930 trains cancelled for 63 hours in Mumbai: काही पायाभूत सुविधांच्या अपग्रेडेशनसाठी मध्य रेल्वेचा मुंबई विभाग विशेष मेगाब्लॉक घेणार आहे. कोणत्या रेल्वे सेवांवर त्याचा परिणाम होईल आणि प्रवाशांनी काय करावे? याविषयीची सविस्तर चर्चा…
मध्य रेल्वे (CR) तर्फे हाती घेणार असलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या कामामुळे या आठवड्याअखेरीस (वीकेण्डला) मुंबई लोकलच्या सुमारे ९३० उपनगरीय गाड्या रद्द केल्या जाणार आहेत. हे का घडत आहे आणि याचा पुढील काही दिवसांत मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासावर नेमका काय परिणाम होणार आहे, याविषयी जाणून घेणे नक्कीच महत्त्वाचे ठरणारे आहे.
मुंबईची लोकल रेल्वे सेवा का विस्कळीत होणार?
ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५/६ च्या रुंदीकरणासाठी ६३ तासांचा विशेष ब्लॉक तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १०/ ११ च्या विस्तारासाठी ३६ तासांचा विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक सेंट्रल रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या सुधारणेच्या योजनांचा एक भाग आहे. सेन्ट्रल रेल्वेच्या मुंबई विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेचे सर्व विभाग देखभाल आणि इतर संबंधित कामांसाठी ब्लॉक घेतात. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी, हे ब्लॉक सामान्यत: रात्रभर किंवा आठवड्याच्या शेवटी आणि सुट्टीच्या दिवशी केले जातात.
मेगाब्लॉक दरम्यान कोणती कामे हाती घेण्यात येणार आहेत?
छत्रपती शिवाजी महाराज CSMT स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १०/११ च्या विस्ताराचे काम हाती घेण्यात येणार आहे. या विस्तारामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे २४ डबे प्लॅटफॉर्मवर थांबू शकतील. सध्या प्लॅटफॉर्मची क्षमता केवळ १३ डब्यांचीच आहे. यामुळे मुंबई ते पुणे किंवा नाशिकला जाणाऱ्या इंटरसिटीने प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना मोठाच दिलासा मिळणार आहे. ठाणे स्थानकात, क्षमता वाढवण्यासाठी आणि होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक ५/६ चे रुंदीकरण केले जाईल. या कामाला सर्व साधारणत: सहा महिने लागले असते, परंतु मॉड्युलर प्री-कास्ट ब्लॉक्स वापरून बांधकाम करणार असल्याने हे काम पूर्ण होण्यास केवळ अडीच दिवसांचाच कालावधी लागणार आहे.
कोणत्या रेल्वे सेवांवर परिणाम होणार?
१ जून रोजी मध्यरात्री १२.३० ते २ जून रोजी दुपारी १२.३० वाजेपर्यंतच्या ३६ तासांच्या सीएसएमटी ब्लॉक दरम्यान, सीएसएमटी-भायखळा आणि सीएसएमटी-वडाळा रोड दरम्यानच्या गाड्या धावणार नाहीत. याचा परिणाम सीएसएमटी आणि वडाळा रोड दरम्यानच्या अप आणि डाउन हार्बर मार्गावरील गाड्यांवर होईल, सीएसएमटी आणि भायखळा (वगळून) दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गिका आणि सीएसएमटी आणि भायखळा (वगळून) दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग यांवर गाड्या धावणार नाहीत.
शुक्रवार, ३१ मे रोजी मध्यरात्री १२.३० ते २ जून रोजी दुपारी ३.३० वाजेपर्यंतच्या ६३ तासांच्या काळात ठाणे मेगाब्लॉकमध्ये अनेक उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार आहेत. बाधित झालेल्या मार्गांवर कळव्यापासून (सीएसएमटी एण्ड क्रॉसओव्हर्ससह), ते ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्ससह), ठाण्यापासून डाऊन फास्ट लाइन (सर्व क्रॉसओव्हर्स) ते कळवा (सर्व क्रॉसओव्हर्स) आणि अप फास्ट लाईन कळव्यापासून (सर्व क्रॉसओव्हर्स) ते ठाणे (सर्व क्रॉसओव्हर्स) समावेश आहे.
मेगाब्लॉकच्या कालावधीत एकूण ९३० उपनगरीय रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्याची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. शुक्रवारी सुमारे १६१, शनिवारी ५३४ आणि रविवारी २३५ गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त, ब्लॉकच्या कालावधीत ४४४ उपनगरीय सेवा अल्प कालावधीसाठी बंद केल्या जातील – शुक्रवारी सात, शनिवारी ३०६ आणि रविवारी १३१ गाड्या रद्द केल्या जातील.
अधिक वाचा: रविवारची सुट्टी; पंतप्रधान मोदी काय म्हणाले? महाराष्ट्र कसा ठरला त्यासाठी कारणीभूत?
रोजच्या प्रवाशांनी काय करावे?
उपनगरीय रेल्वे व्यवस्थेतील प्रवाशांची संख्या कमी करण्यासाठी आणि प्लॅटफॉर्मवर गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने सर्व कार्यालयांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना ब्लॉक कालावधीत घरून काम करण्याची परवानगी द्यावी, असे आवाहन केले आहे. तसेच प्रवाशांनी ब्लॉक कालावधीत आवश्यकतेशिवाय प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. एका प्रसिद्धी पत्रकात असेही म्हटले आहे की, हे मेगाब्लॉक्स आवश्यक पायाभूत सुविधांच्या सुधारणांसाठी अत्याआवश्यक आहेत आणि त्याचे दीर्घकालीन फायदे आहेत. एकूणच, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात दररोज १,८१० लोकल धावतात, ज्यात ६६ एसी गाड्यांचा समावेश आहे. २०२३-२४ या कालखंडात १३७ कोटी प्रवाशांनी लोकल रेल्वेमधून मुंबईत प्रवास केला आहे.