दुबई आणि मुंबईला असा थेट जोडणारा समुद्राखालचा रेल्वेमार्ग उभारण्याची संयुक्त अरब अमिरातीची (यूएई) योजना आहे. नॅशनल अ‍ॅडव्हायझर ब्यूरो लिमिटेडच्या योजनेनुसार, दुबई आणि मुंबई पाण्याखालील रेल्वे लिंकमुळे प्रवासाचा वेळ फक्त दोन तासांवर येणार आहे, असे सांगण्यात येत आहे. ही अतिवेगवान रेल्वे ताशी ६०० ते १००० किलोमीटर वेगाने धावेल, असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही शहरांमधील कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होईल.

हा प्रकल्प काही वर्षांपूर्वी प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, अद्याप तरी त्याला मंजुरी मिळाल्याची किंवा त्याच्या विकासाबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काय आहे हा प्रकल्प? या प्रकल्पाचा काय फायदा होणार? दोन देशांतील संबंधांवर याचा काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊ.

मुंबई-दुबई अंडरवॉटर रेल्वे प्रकल्प

भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई)दरम्यान कच्च्या तेलासह वस्तूंची वाहतूक सुलभ करणे, तसेच हवाई प्रवासाला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे हा प्रस्तावित रेल्वे लिंक प्रकल्पाचा उद्देश आहे. नॅशनल अॅडव्हायझर ब्यूरो लिमिटेडचे ​​प्रतिनिधित्व करणाऱ्या एका यूट्यूब अकाउंटने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये ही रेल्वे प्रत्यक्षात धावू लागल्यानंतर कशी दिसेल हे दाखवण्यात आले आहे. व्हिडीओवरून असे दिसून येते की, या दोन तासांच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना पाण्याखालील जग अनुभवता येईल. जर हा प्रकल्प मंजूर झाला, तर या प्रकल्पासमोर अनेक तांत्रिक आणि अभियांत्रिकी आव्हाने आहेत, ज्यामुळे अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे.

मुंबई-दुबई अंडरवॉटर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाली, तर २०३० पर्यंत हा संपूर्ण रेल्वे लिंक प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

मुंबई-दुबई अंडरवॉटर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाली, तर २०३० पर्यंत हा संपूर्ण रेल्वे लिंक प्रकल्प पूर्ण होऊ शकतो. भारत आणि यूएईमधील व्यापार संबंध वाढविण्यासाठी हा प्रकल्प एक जलद आणि अधिक शाश्वत वाहतूक पर्याय म्हणून पाहिला जात आहे. ही अतिवेगवान रेल्वे प्रवासी आणि मालवाहतुकीसाठीही एक सोईस्कर पर्याय ठरेल आणि तो हवाई प्रवासाशी स्पर्धा करील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अहवालानुसार, यूएईच्या राष्ट्रीय सल्लागार ब्यूरो लिमिटेडने हा प्रकल्प सुचवला आहे.

या रेल्वे लिंक प्रकल्पामुळे प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त कच्च्या तेलासारख्या वस्तू दुबईहून भारतात अधिक कार्यक्षमतेने आणण्यास मदत होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध मजबूत होऊन, दोन्ही देशांमधील दळणवळण यंत्रणाही सुधारेल.या प्रकल्पामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास आणि व्यापारासाठी नवीन मानक स्थापित होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.

मुंबई-दुबई पाण्याखालील रेल्वेची वैशिष्ट्ये:

  • प्रतितास ६०० ते १००० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता
  • मुंबई ते दुबईदरम्यान केवळ दोन तासांचा प्रवास
  • विविध आव्हानांमुळे या प्रकल्पासाठी अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीची आवश्यकता
  • प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त हा प्रकल्प अस्तित्वात आल्यास कच्च्या तेलासह वस्तूंची जलद वाहतूक शक्य
  • प्रकल्प मंजूर झाल्यास ही लिंक रेल्वे २०३० पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता
  • हा प्रकल्प अजूनही चर्चा स्तरावर आणि त्याची पुढील अंमलबजावणी विकास प्रकल्पाच्या मंजुरी आणि आर्थिक गुंतवणुकीवर अवलंबून
  • पर्यावरणीय फायदे :पाण्याखालील रेल्वे एक शाश्वत वाहतूक पर्याय प्रदान करू शकत असल्यामुळे हवाई प्रवासावरील अवलंबित्व कमी
  • व्यापार वाढवणे : या लिंक रेल्वेमुळे भारत आणि यूएईमधील व्यापारात लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता.
  • या प्रकल्पामुळे मिळेल प्रवासादरम्यान पाण्याखालील जगातील विहंगम दृश्ये पाहण्याचा अनुभव.

प्रकल्पाविषयीच्या चर्चा

अलीकडच्या काळात मंजुरी किंवा विकासाबाबत कोणतीही महत्त्वपूर्ण किंवा मोठी माहिती समोर आली नसली तरी या प्रकल्पामुळे जागतिक स्तरावर रस निर्माण झाला आहे आणि जगभरातील लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. प्रस्तावित रेल्वे प्रणालीसाठी असंख्य तांत्रिक आव्हानांवर मात करावी लागेल आणि त्याच्या निधी, अभियांत्रिकी व्यवहार्यता आणि पर्यावरणीय परिणामांबाबत चर्चा सुरूच आहे. या पाण्याखालील रेल्वे लिंक प्रकल्पाच्या पूर्णतेमुळे आंतरराष्ट्रीय प्रवास आणि व्यापार संबंध सुधारतील, ज्यामुळे मुंबई आणि दुबईदरम्यानच्या वाहतुकीच्या सध्याच्या पद्धतींचा हा वेगवानआणि अधिक विश्वासार्ह पर्याय ठरेल.