Myopia Disease आजकाल बहुतांश मुलांना बाहेरच्या खेळांऐवजी मोबाईलवरील वा व्हिडीओ गेममध्ये जास्त रस असतो. हल्ली पालक लहान वयातच मुलांच्या हातात मोबाइल देतात. मग हळूहळू त्यांना मोबाईलचे जणू व्यसनच लागते. कोरोनापासून अभ्यासासाठीही मुले मोबाईल, लॅपटॉपची मदत घेतात. परंतु, अनेक संशोधनांतून याचे मुलांवर होणारे दुष्परिणाम समोर आले आहेत. तज्ज्ञ नेत्रचिकित्सकांनी असे सांगितले की, २०३० पर्यंत पाच ते १५ वर्षे वयोगटातील भारतातील शहरी मुलांपैकी एक-तृतीयांश मुलांना मायोपिया हा आजार होण्याची शक्यता आहे. पुण्यातील खराडी येथील मणिपाल रुग्णालयातील सल्लागार व नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. विजय परबतानी यांनी लहान मुलांमध्ये मायोपिया प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे वर्णन ‘महामारी’ असे केले आहे.
ते म्हणाले, “आता भारतातील मुलांमध्ये मायोपिया हा आजार महामारी ठरत आहे. अवघ्या दशकभरापूर्वी मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण पाच ते सात टक्के होते, ते आज २० ते २५ टक्क्यांवर पोहोचले आहे. आता, अशी शक्यता वर्तवली जात आहे की, २०५० पर्यंत भारतात प्रत्येक तिसरे मूल मायोपियाने ग्रस्त असेल. मायोपिया हा आजार नक्की काय आहे? हा आजार किती गंभीर आहे? याची लक्षणे काय आणि यापासून मुलांचा बचाव कसा करता येईल? याविषयी जाणून घेऊ या.
हेही वाचा : २ दिवसात ३५ जण आगीच्या भक्ष्यस्थानी; नियमांकडे दुर्लक्ष होतंय का?
मायोपिया म्हणजे काय?
मेयो क्लिनिकच्या मते, मायोपिया हा असा आजार आहे; ज्यामुळे मुले जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतात. मात्र, त्यांना दूरवर असलेल्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. मायोपिया आजार असणार्यांच्या रेटिनावर प्रकाशाची किरणे थेट पडत नाहीत. त्यामुळे त्यांना दूरचे अंधुक दिसू लागते. परिणामी, स्पष्ट दिसावे यासाठी त्यांना चष्म्याची गरज भासते.
नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या फेनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिनमधील ऑप्थॅल्मोलॉजी आणि न्यूरोसायन्स विभागातील सहयोगी प्राध्यापक ग्रेगरी श्वार्ट्झ यांनी रीडर्स डायजेस्ट इंडियामध्ये स्पष्ट केले, “आपल्या डोळ्यांना ‘स्टॉप सिग्नल’ असते; जेणेकरून बुबुळाचा आकार डोक्याच्या प्रमाणात वाढतो. परंतु, या सिग्नलमध्ये आनुवंशिक आणि पर्यावरणीय घटकांमुळे व्यत्यय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बुबुळ ऑप्टिक्स (लेन्स आणि कॉर्निया)पेक्षा जास्त वाढतात. बुबुळ आणि ऑप्टिक्स यांच्यातील या विसंगतीमुळे दूरवरच्या वस्तू अंधुक दिसू लागतात.”
अस्पष्ट दृष्टी, दूरच्या वस्तू पाहण्यात अडचण, डोळ्यांवर ताण, डोकेदुखी व थकवा ही मायोपिया आजाराची लक्षणे आहेत; जी आज अनेकांमध्ये दिसून येते. बदलत्या जीवनशैलीमुळे हा एक सामान्य विकार झाला आहे आणि जगभरातील सार्वजनिक आरोग्याचा एक महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. २०२१ मध्ये अमेरिकन नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार २०५० पर्यंत जगातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला मायोपिया झालेला असेल.
मायोपियाची प्रकरणे का वाढत आहेत?
तज्ज्ञांचा असे सांगणे आहे की, बैठ्या जीवनशैलीचे वाढते प्रमाण, कमी होणारी बाह्य क्रियाकलापता आणि स्क्रीनचा प्रमाणापेक्षा अधिक वापर यांमुळे लहान मुलांमध्ये मायोपियाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. लहान मुले टीव्ही आणि मोबाईल स्क्रीनच्या दीर्घकाळ संपर्कात राहत असल्याने या प्रकरणांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. “स्क्रीन जास्त वेळ पाहिल्यामुळे मुलांचे डोळे, डोळयातील पडदा व मेंदू उत्तेजित होतो; ज्यामुळे बुबुळाच्या आकारात वाढ होते आणि मायोपिया हा आजार होतो,” असे मुंबईचे मोतीबिंदू सर्जन व ठाण्यातील डॉ. अग्रवाल नेत्र रुग्णालयामधील डॉ. स्मित एम. बावरिया यांनी सांगितले.
१९९९ पासून आजाराच्या प्रमाणात वाढ
“दरवर्षी ०.८ टक्क्याच्या प्रमाणानुसार आधारित आमचे अंदाज असे सूचित करतात की, मुलांमध्ये मायोपियाचे प्रमाण २०३० मध्ये ३१.८९ टक्के, २०४० मध्ये ४० टक्के व २०५० मध्ये ४८.१ टक्के वाढेल. याचा अर्थ भारतातील प्रत्येक दोन मुलांपैकी एक मूल या आजाराने ग्रस्त असेल, असे डॉ. स्मित पुढे म्हणाले. डॉ. हिमिका गुप्ता, मुंबईस्थित एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलमधील सल्लागार व नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. हिमिका गुप्ता यांनीही हीच चिंता व्यक्त केली. त्यांनी ‘न्यूज१८’ला सांगितले की, मुलांमध्ये दूरदृष्टी कमजोर होण्याचे प्रमाण १९९९ मध्ये ४.४४ टक्के होते, जे २०१९ मध्ये २१.१५ टक्क्यांपर्यंत वाढले झाले आहे.
तज्ज्ञांनी कबूल केले की, मायोपिया या आजारामध्ये आनुवंशिकतेसह पर्यावरणीय घटकदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. नवी दिल्लीच्या सेंटर फॉर साईटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महिपाल सिंग सचदेव यांनी आयएएनएसला सांगितले की, घरामध्ये राहिल्यामुळे अत्यावश्यक नैसर्गिक प्रकाशाच्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. “नैसर्गिक प्रकाश हा डोळ्यांच्या निरोगी विकासासाठी आवश्यक असतो. दिवसाचा हा प्रकाश मिळविण्यासाठी बाह्य क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे,” असे बेंगळुरूच्या नेत्रधामा सुपर स्पेशालिटीच्या वरिष्ठ सल्लागार आय हॉस्पिटलच्या इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट व वरिष्ठ सल्लागार डॉ. सविता अरुण यांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितले.
मायोपिया कसा टाळायचा?
“आम्हाला वाटते की बाहेरचा क्रियाकलाप वाढविणे हा मायोपिया आजार टाळण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय आहे,” असे नॅशनल पब्लिक रेडिओतील बालरोग नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नोहा एकडवी यांनी सांगितले. ऑल इंडिया ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीने प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ४० ते १२० मिनिटांचा बाहेरचा वेळ आणि सूर्यप्रकाश यांमुळे मायोपियाचा परिणाम कमी होऊ शकतो, असे गुरुग्रामच्या फोर्टिस आय इन्स्टिट्यूटमधील डॉ. पारुल एम. शर्मा यांनी ‘न्यूज १८’ला सांगितले.
हेही वाचा : ‘बेबी केअर सेंटर’ लागलेल्या आग प्रकरणात धक्कादायक खुलासे; त्या रात्री नक्की काय घडलं?
त्या पुढे म्हणाल्या, “शाळांनी त्यांच्या अभ्यासक्रमात बाह्य क्रियाकलापांसाठी विशिष्ट कालावधी द्यायला हवा. अभ्यासासाठी स्क्रीनवर असलेल्या मुलांच्या डोळ्यांना थोडी विश्रांती मिळायला हवी.” २०-२० नियमाचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉक्टर २० मिनिटांनी २० सेकंद आपले डोळे बंद करण्याचा सल्ला देतात. मैदानी क्रियाकलापांव्यतिरिक्त मुलांना नियमित मैदानी खेळाच्या फायद्यांविषयी सांगणे, स्क्रीन टाइम मर्यादित करण्याचे महत्त्व सांगणे, वाचनादरम्यान पुरेशा प्रकाशाची खात्री करणे आणि नियमित डोळ्यांची तपासणी करणे यांविषयी जागरूक करणे आवश्यक असल्याचेही तज्ज्ञ सांगतात.