करोनानंतर आता पुन्हा एका साथीच्या रोगाची चर्चा सुरू आहे, तो म्हणजे ‘डिसीज एक्स.’ डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये जीवघेणा ‘डिसीज एक्स’चा उद्रेक वाढताना दिसत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांना ‘डिसीज एक्स’ या संसर्गजन्य रोगाच्या उद्रेकाचे कारण काही दिवसांत कळेल अशी अपेक्षा आहे. या आजारामुळे ऑक्टोबरच्या अखेरीपासून शेकडो लोक आजारी पडले असून किमान ७९ लोकांनी आपला जीव गमावला आहे. काय आहे ‘डिसीज एक्स’? याची लक्षणे काय? या आजारामुळे महामारीसारखी परिस्थिती उद्भवू शकते का? त्याविषयी जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वाधिक मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश

आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे संचालक जीन कासेया यांनी सांगितले की, फ्लूसारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या ३७६ पैकी जवळपास २०० पाच वर्षांपेक्षा लहान मुले आहेत. मृतांपैकी बहुतांश १५ ते १८ वयोगटातील आहेत, असेही त्यात म्हटले आहे. ‘एक्स’वर दिलेल्या निवेदनात मंत्रालयाने सांगितले की, या रोगाच्या ओरिजिन म्हणजेच मूळ काय आहे, याचा शोध सुरू आहे. हा रोग सर्वप्रथम दक्षिण-पश्चिम काँगोमधील क्वांगो प्रांतात आढळला होता. ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेण्यात अडचण आणि अशक्तपणाची प्रकरणे २४ ऑक्टोबर रोजी दक्षिण-पश्चिम प्रांतातील क्वांगो येथील पांझी हेल्थ झोनमध्ये पहिल्यांदा नोंदवली गेली होती. राष्ट्रीय अधिकाऱ्यांनी १ डिसेंबर रोजी लोकांना याविषयी सतर्क केले होते. कासेया यांनी गुरुवारी पत्रकारांना संबोधित केले आणि म्हणाले, “आम्हाला जवळजवळ पाच ते सहा आठवडे उशीर झाला आहे आणि या पाच ते सहा आठवड्यांत अनेक गोष्टी घडू शकतात, त्यामुळे समस्येच्या मुळापर्यंत आम्हाला लवकरात लवकर पोहोचावे लागेल.

आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे संचालक जीन कासेया यांनी सांगितले की, फ्लूसारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या ३७६ पैकी जवळपास २०० पाच वर्षांपेक्षा लहान मुले आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : एटीएममधून काढता येणार पीएफ खात्यातील पैसे? ‘EPFO ​​3.0’ नक्की काय आहे?

काँगोचे आरोग्य मंत्री सॅम्युअल रॉजर काम्बा यांनी किन्शासा येथे पत्रकारांना सांगितले की, “आम्ही जास्तीत जास्त सतर्क आहोत, आम्ही ही महामारीची पातळी मानतो, ज्याचे निरीक्षण करणे आवश्यक आहे.” सरकारने लोकांना साबणाने स्वच्छ हात धुण्याचे, मोठ्या प्रमाणात एकत्र येणे टाळण्याचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय मृतांच्या देहाला स्पर्श करणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

काय आहे ‘डिसीज एक्स’?

गूढ फ्लूसारखा रोग इन्फ्लूएंझा रक्ताभिसरण वाढलेल्या वेळी उद्भवतो. हा आजार कोणत्या इन्फेक्शनमुळे होईल हे सांगता येत नसल्याने जागतिक आरोग्य संघटनेने त्याला ‘डिसीज एक्स’ असे एक काल्पनिक नाव दिले आहे. फेब्रुवारी २०१८ सालीच जागतिक आरोग्य संघटनेने संभाव्य आजारांच्या यादीत ‘डिसीज एक्स’चा उल्लेख केला होता. नॅशनल पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूटचे महासंचालक डियुडोन मवाम्बा यांच्या म्हणण्यानुसार, हा आजार हवेतून पसरण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव क्षेत्रापासून सुमारे ५०० किलोमीटर अंतरावरील किन्शासा येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत रुग्णांच्या नमुन्यांचे विश्लेषण केले जात आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, चाचण्या ४८ तासांच्या आत पूर्ण केल्या जाऊ शकतात आणि निकाल या आठवड्याच्या शेवटी जाहीर केला जाईल.

कोविड-१९ महामारीने देशांना सीमा बंद करण्यास भाग पाडल्यानंतर व आर्थिक आणि सामाजिक क्रियाकलाप ठप्प झाल्यानंतर काही वर्षांनी जगभर पसरण्याची क्षमता असलेल्या नवीन रोगजनकांच्या उदयाची चिंता या उद्रेकाने वाढली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, एमपॉक्सच्या नवीन स्ट्रेनच्या प्रसारामुळे जागतिक आरोग्य संघटनेने याला सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले होते.

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये जीवघेणा ‘डिसीज एक्स’चा उद्रेक वाढताना दिसत आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

उपाययोजना काय?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आफ्रिका विभागाच्या अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितले की, त्यांनी लॅब तपासणीकरिता नमुने गोळा करण्यासाठी दुर्गम भागात एक टीम पाठवली आहे. ‘एनबीसी न्यूज’नुसार, काँगोमध्ये कार्यालय असणाऱ्या यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने सांगितले की, त्यांना परिस्थितीची जाणीव आहे आणि ते स्थानिक आपत्कालीन ऑपरेशन केंद्राद्वारे पाठवलेल्या जलद प्रतिसाद टीमला तांत्रिक सहाय्य प्रदान करत आहे. प्रकरणे व्यवस्थापित करण्यासाठी आणि रोगाचे स्वरूप तपासण्यासाठी प्रतिसाद पथके क्वांगो प्रांतात पाठवण्यात आली आहेत. सरकारने नागरिकांना शांत आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी लोकांना साबणाने स्वच्छ हात धुण्याचे, जमावबंदीचे आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय मृतांच्या देहाला स्पर्श करणे टाळण्याचे आवाहन केले आहे. कासेया यांनी माहिती दिली की, आफ्रिका सीडीसी काँगोच्या अधिकाऱ्यांना महामारीशास्त्रज्ञ, प्रयोगशाळा शास्त्रज्ञ आणि संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण तज्ज्ञांसह मदत करत आहे. हा रोग महामारीसारखी परिस्थिती निर्माण करू शकतो, त्यामुळे अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

या जीवघेण्या आजाराचा परिणाम काय?

पांझी येथील रहिवासी क्लॉड निओन्गो यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नी आणि सात वर्षांच्या मुलीचा या आजाराने मृत्यू झाला. निओन्गो यांनी ‘असोसिएटेड प्रेस’ला सांगितले, “आम्हाला कारण माहीत नाही; त्यांना तीव्र ताप, उलट्या झाल्या आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला, ही अत्यंत चिंताजनक स्थिती आहे; कारण लोक आपला जीव गमावत आहेत.” सिव्हिल सोसायटीचे नेते सिम्फोरिअन मांझांझा म्हणाले की, संक्रमित लोकांची संख्या वाढत असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “पांझी हे ग्रामीण आरोग्य क्षेत्र आहे, त्यामुळे या भागात औषधांच्या पुरवठ्यात समस्या आहे.”

हेही वाचा : ४०,००० हून अधिक भारतीयांना अटक; अमेरिका-कॅनडा सीमेवर बेकायदा मार्गाने घुसखोरी वाढली, कारण काय?

पांझी येथे असलेल्या क्वाँगो प्रांताच्या सिव्हिल सोसायटीचे अध्यक्ष लुसियन लुफुतू म्हणाले की, ज्या स्थानिक रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जातात, तिथे उपचार साधनांची कमतरता आहे. त्यांनी ‘असोसिएटेड प्रेस’ला सांगितले, “औषधे आणि वैद्यकीय पुरवठ्याची कमतरता आहे, कारण हा रोग अद्याप ज्ञात नाही. बहुतेक लोकसंख्येवर पारंपरिक चिकित्सकांद्वारे उपचार केले जातात.”

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mysterious flu like disease x kills 79 people congo rac