Why is Mumbai Weather so hot : मागील काही दिवसांपासून मुंबईतील वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. मुंबईकरांना रात्री गारवा आणि सकाळी उकाडा, अशा विषम हवामान बदलाचा सामना करावा लागत आहे. तसं पाहता, फेब्रुवारी हा तांत्रिकदृष्ट्या हिवाळ्याचा महिना आहे. मात्र, या महिन्यात मुंबईतील तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. कुलाबा वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील कमाल तापमान ३६ अंशांवर पोहोचले. १४ फेब्रुवारी रोजी त्यात ३६.७ अंश सेल्सिअस इतकी वाढ झाली. १३ फेब्रुवारी रोजी कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर १४ फेब्रुवारी रोजी ३६.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्य तापमानापेक्षा पाच अंश जास्त होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ फेब्रुवारी रोजी भारतीय हवामान खात्याच्या सांताक्रूझ केंद्रातील कमाल तापमानाचा पारा ३६.१ अंशावर पोहचला होता. येत्या काही दिवसांत मुंबईतील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीपर्यंत मुंबईतील दररोजचे कमाल तापमान ३६ अंश ते ३७ अंशांवर पोहोचू शकते, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, मुंबईतील तापमानात सातत्याने वाढ का होत आहे? यामागची नेमकी कारणं काय, ते जाणून घेऊ.

मुंबईत तापमान वाढण्याचे कारण काय?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारीपासून मुंबईतील तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत शहरातील तापमानाचा पारा ३५ अशांच्या पार गेला, हे आतापर्यंतचे विक्रमी तापमान आहे. आयएमडी मुंबईचे संचालक सुनील कांबळे म्हणाले की, मुंबईतील तापमान वाढीचे मुख्य कारण म्हणजे हवामानातील बदल. शहरात दुपारपर्यंत पूर्वेकडून वारे वाहत असतात, मात्र दुपारनंतर वाऱ्याची दिशा बदलते आणि ते उत्तर-पश्चिम दिशेने वळतात, ज्यामुळे दिवसभर तापमान वाढते. “दुपारी वायव्येकडून येणारे वारे दिवसभरातील तापमान वाढवतात, तर सकाळी पूर्वेकडून येणारे वारे थंड असतात. चालू आठवड्यातही मुंबईत सामान्यपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे,” असे कांबळे म्हणाले.

आणखी वाचा : Blue Sun: लालबुंद सूर्य निळा होतो तेव्हा; शास्त्रज्ञांनी उकलले गूढ !

मुंबईतील तापमानाबद्दल हवामानतज्ज्ञ काय म्हणाले?

भारतीय हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यात पाऊस आणणारे पश्चिमी विक्षोभ सक्रिय नसल्याने चिंता व्यक्त केली. या हवामान पद्धतींमुळे मुंबईत उत्तरेकडून थंड वारे येतात, ज्यामुळे शहरातील तापमान कमी होण्यास मदत होते. ‘Vagaries of the Weather’ या हवामान ब्लॉगचे लेखक राजेश कापडिया यांनी सांगितले, “शहरात येणारे उत्तर-पश्चिम वारे अरबी समुद्रावरील अँटीसायक्लोनिक सिस्टीममुळे निर्माण झाले आहेत. अरबी समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या या अँटीसायक्लोनिक सिस्टीममुळे वारे घड्याळाच्या दिशेने फिरतात, ज्यामुळे मुंबईत उत्तर-पश्चिमी वारे येत आहेत.” स्कायमेट या हवामान संस्थेत असलेले महेश पलावत म्हणाले की, निरभ्र आकाश आणि तेजस्वी सूर्यप्रकाशामुळे दिवसभरातील कमाल तापमान वाढते आणि रात्रीचे तापमान लवकर कमी होते.

फेब्रुवारीमध्ये मुंबईत इतका उकाडा असामान्य आहे का?

फेब्रुवारीमध्ये मुंबईतील उष्णतेचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त असले तरी असे तापमान पूर्वीही नोंदवले गेले आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये मुंबईतील कमाल तापमान ३७.५ अंशावर गेलं होतं. त्याचबरोबर फेब्रुवारी २०२३ मध्ये मुंबईतील कमाल तापमानाचा पारा ३७.९ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. १९६६ मध्ये, मुंबईकरांनी फेब्रुवारी महिन्यातील सर्वात उष्ण दिवस अनुभवला होता, ज्यावेळी शहरातील तापमानाचा पारा ३९.६ अंश सेल्सिअसवर गेला होता.

सामान्यतः फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील कमाल तापमान ३१.३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १७.३ अंश सेल्सिअसच्या आसपास असते. मात्र, हवामानातील बदल आणि इतर घटकांमुळे तापमानात बदल होत असतो. दरम्यान, फेब्रुवारीमध्ये दिवसातील आणि रात्रीच्या तापमानातील फरक सामान्यतः कमी असतो. मात्र, अलीकडील काळात मुंबई आणि महाराष्ट्रातील दिवसाच्या कमाल आणि रात्रीच्या किमान तापमानातील फरक वाढला आहे, ज्यामुळे उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. याआधी साधारणपणे मार्चमध्ये हा फरक दिसून येत होता, असं राजेश कपाडिया यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा : Plastic impact on Health : प्लॅस्टिकमधून येणारं खायचं पार्सल विषारी? नवं संशोधन काय सांगतं?

फेब्रुवारी महिन्यात मुंबईत हिवाळा संपतो का?

“फेब्रुवारी हा मुंबईसाठी हिवाळा आणि उन्हाळा यांच्यातील संक्रमणाचा महिना असतो, त्यामुळे या महिन्यात तापमानात चढउतार होणे सामान्य आहे,” असं आयएमडी मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितलं. सामान्यतः भारतात उन्हाळा मार्च महिन्यात सुरू होतो असं मानलं जातं. मात्र, हवामान विभागाने हिवाळा संपण्याची आणि उन्हाळ्याची सुरुवात होण्याची कोणतीही अधिकृत तारीख निश्चित केलेली नाही. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मुंबईतील पुढील चार-पाच दिवसांपर्यत तापमानाचा पारा वाढता राहण्याची शक्यता आहे. २२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील कमाल तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचू शकते. गुरुवारनंतर शहरातीलल तापमानात किंचित घट होईल. गुरुवारी अँटीसायक्लोन प्रणाली कमकुवत होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे मुंबईकरांना उकाड्यातून काहीसा दिलासा मिळू शकतो.

मुंबईतील तापमानात सातत्याने बदल

दरम्यान, उत्तर भारतातही थंडीचा जोर कमी झाला आहे. पूर्वेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे ईशान्य अरबी समुद्रापासून दक्षिण राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच उत्तर भारतातही थंडीचा कडाका कमी–अधिक होत आहे. डिसेंबरमध्ये मुंबईत काही प्रमाणात थंडीचा जोर होता, त्या तुलनेत जानेवारीमध्ये मुंबईकरांना कमी थंडी जाणवली. महिन्याच्या अखेरीस मुंबईतील थंडीचे प्रमाण कमी झाले. फेब्रुवारी सुरू होताच शहरातील तापमानात सातत्याने बदल होत गेले, ज्यामुळे मुंबईकरांना पहाटेचा गारवाही फारसा जाणवला नाही. याऊलट दुपारी असह्य उकाडा सहन करावा लागला. प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यातच दिवसा प्रचंड उकाडा आणि पहाटे व रात्री थंडी अशा वातावरणामुळे मुंबईकरांची तब्येत बिघडली आहे. येत्या काळातही असेच वातावरण राहण्याची शक्यता असून तब्येतीची काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.