मंगल हनवते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईकरांना वाहतूक व्यवस्थेचा अत्याधुनिक पर्याय देण्यासाठी आणि मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वाहतूक सुविधा निर्माण करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) प्रयत्न केला जात आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणजे मेट्रो प्रकल्प. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमीचे जाळे विणले जात असून त्यातील साधारण ४५ किमीचे मेट्रोचे जाळे मुंबईत पूर्ण झाले आहे. मेट्रो १ (घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा), मेट्रो २ अ (दहिसर-अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो ७ (दहिसर-गुंदवली) असे हे तीन मार्ग सध्या तयार झाले आहेत. रेल्वे आणि बेस्टनंतर आता नवीन जीवनवाहिनी म्हणून मेट्रोकडे पाहिले जात आहे. कारण या दोन्ही मार्गिकांना चांगला प्रतिसाद मिळत असून नुकताच या मार्गिकेवरून मागील दहा महिन्यांतील प्रवासी संख्या एक कोटींच्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर या जाळ्यामुळे मुंबईकरांना नेमका काय आणि कसा फायदा झाला आहे, या मार्गिकांद्वारे कुठून कुठे आणि कसे जाता येईल, आणि ही नवीन जीवनवाहिनी कशी ठरेल, याचा आढावा…

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात किती किमीचे जाळे?

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील सध्याची वाहतूक कोंडी सोडवून भविष्यातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएकडून विविध प्रकल्प राबविले जात आहेत. त्यातही अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी एमएमआरडीएने मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमीचे मेट्रोचे जाळे विणले जात आहे. त्यात १४ मेट्रो मार्गिकांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि वसई-विरार असा मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार होत आहे. हा प्रकल्प ३३७ किमीचा असून २००८ पासून त्याच्या अंमलबजावणीला मुंबईतून सुरुवात झाली. एक-एक करून मेट्रो मार्गिकांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील अंदाजे ४५ किमीचे जाळे आज पूर्ण झाले आहे.

विश्लेषण : ‘शिक्षक, पदवीधर’मधील भाजपचे वर्चस्व संपले?

किती मेट्रो मार्गिका सेवेत आहेत?

एमएमआरडीएने २००८ पासून मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. त्यानुसार मेट्रो १ नावाने घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा या पहिल्या मेट्रो मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले. सरकारी-खासगी भागीदारी तत्त्वावरील या कामाचे कंत्राट रिलायन्स समूहाला मिळाले. या समूहाने मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) नावाने कंपनी स्थापन करून या कंपनीच्या माध्यमातून मेट्रो १ पूर्ण करत २०१४ मध्ये ही मार्गिका सेवेत दाखल केली. त्यानंतर मात्र काही कारणांनी पुढील मार्गिकांची कामे सुरू होण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. मेट्रो ३ ( कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेचे काम २०१६ मध्ये सुरू झाले आणि त्या पाठोपाठ मेट्रो २ (दहिसर ते अंधेरी पश्चिम २ अ आणि अंधेरी ते मंडाले) आणि ७ (दहिसर ते गुंदवली) या मार्गिकेच्या कामाला सुरुवात झाली. सध्या मेट्रो ४, ४ अ (वडाळा-घाटकोपर-ठाणे-गायमुख), ५(ठाणे-भिवंडी-कल्याण), ६ (स्वामी समर्थ नगर- विक्रोळी), ९ (दहिसर-मिरारोड भाईंदर) ची कामे सुरू आहेत.

या कामांपैकी मेट्रो २ मार्गिकेतील दहिसर ते अंधेरी पश्चिम या टप्प्याचे अर्थात मेट्रो २ अचे आणि मेट्रो ७ चे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो २ अ मधील दहिसर ते डहाणूकरवाडी असा आणि मेट्रो ७ मधील दहिसर ते आरे असा पहिला टप्पा २ एप्रिल २०२२ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला. आता नुकतेच मेट्रो २ अ मधील वळनई ते अंधेरी पश्चिम आणि मेट्रो ७ मधील गोरेगाव ते गुंदवली अशा दुसऱ्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. लोकार्पणानंतर २० जानेवारीपासून मेट्रो २ अ आणि ७ पूर्ण क्षमतेने धावू लागल्या आहेत. एकूणच मुंबईत मेट्रो १, २ अ आणि ७ अशा तीन मार्गिका वाहतूक सेवेत आहेत.

पूर्व-पश्चिम उपनगरातील प्रवास कसा होणार?

मेट्रो १ मार्गिका पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडते. घाटकोपर आणि वर्सोवा असा प्रवास या मार्गिकेमुळे सोपा झाला आहे. आतापर्यंत ही एकमेव मार्गिका होती आणि ही केवळ ११ किमीची मार्गिका होती. त्यामुळे घाटकोपर ते वर्सोवादरम्यान प्रवास करणाऱ्यांनाच त्याचा फायदा होत होता. आता २० जानेवारीपासून मात्र घाटकोपरवरून किंवा वर्सोव्यावरून मालाड, बोरिवली दहिसरलाही जाणे सोपे झाले आहे. दहिसर, बोरिवली, मालाड, गोरेगाववरून घाटकोपर किंवा वर्सोव्याच्या दिशेने जाणेही सोपे झाले आहे. आता या तिन्ही मार्गिका एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत.

विश्लेषण : पोलिसांसाठी ‘खबरी’ किती महत्त्वाचे? त्यांच्या ‘बक्षिसा’बाबत उच्च न्यायालयाचा निर्णय काय सांगतो?

दहिसर मेट्रो स्थानकाने मेट्रो २ अ आणि ७ जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे गुंदवली, आरे, गोरेगाव अशा पूर्व भागातून पश्चिम भागातील डहाणूकरवाडी, पहाडी गोरेगाव, ओशिवरा भागांत जाता येऊ लागले आहे. या मेट्रो २ अ मधील अंधेरी पश्चिम मेट्रो स्थानक आणि मेट्रो १ मधील डी एन नगर मेट्रो स्थानक एकमेकांशी जोडण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन मार्गिका एकमेकांशी जोडल्या गेल्या असून त्यामुळे दहिसरवरून वर्सोव्याला किंवा घाटकोपरला डीएननगर मेट्रोने जाता येऊ लागले आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरूनही आता दहिसरवरून घाटकोपर, वर्सोव्याला जाता येऊ लागले आहे. मेट्रो ७ आणि मेट्रो १ मार्गिका गुंदवली तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग मेट्रो स्थानकाने एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत. याचा फायदा आता मुंबईकरांना होताना दिसतो आहे.

दहा महिन्यांत एक कोटी प्रवाशांचा प्रवास?

मेट्रो १ ,२ अ आणि ७ या एकमेकांना जोडल्यापासून मेट्रो प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. मेट्रो १ लाही मेट्रो २ अ आणि ७ मार्गिका सुरू झाल्याने फायदा होताना दिसत आहे. आतापर्यंत मेट्रो १ ची दैनंदिन प्रवासी संख्या तीन लाख ८० हजारावरून चार लाखांपेक्षा अधिक झाली आहे. मेट्रो २ अ आणि ७ या दोन्ही मार्गिकेवरून २ एप्रिल २०२२ ते २८ जानेवारी २०२३ दरम्यान एक कोटी ३ तीन हजार प्रवाशांनी प्रवास केला. त्यातील १० लाख प्रवासी संख्या ही गेल्या आठवडयाभरातील आहे. ही प्रवासी संख्या समाधानकारक असली तरी एमएमआरडीएने दिवसाला जे तीन ते लाख प्रवासी संख्येचे लक्ष्य ठेवले आहे ते अद्याप पूर्ण होताना दिसत नाही. पण प्रवासी संख्या हळूहळू वाढेल आणि निश्चित लक्ष्य गाठले जाईल असा विश्वास एमएमआरडीएकडून व्यक्त होताना दिसत आहे.

विश्लेषण: गौतम अदाणींचा पाय आणखी खोलात; S&P Dow Jones च्या यादीतून ‘अदाणी’ची गच्छन्ती! नेमकं घडतंय काय?

लोकलची गर्दी, धकधकीचा प्रवास याला कंटाळलेल्या, रस्त्यावरील वाहतूक कोंडीला कंटाळलेल्या मुंबईकरांना अत्याधुनिक अशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय, अगदी काही मिनिटात आणि तो ही परवडणाऱ्या दरात करता येत असल्याने मेट्रो पसंतीस पडत आहे. भविष्यात आता आणखी मेट्रो मार्गिका सुरू होणार असून ती सुरू झाल्यास मुंबईच्याच नाही तर मुंबई महानगर प्रदेशाच्या कानाकोपऱ्यातही लवकर पोहोचता येणार आहे. येत्या काही वर्षांत ३३७ किमीचे जाळे तयार होणार आहे. पुढे जाऊन हे जाळे ५०० किमीपर्यंत विस्तारणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai metro 2a and 7 inaugurated good response for transportation print exp pmw
Show comments