबई संघाला रोखणे प्रतिस्पर्ध्यांना अवघड जाईल.
सूर्यकुमार यादवचे सातत्य
मुंबई इंडियन्स संघासाठी सूर्यकुमार यादवचे सातत्य महत्त्वाचे ठरते आहे. यंदाच्या हंगामापूर्वी झालेल्या मुंबई संघाच्या पत्रकार परिषदेत कर्णधार हार्दिक पंड्याला सूर्यकुमारच्या कामगिरीबाबत विचारण्यात आले होते. सूर्यकुमारला गेल्या दीड-दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि ‘आयपीएल’मध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता येत नव्हती. मात्र, सूर्यकुमारसारख्या खेळाडूवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नसल्याचे हार्दिक म्हणाला होता. कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास सूर्यकुमारने यंदाच्या हंगामात सार्थ ठरवला आहे. त्याने नऊ सामन्यांत मुंबईकडून ३७३ धावा केल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो सध्या पहिल्या पाच जणांत आहे. त्याला तिलक वर्माचीही साथ मिळते आहे. त्यामुळे मुंबईची मधळी फळी सध्या भक्कम दिसते.
हार्दिकचे प्रभावी नेतृत्व
गेल्या हंगामापूर्वी मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय चाहत्यांच्या पचनी पडला नाही. वानखेडेसह देशभरातील सर्वच मैदानांवर हार्दिकविरोधात शेरेबाजी करण्यात आली. मुंबई संघातील वातावरणही नकारात्मक झाले. हंगामानंतर मुंबईच्या व्यवस्थापनाने सर्व प्रमुख खेळाडूंची एकत्रित बैठक घेतली, ज्यात त्यांच्यातील मतभेद दूर करण्यात आले, अशी माहिती देण्यात आली होती. रोहित, बुमरा, सूर्यकुमार आणि तिलक या सर्वांनीच हार्दिकला कर्णधार म्हणून समर्थन दर्शविले. यंदा याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. हार्दिक अधिक निडरपणे निर्णय घेत असून त्याचे डावपेचही प्रभावी ठरत आहेत. मैदानाबाहेरून रोहित आणि प्रशिक्षक महेला जयवर्धने हेसुद्धा त्याला वेळोवेळी सल्ला देताना दिसतात. याचा त्याला निश्चितपणे फायदा होत आहे. तसेच अष्टपैलू म्हणूनही तो यशस्वी ठरत आहे.
प्रशिक्षकपदी पुन्हा जयवर्धने
दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज मार्क बाऊचरने ‘आयपीएल’च्या गेल्या दोन हंगामांत मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षकपद भूषवले होते. २०२३ मध्ये मुंबई संघाने कसेबसे ‘प्ले-ऑफ’मध्ये स्थान मिळवले होते. मात्र, ‘क्वालिफायर-२’च्या सामन्यात मुंबईला हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघाकडून हार पत्करावी लागली होती. त्यानंतर हार्दिकने गुजरात संघ सोडण्याची इच्छा व्यक्त केली आणि मुंबईने त्याला पुन्हा संघात घेतले. इतकेच नाही तर हार्दिककडे नेतृत्वाची धुराही सोपवली. परंतु बाऊचर-हार्दिक जोडी पूर्णपणे अपयशी ठरली. २०२४ च्या हंगामात मुंबई संघ गुणतालिकेत तळाला राहिला. त्यानंतर मुंबईने बाऊचरला हटवून पुन्हा जयवर्धने याची प्रशिक्षकपदी निवड केली. जयवर्धनेच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर जयवर्धनेला मुंबई इंडियन्सचा ‘ग्लोबल हेड’ म्हणून बढती देण्यात आली होती. मात्र, बाऊचरने निराशा केल्यानंतर मुंबईच्या व्यवस्थापनाने जयवर्धनेला पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्त केले. त्याचा आता मुंबईला फायदा होत आहे.