देशाची आर्थिक राजधानी मुंबई २०३० पर्यंत जगातील सर्वाधिक कोट्यधीश असलेल्या टॉप २० शहरांच्या यादीत तिसऱ्या स्थानी असेल, असा अंदाज लंडनच्या ‘हेन्ली अँड पार्टनर्स’ या गुंतवणूक सल्लागार संस्थेने व्यक्त केला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीचा जागतिक नागरी अहवाल या संस्थेने प्रसिद्ध केला आहे. टॉप २० शहरांच्या यादीत दुबई आणि चीनमधील शेंन्झेन या शहरांचाही समावेश होईल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईत ६० हजारांहून अधिक कोट्यधीश
लंडनमधील संस्थेने प्रसिद्ध केलेल्या यादीत मुंबई सध्या २५ व्या स्थानावर आहे. या अहवालानुसार मुंबईत ६० हजार ६०० कोट्यधीश आणि ३० अब्जाधीश आहेत. मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) जगातील सर्वात मोठ्या शेअर बाजारांपैकी एक असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. मुंबई हे भारतातील गजबजलेले शहर आहे. या शहरात वित्तीय सेवा, मीडिया आणि बांधकाम क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे.
जगातील सर्वाधिक श्रीमंत शहर कोणतं?
या यादीत अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर पहिल्या स्थानी आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को बे, लॉस एंजेलिस, शिकागो आणि ह्युस्टन ही शहरंदेखील या यादीत पहिल्या दहामध्ये आहेत. या यादीत ३ लाख ९०० कोट्याधीशांसह जपानमधील टोकिया दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडमधील लंडन या शहराने या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीत चीनमधील बीजिंग आणि शांघाय अनुक्रमे १ लाख ३१ हजार ५०० आणि १ लाख ३० हजार १०० कोट्याधीशांसह टॉप १० शहरांच्या यादीत आहेत. या यादीत सीडनी, हाँगकाँग, फ्रन्क्फर्ट, टोरंटो, झ्युरिक, मेलबर्न, जीनिव्हा आणि पॅरीस या शहरांचादेखील समावेश आहे.
विश्लेषण : सहा महिने, ७० मराठी चित्रपट आणि कोटी उड्डाणे…
मुंबई…कधीही न झोपणारे शहर
मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. या शहरात देशातील सर्वाधिक कोट्यधीश आणि अब्जाधीश राहतात. १६६१ साली इंग्लंडचे चार्ल्स दुसरे यांचा विवाह पोर्तुगीज राजकन्या कॅथरीनशी झाल्यानंतर मुंबई इंग्रजांना हुंडा म्हणून मिळाली होती. त्यानंतर इंग्लंडच्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’ने भारतावर ताबा मिळवण्यास सुरूवात केली होती. २० व्या शतकाच्या सुरवातीला भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी मुंबई महत्त्वाचे शहर होते. स्वातंत्र्यानंतर हे शहर बॉम्बे राज्यात समाविष्ट करण्यात आले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि या राज्याची राजधानी मुंबई झाली.
देशातून कोट्यधीशांचे स्थलांतर
देशातून यावर्षी जवळपास ८ हजार श्रीमंत व्यक्ती इतर देशांमध्ये स्थलांतर करणार असल्याचा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, इजरायल, स्वित्झर्लंड, अमेरिका, पोर्तुगाल, ग्रीस, कॅनडामध्ये हे स्थलांतर होण्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली आहे. माल्टा, मॉरिशस आणि मोनॅकोमध्येही कोट्यधीश स्थलांतर करू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.