मुंबई महानगर प्रदेशात मेट्रोचे जाळे विणून मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्यासाठी मुंबई महानगर प्रेदश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) १४ मेट्रो प्रकल्प राबवत आहे. सध्या मुंबईत चार मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत असून येत्या काही महिन्यातच यात पाचव्या मेट्रो मार्गिकेची भर पडणार आहे. ती मार्गिका म्हणजे ‘मेट्रो २ ब’. या मार्गिकेतील ५.३ किमी लांबीचा आणि पाच मेट्रो स्थानकांचा समावेश असलेला डायमंड – मंडाले टप्पा डिसेंबरअखेर वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. हा टप्पा नेमका कसा आहे याचा घेतलेला आढावा…

३३७ किमी लांबीचे मेट्रो जाळे

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रोचा पर्याय पुढे आणला. आंतरराष्ट्रीय दर्जाची वाहतूक व्यवस्था पुरविणे आणि वेगवान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एमएमआरडीएने मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणण्याचा प्रकल्प हाती घेतला. यापैकी ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ आणि ‘दहिसर – डी. एन. नगर मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर पूर्व – अंधेरी पूर्व मेट्रो ७’ मार्गिका सेवेत दाखल झाल्या आहेत. सध्या ‘अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब’, ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’, ‘वडाळा – कासारवडवली मेट्रो ४’, ‘कासारवडवली – गायमुख ४ अ’, ‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’, ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’, ‘अंधेरी – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ७ अ’, ‘दहिसर – भाईंदर मेट्रो ९’ आणि ‘कल्याण – तळोजा मेट्रो १२’चे काम सुरू असून लवकरच ‘गायमुख – मिरारोड मेट्रो १०’चे काम सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच ‘मुंबई विमानतळ – नवी मुंबई विमानतळ मेट्रो ८’, ‘शिवाजी चौक – विरार मेट्रो १३’ आणि ‘अंबरनाथ – बदलापूर मेट्रो १४’ मार्गिका प्रस्तावित आहेत. सर्वच्या सर्व १४ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबईत ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणले जाणार आहे. यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील कोणत्याही टोकावरून कुठेही मेट्रोने जाता येणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे आता प्रस्तावित ‘मेट्रो १०’, ‘मेट्रो १३’ आणि ‘मेट्रो १४’ या मार्गिकांची कामे हाती घेण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. लवकरच मुंबईतील कार्यान्वित मेट्रो मार्गिकांमध्ये पाचव्या मेट्रोची भर पडणार आहे.

पाचवी मेट्रो कधी सेवेत?

मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका अर्थात ‘घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १’ २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली आणि मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण झाले. या मार्गिकेला सुरुवातीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता या मार्गिकेकडे मुंबईकर वळू लागले आहेत. परिणामी, या मार्गिकेवरून प्रवास करणार्‍यांची दैनंदिन संख्या साडेचार लाखाच्या घरात पोहोचली आहे. ‘मेट्रो १’ वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर पुढील मार्गिका सेवेत दाखल होण्यासाठी मुंबईकरांना थेट २०२२ पर्यंत वाट पाहावी लागली. २०२२ मध्ये ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरील पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यानंतर काही महिन्यांनी दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला. या मार्गिकांनाही प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद वाढू लागला आहे. एकूण तीन मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर २०२४ मध्ये मुंबईकरांचे भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला. या टप्प्याला अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र लवकरच या मार्गिकेवरील बीकेसी – आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानचा टप्पा २ अ वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. तर जुलैपर्यंत संपूर्ण क्षमतेने भुयारी मार्गिका धावण्याची शक्यता आहे. एकूणच मुंबईत सध्या चार मेट्रो मार्गिका कार्यान्वित असून डिसेंबर अखेरीस त्यात आणखी एका मार्गिकेची भर पडणार आहे. ती पाचवी मार्गिका म्हणजे ‘मेट्रो २ ब’.

कशी आहे मेट्रो २ ब मार्गिका?

‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ला जोडणारी मेट्रो मार्गिका म्हणजे ‘मेट्रो २ ब’ मार्गिका. सुमारे २३ किमी लांबीची आणि २२ मेट्रो स्थानकांचा समावेश असलेल्या या मार्गिकेमुळे अंधेरी पश्चिम – मंडाले दरम्यानचा प्रवास काही मिनिटांत करणे शक्य होणार आहे. त्यामुळे ही मार्गिका मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अंदाजे १० हजार कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या या मार्गिकेचे काम दोन टप्प्यात सुरू आहे. यातील पहिला टप्पा डायमंड गार्डन – मंडाले आणि दुसरा टप्पा डायमंड गार्डन – अंधेरी पश्चिम असा आहे. ही संपूर्ण उन्नत मेट्रो मार्गिका असून अनेक रेल्वे मार्ग ओलांडून ही मार्गिका जाते. या मार्गिकेची कारशेड मंडाले येथील ३१ एकर जागेवर उभारण्यात आली आहे. या कारशेडमध्ये एका वेळी ७२ मेट्रो गाड्या उभ्या करता येणार आहेत. या कारशेडचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून अन्य कामेही पूर्ण झाली आहेत. तसेच ८ एप्रिल रोजी विद्युत प्रवाहन सुरू झाले आहे. त्यामुळे आता मेट्रो गाड्या आणि विविध यंत्रणांच्या चाचण्यांना सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने आता ‘मेट्रो २ ब’ मार्गिकेतील पहिला टप्पा दृष्टिक्षेपात आला आहे.

डायमंड गार्डन – मंडाले मेट्रो प्रवास डिसेंबरपासून?

मंडाले कारशेडचे काम पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्यातील डायमंड गार्डन – मंडाले दरम्यानचे कामही वेगात सुरू आहे. हा टप्पा डिसेंबर अखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. एमएमआरडीएने पहिल्या टप्प्यातील डायमंड गार्डन – मंडाले दरम्यानच्या मार्गिकेवरील मेट्रो गाड्या आणि विविध यंत्रणांच्या चाचण्यांना बुधवार, १६ एप्रिलपासून सुरुवात करून एक पाऊल पुढे टाकले आहे. बुधवारी पहिल्यांदाच डायमंड गार्डन – मंडाले दरम्यान मेट्रो गाडी धावली. आता या मार्गिकेवर नियमितपणे गाड्यांची चाचणी होणार आहे. त्याचबरोबर सिग्नलसह इतर यंत्रणांचीही चाचणी होणार आहे.