१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने स्वतंत्र राष्ट्र म्हणून पहिले पाऊल टाकले. लाल किल्ल्यावरून उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवादनाद्वारे स्वतंत्र भारताच्या पहिल्या पहाटेचे स्वागत केले. संगीत हेच बिस्मिल्ला खान यांचे आयुष्य होते. संगीत, सूर व नमाज यांमध्ये त्यांना कधीच फरक जाणवला नाही, असे सांगितले जाते. त्यांनी सनईवादनाला एका नवीन स्तरावर नेले. कोण होते बिस्मिल्ला खान? कसा होता त्यांचा संगीत प्रवास? याविषयी जाणून घेऊ.
उस्ताद बिस्मिल्लाह खान आणि त्यांचा संगीत प्रवास
२१ मार्च १९१६ रोजी सनईवादक बिस्मिल्ला खान यांचा जन्म झाला. अगदी लग्नाच्या मंडपापासून ते मोठमोठ्या कॉन्सर्ट हॉलपर्यंत सनईची ओळख करून देण्यासाठी ते आजही सर्वत्र ओळखले जातात. त्यांचे वडील डुमरावचे महाराजा केशव प्रसाद सिंग यांचे पवन वाद्यवादक होते. त्यामुळे बिस्मिल्लाह खान यांची अगदी लहान वयातच सनईशी ओळख झाली. त्यांनी आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आणि सनईशी असलेली त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. ‘इकॉनॉमिक टाइम्स’च्या वृत्तानुसार वयाच्या सहाव्या वर्षी ते उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे त्यांचे काका अली बक्स ‘विलायतु’ यांच्याकडे राहण्यासाठी गेले आणि त्यांच्याकडू त्यांनी राग आणि सनईचा अभ्यास सुरू केला.
हेही वाचा : Independence Day 2024 : भारताचा राष्ट्रध्वज कसा तयार झाला? जाणून घ्या इतिहास…
आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या वर्षांत बिस्मिल्ला खान अनेक नाट्यनिर्मितीमध्ये दिसले. १९३७ मध्ये कोलकाता येथील अखिल भारतीय संगीत संमेलनानंतरच त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली. सनईवादनाला प्रेक्षकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे बिस्मिल्ला खानही प्रसिद्ध होऊ लागले. पुढे त्यांनी पश्चिम आफ्रिका, जपान, हाँगकाँग, अफगाणिस्तान, अमेरिका, कॅनडा, बांगलादेश, इराण व इराक, तसेच युरोपमधील इतर काही प्रदेशांमध्ये आपले कार्यक्रम केले. त्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीत ते ओसाका ट्रेड फेअर, कान्स आर्ट फेस्टिवल आणि माँट्रियलमधील वर्ल्ड एक्स्पोजिशन यांसारख्या मोठमोठ्या जागतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते, असे वृत्त ‘द स्टेट्समन’मध्ये दिले आहे.
धर्मांचा समान आदर
बिस्मिल्ला खान यांचा चित्रपटसृष्टीतील सहभाग फारच मर्यादित होता. १९५७ मध्ये सत्यजित रे यांच्या जलसागर या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आणि विजय भट्ट यांच्या ‘गूंज उठी शहनाई’ (१९५९)साठी सनईवादन केले. नंतर त्यांनी विजय यांचा लोकप्रिय कन्नड चित्रपट सनदी अप्पान्ना (१९७७)मध्ये सनईवादकाची भूमिका साकारली. ते मुस्लीम समुदायातील होते; मात्र, त्यांनी इतर सर्व धर्मांचा समान आदर केला. पद्मविभूषण पुरस्कारासह त्यांना तानसेन, संगीत नाटक अकादमी आणि इतरही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. खान यांना २००१ मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्नने गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते तिसरे शास्त्रीय संगीतकार ठरले. शांतिनिकेतन आणि बनारस हिंदू विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी दिली होती.
नेहरूंची विनंती आणि स्वतंत्र भारताच्या पहिल्या सकाळी सनईवादन
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी खान यांना १५ ऑगस्ट १९४७ रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर सनईवादन करण्यासाठी आमंत्रित केले होते. ते एकमेव संगीतकार होते; ज्यांना सनईवादनाचा विशेषाधिकार मिळाला होता. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या भाषणानंतर त्यांनी सनईवादन केले आणि पुढे अनेक वर्षे खान यांच्या सनईचे सूर रसिकांच्या कानी गुंजत राहिले. त्यांच्या सनईवादनाच्या कार्यक्रमाचे दूरदर्शनने केलेले थेट प्रक्षेपण हजारो घरांनी पाहिले. २६ जानेवारी १९५० रोजी त्यांनी भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातही सनईवादन केले.
नव्या रागाने प्रेक्षक मंत्रमुग्ध
खान यांनी अनेकदा सांगितले आहे की, त्यांना भगवान शिव, देवी सरस्वती व स्वतः भगवान श्रीकृष्णाने कला निर्माण करण्याची क्षमता दिली आहे. कुंभमेळ्याच्या एका कार्यक्रमात त्यांनी एक नवीन राग सादर केला. या रागाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. प्रेक्षकांनी त्यांना हा राग पुन्हा पुन्हा गाण्याची विनंती केली. हा राग होता ‘कन्हैरा’. त्या रागाविषयी आणि या कार्यक्रमाविषयी दुसर्या दिवशी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर बातम्या प्रसिद्ध झाल्या. प्रसिद्ध संगीतकार (बासरीवादक) हरिप्रसाद चौरसिया यांनी या बातमीने प्रभावित होऊन बिस्मिल्ला खान यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना त्या रागाविषयी विचारले. तेव्हा बिस्मिल्ला खान म्हणाले, त्यांना रेल्वे प्रवासात भेटलेल्या एका मुलाने या रागाची ओळख करून दिली होती. तो मुलगा एक बासरीवादक होता. बिस्मिल्ला यांनी त्या रागाला ‘कन्हैरा’ नाव दिले. कारण- त्यांना वाटले की, ते मूल भगवान श्रीकृष्णाचे रूप आहेत.
खान यांची तब्येत बिघडू लागल्याने त्यांना १७ ऑगस्ट २००६ रोजी वाराणसीतील हेरिटेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले होते. २१ ऑगस्ट २००६ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर भारत सरकारने राष्ट्रीय शोक दिवस पाळला. त्यांची सनई आणि शरीर वाराणसीतील फातेमान दफनभूमीत कडुनिंबाच्या झाडाखाली एकत्र पुरण्यात आले. भारतीय लष्कराने बिस्मिल्ला खान यांना २१ तोफांची सलामी दिली होती.