Earthquake in Thailand and Myanmar : म्यानमार आणि थायलंड या दोन देशांना शुक्रवारी (२८ मार्च) भूकंपाचे तीव्र धक्के बसले. या भूकंपात अनेक बहुमजली इमारती जमीनदोस्त झाल्या. त्यात एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्याशिवाय दोन हजार ३७६ जण जखमीही झाले. त्यांच्यावर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. म्यानमारच्या जुंटा सरकारनं नुकताच मृतांचा नवीन आकडा जाहीर केला आहे. या भूकंपाची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल होती, अशी माहितीही तेथील सरकारनं दिली आहे. दरम्यान, म्यानमारमध्ये इतका विनाशकारी भूकंप नेमका कशामुळे झाला? त्यामागची कारणं काय? याबाबत सविस्तर जाणून घेऊ…

भूकंपानंतर म्यानमार आणि थायलंडमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. सध्या जगभरातील अनेक देश म्यानमारच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. भारतानेही म्यानमारला मदत पाठवली असून, बचावकार्यासाठी पथके रवाना केली आहेत. चीनमधील ३७ जणांचे पथक आज म्यानमारची राजधानी यांगून येथे दाखल झाले आहे. या पथकाकडून जखमींवर औषधोपचार केले जात आहेत. रशिया आणि अमेरिकेनेही म्यारमारला मदत देऊ केली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती म्यानमारच्या जंटा सरकारचे प्रमुख मिन आंग ह्लाइंग यांनी व्यक्त केली आहे.

भूकंप नेमका कशामुळे होतो?

भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात ऊर्जेचे उत्सर्जन होते आणि त्यामुळे भूकंप लहरी तयार होऊन, पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. परिणामी जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यांसारख्या घडना घडतात. यालाच भूकंप असे म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास ‘भूकंपनाभी’, असे म्हणतात, तर भूकंपनाभीच्या अगदी वर म्हणजेच भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस ‘भूकंपाचा केंद्रबिंदू’, असे म्हणतात. भूकंप प्रामुख्याने पृथ्वीच्या कवचाच्या कोणत्याही भागामध्ये समतोल नसल्यामुळे होतो. जसे की पृथ्वीच्या आत वायूचा विस्तार व आकुंचन, मानवनिर्मित हायड्रोस्टॅटिक दाब, जलाशय व तलाव यांसारखे जलस्रोत आणि प्लेट्सच्या हालचाली भूकंपाला कारणीभूत ठरतात.

आणखी वाचा : अमेरिकन विद्यापीठातील अभ्यासक्रमातून हिंदू धर्माची बदनामी? नेमका वाद काय?

म्यानमारमध्ये भूकंप कशामुळे झाला?

म्यानमारमध्ये इतका विनाशकारी भूकंप नेमका कशामुळे झाला? याचं उत्तर तेथील भूगर्भात दडलेलं आहे. त्यामुळे या भूकंपाचं कारण समजून घेण्यासाठी तिथल्या भूगर्भाची रचना समजून घेणं आवश्यक आहे. एपी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य म्यानमारमध्ये होता, जो मंडाले शहरापासून सुमारे १७.२ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे त्याचा फटका शेजारील देश थायलंडलाही बसला. बँकॉकमध्ये बांधकामाधीन असलेली एक गगनचुंबी इमारत कोसळून, त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला. या भूकंपाचे धक्के ईशान्य भारतातील काही भागांतही जाणवले. मात्र, तिथे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्याचं वृत्त नाही.

सागांग फॉल्ट म्हणजे काय?

म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू ज्या ठिकाणी आहे, ते एक अतिशय संवेदनशील भूकंपप्रवण क्षेत्र आहे. त्याला सागांग फॉल्ट, असं नाव देण्यात आलं आहे. सागांग फॉल्ट हे असं क्षेत्र आहे, जिथे पृथ्वीचे दोन भूभाग एक दुसऱ्यावरून घसरतात. तज्ज्ञांच्या मते, सागांग फॉल्ट ही एक लांब आणि सरळ रेषा आहे, जी उत्तर ते दक्षिण १,२०० किमीच्या अंतरावर पसरलेली आहे. त्यात म्यानमारमधील मंडाले व यांगून यांसारखी मोठी शहरे समाविष्ट आहेत, असं ‘अल जजीरा’नं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. गेल्या काही दशकांमध्ये सागांग फॉल्टवर होणारे भूकंप आणि भूस्खलनं म्यानमारमधील भौगोलिक स्थितीवर मोठा परिणाम करीत आहेत. या फॉल्टमुळे भारत आणि युरेशिया प्लेट्स यांमध्ये होणारी हालचाल भूकंप निर्माण करण्यास कारणीभूत ठरते.

सागांग फॉल्टविषयी तज्ज्ञांनी काय सांगितलं?

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, म्यानमारमधील भूकंप भारत आणि युरेशिया प्लेट्समधील ‘strike-slip faulting’मुळे झाला. याचा अर्थ असा की, या दोन टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळल्या. जपानच्या हवामान संस्थेनंही म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेला भूकंपाचं हेच कारण सांगितलं आहे. ‘द गार्डियन’शी बोलताना, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील भूभौतिकीय आणि हवामान विशेषज्ञ प्रोफेसर बिल मॅकगायर यांनी सांगितले, “हा भूकंप सागांग फॉल्टवर झाला, जो भारतीय प्लेट (पश्चिमेस) आणि युरेशियन प्लेट (पूर्वेस) यांच्यातील टेक्टोनिक प्लेट सीमा दर्शवितो.” भारतीय प्लेट फॉल्टवर युरेशियन प्लेटच्या तुलनेत वेगानं उत्तरेकडं सरकत आहेत, असंही ते म्हणाले.

सागांग फॉल्टची तुलना कशाबरोबर?

इम्पीरियल कॉलेज ऑफ लंडनमधील टेक्टोनिक्स तज्ज्ञ डॉ. रेबेका बेल यांनी सागांग फॉल्टची तुलना कॅलिफोर्नियातील सॅन आंद्रियस फॉल्टशी केली आहे. त्यामुळे १९९४ मध्ये नॉर्थरिज भूकंप झाला होता, ज्यामध्ये जवळपास ६० लोकांचा मृत्यू झाला होता आणि ८७ हजार इमारतींचं नुकसान झालं होतं. सागांग फॉल्टवर अलीकडच्या वर्षांत अनेक भूकंप नोंदवले गेले आहेत, ज्यात २०१२ च्या अखेरीस ६.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाचाही समावेश आहे. या विनाशकारी भूकंपात जवळपास २६ लोकांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय अनेक लोक गंभीररीत्या जखमी झाले होते.

हेही वाचा : मृत्यूदंड सुनावलेल्या दोषींच्या दया याचिकेसाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केला कक्ष, काय आहे नेमकं कारण?

म्यानमारमध्ये आतापर्यंत किती भूकंप झाले?

म्यानमारमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू सागांग प्रदेशात होता, ज्याला लागूनच मंडाले शहर आहे. स्थानिक मीडियाच्या माहितीनुसार, भूकंपाचा सर्वाधिक फटका मंडाले शहराला बसला आहे. तेथील शेकडो लोक मृत्युमुखी पडले आहेत. म्यानमारच्या जुंटा सरकारनं नुकताच मृतांचा नवीन आकडा जाहीर केला आहे. या विनाशकारी भूकंपात १,००२ लोकांचा मृत्यू आणि दोन हजार ३७६ जण जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. अजूनही ३० जण बेपत्ता असून, त्यांचा शोध घेणं सुरू आहे. यूएसजीएसच्या आकडेवारीनुसार, १९०० पासून सागांग फॉल्टजवळ ७ रिश्टर स्केलपेक्षा जास्त तीव्रतेचे सहा भूकंप झाले आहेत.

म्यानमारमधील सर्वांत शक्तिशाली भूकंप

म्यानमारमध्ये सर्वांत शक्तिशाली भूकंप १९९० मध्ये झाला होता. त्या भूकंपात तब्बल ३२ इमारती कोसळल्या होत्या, ज्यामध्ये हजारो लोकांनी आपले प्राण गमावले होते. फेब्रुवारी १९१२ मध्येही शुक्रवारी झालेल्या भूकंपाच्या केंद्राच्या अगदी दक्षिणेस ७.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता, त्यामध्येही अनेकांचे जीव गेले होते. २०१६ मध्ये जवळजवळ त्याच भागात ६.९ तीव्रतेचा भूकंप झाला होता, ज्यात शेकडो लोक दगावले होते. थायलंड भूकंप-संवेदनशील क्षेत्र नाही आणि तिथ जाणवणारे सगळे भूकंपशेजारील म्यानमारमध्येच होतात, असं सांगितलं जात आहे. त्यातच बँकॉकमध्ये इमारती बांधताना भूकंपरोधी तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. त्यामुळे भूकंप झाल्यास तिथे जास्त नुकसान होण्याची शक्यता असते.