काश्मीर हा प्रदेश अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याबरोबरीनेच काश्मीरचा इतिहासही तितकाच रोचक आहे. कधी काळी शैव आणि वैष्णव पंथाचे माहेरघर असलेला हा भू-भाग मुस्लीमबहुल कसा ठरला याचा इतिहास जाणून घेणे नक्कीच महत्त्वाचे ठरणारे आहे. अनेक अभ्यासकांनी २० व्या शतकात याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. यासाठी मध्ययुगीन ग्रंथांचा आधार घेतला गेला. परंतु आजच्याप्रमाणेच, मध्ययुगीन लेखकांचे स्वतःचे राजकारण, कारस्थान आणि कदाचित जगण्याची प्रवृत्ती आणि संधीसाधूपणाही होताच. त्यामुळे त्यांनी दिलेले संदर्भ गोंधळात टाकणारे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिक वाचा: विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?

काश्मीरच्या इतिहासात एक कथा सापडते, त्या कथेनुसार एका तुर्की सुलतानाला विष्णूचा अवतार म्हणून घोषित केले होते. त्यामुळे या भागातील अनेक ब्राह्मणांनी इस्लाम स्वीकारला, असा मध्ययुगीन संदर्भ सापडतो. तर एक हिंदू राजा हा मंदिर उध्वस्त करणारा असल्याचे दाखलेही दिले आहेत.

इस्लामपूर्वी काश्मीर कसा होता?

गंगेच्या मैदानी प्रदेशात दिल्ली सल्तनत स्थापन झाल्यानंतर १४ व्या शतकात काश्मीरमध्ये इस्लाम एक प्रमुख राजकीय शक्ती म्हणून उदयास आली. त्यापूर्वीच्या काश्मीरचे वर्णन करावयाचे झाल्यास. ही जगातील सर्वात परिपूर्ण जागा होती. अनेक विद्वानांचे हे माहेरघर होते. शैव, वैष्णव, आणि बौद्ध तत्त्वज्ञानाची पंढरी होती. असे असतानाही या भागात इस्लामचा प्रसार कसा झाला हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. काश्मीरच्या इतिहासाविषयी जाणून घेण्याचा महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे १२ व्या शतकातील कल्हणाची राजतरंगिणी. तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय वस्तुस्थितीवर त्याने प्रकाश टाकला आहे. कल्हणाच्या वर्णनात राजा, मंत्री यांच्या लोभी आणि दुष्टपणामुळे ओढवलेल्या संकटांचा उल्लेख केला आहे. कल्हणाने राजा हर्षाने (१०६९-११०१) मंदिरावर हल्ला केल्याचा संदर्भ दिला आहे. याशिवाय कुलीन घराण्यांनी कर भरण्यास नकार दिल्याने राजाने गावे लुटली असाही संदर्भ तो देतो. हर्षाने मंदिर लुटून त्या लुटीचा उपयोग एक शक्तिशाली सैन्य सुसज्ज करण्यासाठी केला गेला होता असे कल्हण नमूद करतो.

काश्मीरमध्ये इस्लाम कसा आला?

काश्मीर हा आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच महत्त्वाचा प्रदेश होता आणि आहे. मुस्लीम, बौद्ध आणि तुर्क शतकानुशतके या भागातील राजनीतीचा भाग होते. १२ व्या शतकात काश्मीरमध्ये तुर्क हजर असल्याचे उल्लेख आपल्याला राजतरंगिणीमध्ये सापडतात. राजा हर्षाने तुर्कांच्या दरबारी फॅशनची नक्कल केल्याचा पुरावा देखील आहे, ज्याचे वर्णन कल्हणाने केले आहे.

द्वितिया राजतरंगिणी

उत्तर भारताप्रमाणे, काश्मीरमध्ये मुस्लीम राजवटीने तुर्क आक्रमकांबरोबर प्रवेश केला नाही असा संदर्भ जोनराजाने दिला आहे. पंडित जोनराजा हा काश्मिरी इतिहासकार आणि संस्कृत कवी होता. द्वितिया राजतरंगिणीचे श्रेय जोनराजाकडे जाते. जोनराजाने दिलेल्या संदर्भानुसार कल्हणाच्या कालखंडानंतर काश्मीरमधील राजकीय परिस्थिती सतत बिघडायला सुरुवात झाली होती. याच कालखंडात मंगोलांनी दिल्ली सल्तनत आणि त्याच्या सभोवतालच्या प्रदेशात विस्ताराला सुरुवात केली. १३२० साली रिंचना नावाच्या तुर्क असलेल्या लडाखी बौद्धाने या भागात सत्ता स्थापन केली. यासाठी स्थानिक शैव गुरूंचाही पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो जन्माने इतर जातीतील असल्याने त्याला पाठिंबा मिळू शकला नाही. यानंतर त्याने इस्लाम स्वीकारला. ही गोष्ट हर्षाच्या कित्येक वर्ष आधी घडली होती. असा संदर्भ जोनराजा देतो.

सुलतान सिकंदर

सुलतान सिकंदर (१३८९-१४१३), याने पर्शियन सुफींच्या स्थलांतराला प्रोत्साहन दिले होते. त्यांच्या काळात मंदिराची विटंबना झाली. ब्राह्मणांवर आणि मंदिरांवर हल्ले घडवून आणल्याबद्दल या सुफींना दोष देताना त्याने आधीचा हर्ष आणि नंतर सुहभट्ट यांनाही दोष दिला आहे. सुहभट्ट हा एक काश्मिरी ब्राह्मण होता. याने राज्यप्रमुख म्हणून आपले स्थान राखण्यासाठी इस्लाम स्वीकारला होता.

अधिक वाचा: ज्ञानवापी मशिदीचे सत्य ‘या’ ब्रिटिश विद्वानाने आणले समोर? काय सांगते त्याचे संशोधन? 

घियास-उद-दीन झैनुल-अबिदिन

काही दशकांनंतर, जोनराजाचा आश्रयदाता झैन-उल-अबिदिन याने एक वेगळे धोरण अवलंबिल्याचे लक्षात येते. तो ब्राह्मण आणि संस्कृतचा महान संरक्षक होता. जोनराजा आणि त्याचे शिष्य यांनी त्याला विष्णूचा अवतार घोषित केले होते. झैन-उल-अबिदिन म्हणजेच शाहरुख शाही खान (१३९५ – १४७०), जो घियास-उद-दीन झैनुल-अबिदिन या नावाने देखील प्रसिद्ध होता, तो काश्मीरचा नववा सुलतान होता, त्याने १४१८ ते १४७० पर्यंत राज्य केले. त्याला बुधशाह म्हटले जात असे. त्याने काश्मीरमधील हिंदूंवरील जिझिया कर रद्द केला. त्यानेच गायींच्या कत्तलीवर बंदी घातली होती. संस्कृत भाषा आणि साहित्याला उदारमतवादी संरक्षण दिले. त्याला फारसी, संस्कृत आणि तिबेटी भाषा अवगत होत्या. त्याच्या आदेशाने महाभारत आणि कल्हणाच्या राजतरंगिणीचे फारसीत भाषांतर झाले. तो धार्मिक सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध होता. त्याने आपल्या वडिलांच्या कारकीर्दीत काश्मीर सोडलेल्या हिंदूंना परत बोलावले. हिंदूंना त्यांची मंदिरे बांधण्याची आणि धर्मशास्त्रानुसार वैयक्तिक कायद्याचे पालन करण्याची परवानगी दिली. त्यांनी विष देऊन घडवून आणली जाणारी गायींची हत्या थांबवली आणि गोमांस खाण्याबाबत काही नियम पारित केले. त्यांनी विद्वान ब्राह्मणांनाचे अनुदान पुन्हा सुरू केले.

एकूणच वरील संदर्भानुसार एक हिंदू राजा मंदिर उध्वस्त करतोय. त्याची तुलना सिकंदर नावाच्या मुस्लिम सुल्तानाशी करण्यात आली आहे. तर झैन-उल-अबिदिन हा तुर्क सुलतान हिंदू, ब्राह्मणांना आश्रय देत आहे. त्याला विष्णूचा अवतार घोषित करण्यात आले असा उल्लेख आहे. त्यामुळे काश्मीरचा मध्ययुगीन लिखित इतिहास बराच गोंधळात टाकणारा आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Muslim sultan of kashmir vishnus avatar hindu king temple destroyer what is the history of kashmir svs