मुंबईत सध्या तीन मेट्रो मार्गिका सेवेत दाखल असून या मार्गिकांना मिळणारा प्रतिसाद हळूहळू वाढत आहे. प्रवासी मेट्रो सेवेकडे वळू लागले आहेत. आता मुंबईकर प्रवाशांच्या सेवेत मुंबईतील चौथी आणि महत्त्वाचे म्हणजे पहिली भुयारी मेट्रो मार्गिका दाखल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी ‘मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसीदरम्यानच्या मार्गिकेचे लोकार्पण करण्यात आले. ही मार्गिका सोमवारपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुली होणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. आरामदायी आणि अतिवेगवान प्रवासासाठी आणखी एक पर्याय मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. मुंबईतील ही पहिली भुयारी मेट्रो मार्गिका कोणती, ही मार्गिका कशी आहे, आणि या मार्गिकेचा उपयोग मुंबईकरांना कसा होणार, याबाबत घेतलेला आढावा…
मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमी मेट्रो…
मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर (एमएमआरडीए) आहे. त्यानुसार ‘एमएमआरडीए’ने मुंबई आणि मुंबई महानगराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्चाचे विकास प्रकल्प आतापर्यंत राबविले असून आजही अनेक प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मुंबई महानगरात वाहतुकीचा अत्याधुनिक, अतिवेगवान आणि आरामदायी पर्याय उपलब्ध करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ने मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील कानाकोपरा मेट्रोने जोडला जावा यासाठी ‘एमएमआरडीए’ ३३७ किमी लांबीचे जाळे विणत आहे. या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पात एकूण १४ मार्गिकांचा समावेश आहे. यापैकी घाटकोपर – वर्सोवा ही पहिली मेट्रो मार्गिका असून ती २०१४ मध्ये सेवेत दाखल झाली. त्यानंतर काही वर्षांपूर्वीच ‘दहिसर पूर्व – गुंदवली पूर्व मेट्रो ७’ आणि ‘दहिसर पश्चिम – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल झाली. सध्या ‘एमएमआरडीए’कडून ‘मेट्रो २ ब’, ‘मेट्रो ४’, ‘मेट्रो ४ अ’ , ‘मेट्रो ५’, ‘मेट्रो ६’, ‘मेट्रो ७ अ’, ‘मेट्रो ९’ मार्गिकांची कामे सुरू असून उर्वरित मार्गिकांच्या कामालाही येत्या काही वर्षात सुरुवात होणार आहे. सध्या कामे सुरू असलेल्या मार्गिका २०२६ पासून टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवेत दाखल होणार आहेत. तर २०३१-३२ पर्यंत ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे पूर्ण करण्याचे ‘एमएमआरडीए’चे नियोजन आहे.
हेही वाचा >>> युनेस्कोच्या पथकाने का केली रायगड किल्ल्याची पाहणी? जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता किती?
संपूर्ण भुयारी मेट्रो ३…
याच ३३७ किमी लांबीच्या मेट्रोच्या जाळ्यातील एक आणि सर्वात महत्त्वाची मार्गिका म्हणजे ‘मेट्रो ३’ मार्गिका. मुंबईतील पहिली संपूर्णतः भुयारी असलेल्या या मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. हा टप्पा सोमवारपासून वाहतूक सेवेत दाखल होत आहे. ‘एमएमआरडीए’च्या ३३७ किमी लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो ३’ मार्गिकेला राज्य सरकारने २०१४ मध्ये मान्यता दिली. तसेच या मार्गिकेचे २६ ऑगस्ट २०१४ रोजी भूमिपूजन करण्यात आले. या मार्गिकेच्या उभारणीसाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडची (एमएमआरसीएल) स्थापना करण्यात आली. ‘एमएमआरसीएल’ने भुयारी मेट्रोच्या उभारणीसाठी आवश्यक ती कार्यवाही करून मार्गिकेच्या उभारणीसाठी निविदा प्रक्रिया राबवली. निविदा अंतिम करून २०१७ मध्ये ‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या कामास सुरुवात करण्यात आली. ही संपूर्णतः भुयारी मार्गिका मुंबईसारख्या शहरात उभारणे अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक होते. त्यातही ‘मेट्रो ३’ मार्गिका गिरगावसारख्या जुन्या चाळी, इमारती असलेल्या भागाच्या खालून जाणार असल्याने ‘एमएमआरसीएल’ची कसोटी होती. हे आव्हान पेलण्यासाठी ‘एमएमआरसीएल’ने अत्याधुनिक अशा टनेल बोरिंग यंत्राचा वापर करून भुयारीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार परदेशातून अवाढव्य अशी १७ टीबीएम यंत्रे मुंबईत आणण्यात आली. सप्टेंबर २०१७ मध्ये पहिले टीबीएम यंत्र मुंबईच्या पोटात शिरले. त्यानंतर एक एक टीबीएम यंत्र भूर्गभात सोडून एकूण ५५ किमी लांबीच्या भुयारीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात आली. या टीबीएम यंत्रांनी ५५ किमी लांबीचे भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले. या प्रकल्पामुळे गिरगाव, काळबादेवी परिसरातील विस्थापित झालेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाची जबाबदारी ‘एमएमआरसीएल’ने घेतली आणि पुनर्वसन प्रकल्प हाती घेतला. एकूणच २०१७ पासून भुयारी मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली आणि आता ऑक्टोबर २०२४ मध्ये ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकेतील १२.५ किमीचा आरे – बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल होत आहे. दरम्यान, आतापर्यंत ही संपूर्ण मार्गिका सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र आरे कारशेड वाद आणि तांत्रिक अडचणींमुळे मार्गिकेस विलंब झाला आहे.
कशी आहे ‘मेट्रो ३’ मार्गिका?
‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेची लांबी ३३.५ किमी आहे. या मार्गिकेसाठी २३ हजार १३६ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र या खर्चात वाढ होऊन आता तो थेट ३७ हजार २७६ कोटी रुपयांवर पोहचला आहे. ‘एमएमआरसीएल’ने ‘जायका’च्या मदतीने कर्ज आणि दुय्यम कर्जाच्या माध्यमातून ‘मेट्रो ३’ मार्गिकेसाठी निधी उभारला. ‘मेट्रो ३’ मार्गिकेवर २७ मेट्रो स्थानके असून ही सर्व भुयारी आहेत. या मार्गिकेवरील मेट्रो गाड्या पूर्ण वातानुकूलित, स्वदेशी बनावटीच्या आणि वाहनचालकमुक्त असणार आहेत. वाहनचालकमुक्त मेट्रो गाड्या असल्या तरी या गाड्यांमध्ये मेट्रो पायलट कार्यरत असणार आहेत. ३३५ किमी लांबीच्या मेट्रो मार्गासाठी ३१ मेट्रो गाड्यांची आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथे बांधणी करण्यात आली असून आतापर्यंत १३ गाड्या आरे कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. यापैकी ९ गाड्या दररोज आरे – बीकेसी दरम्यान धावणार आहेत. या मार्गिकेचे काम सध्या दोन टप्प्यात करण्यात येत असून पहिला टप्पा आरे – बीकेसी, तर दुसरा टप्पा बीकेसी – कफ परेड असा आहे. यापैकी आरे – बीकेसी टप्प्याचे लोकार्पण ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्न केव्हा पूर्ण?
‘मेट्रो ३’च्या कामाला २०१७ मध्ये सुरुवात झाली असून आतापर्यंत ही संपूर्ण मार्गिका सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र संथ गतीने होणारे काम, तांत्रिक अडचणी आणि कारशेडच्या वादामुळे प्रकल्पास विलंब झाला. या मार्गिकेस विलंब झाल्याने साहजिकच मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचे स्वप्नही लांबणीवर पडले. आता मात्र ‘एमएमआरसीएल’ने ‘मेट्रो ३’च्या कामाला वेग देऊन आरे – बीकेसी दरम्यानच्या १२.५ किमी लांबीच्या टप्प्याचे काम पूर्ण केले. काम पूर्ण झाल्यानंतर ‘एमएमआरसीएल’ने मेट्रो गाड्या, रुळ आणि इतर यंत्रणांची चाचणी करून मेट्रो संचलनाच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकले. मेट्रो संचलनासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले सुरक्षा प्रमाणपत्र मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून प्राप्त करून घेण्यात यश मिळविले. आरे – बीकेसी मार्गिकेच्या संचलनासाठी ‘सीएमआरएस’ने बुधवार, ३ ऑक्टोबर रोजी सुरक्षा प्रमाणपत्र देऊन या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा केला. दरम्यान, हे प्रमाणपत्र प्राप्त होण्याआधीच ‘एमएमआरसीएल’ आणि राज्य सरकारने आचारसंहितेपूर्वी या मार्गिकेच्या लोकार्पणाचा घाट घातला होता. सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याने त्यात त्यांना यशही मिळाले. आरे – बीकेसी टप्प्याचे शनिवार, ५ ऑक्टोबर रोजी लोकार्पण झाले असून मुंबईकरांना सोमवार, ७ ऑक्टोबरपासून भुयारी मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता प्रवासी वाहतुकीसाठी खुली होणार आहे. भुयारी मेट्रो पहिल्या दिवशी सकाळी ११ ते रात्री १०.३० दरम्यान कार्यान्वित असणार आहे. मात्र मंगळवारपासून सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत भुयारी मेट्रो सेवा सुरू असणार आहे. वेळापत्रकानुसार सोमवार ते शनिवार सकाळी ६.३० ते रात्री १०.३० या वेळेत, तर रविवारी सकाळी ८.३० ते रात्री १०.३० या वेळेत भुयारी मेट्रो सेवा कार्यान्वित असणार आहे.
दररोज किती फेऱ्या ? तिकिट दर काय ?
आरे – बीकेसी मेट्रो मार्गिकेमुळे मुंबईकरांचा प्रवास अतिवेगवान आणि आरामदायी होणार असून आरे – बीकेसी अंतर केवळ २२ मिनिटांत पार करता येणार आहे. सध्या रस्त्याने हे अंतर पार करण्यासाठी एक तास वा गर्दीच्या वेळेस यापेक्षाही अधिक वेळ लागत आहे. एकीकडे आरे – बीकेसी प्रवास वेगवान झाला असून दुसरीकडे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. मात्र या आरामदायी आणि अतिवेगवान प्रवासासाठी मुंबईकरांना १० ते ५० रुपये मोजावे लागतील. आरे – बीकेसी दरम्यानच्या प्रवासासाठी ५० रुपये तिकिट दर निश्चित करण्यात आले आहेत. तर आरे जेव्हीएलआर – मरोळ प्रवासासाठी २० रुपये, आरे जेव्हीएलआर – विमानतळ टी १ दरम्यानच्या प्रवासासाठी ३० रुपये मोजावे लागणार आहेत. आरे – बीकेसी दरम्यान दररोज ९६ फेऱ्या होणार असून प्रत्येक साडेसहा मिनिटांनी मेट्रो गाडी सुटणार आहे.
आरे – कफ परेड भुयारी मेट्रो प्रवास केव्हा?
मुंबईतील पहिल्या ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेतील आरे – बीकेसी टप्प्याची, भुयारी मेट्रो प्रवासाची मुंबईकरांची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. मात्र त्याचवेळी ही संपूर्ण मार्गिका सेवेत केव्हा दाखल होणार, आरे – कफ परेड भुयारी मेट्रो प्रवास केव्हा सुरू होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या प्रवासासाठी एप्रिल – मे २०२५ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.