पाच वर्षांपूर्वी नॉर्वेच्या किनाऱ्यावर सापडलेला बेलुगा व्हेल मासा रशियन गुप्तहेर असल्याची अफवा पसरली होती. आता त्यामागचे गूढ अखेर उकलले आहे. एप्रिल २०१९ मध्ये नॉर्वेच्या आसपासच्या बर्फाळ पाण्यात पांढऱ्या रंगाचा व्हेल मासा आढळून आला होता, ज्याच्या शरीरावर सेंट पीटर्सबर्गमधील काही उपकरणे, दोरी व कॅमेरा असल्याचे दिसले. त्यानंतर हा मासा रशियन गुप्तहेर असू शकतो, अशी अटकळ निर्माण झाली होती. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नावावरून या व्हेलला ‘ह्वाल्दिमिर’ असे नाव देण्यात आले होते. हा व्हेल मासा ३१ ऑगस्टला नॉर्वेच्याच समुद्रात मृतावस्थेत आढळून आला होता. खरंच हा व्हेल मासा रशियन गुप्तहेर होता का? संशोधकांना काय आढळून आले? हेरगिरी करण्यासाठी प्राण्यांचा वापर कसा केला जातो? त्यावर एक नजर टाकू या.
नॉर्वेमध्ये कसा सापडला रशियन गुप्तहेर व्हेल?
पाच वर्षांपूर्वी नॉर्वेच्या उत्तरेकडील किनारपट्टीवर मच्छीमारांना पहिल्यांदा हा व्हेल मासा दिसून आला होता. मच्छीमारांपैकी एक असलेल्या जोअर हेस्टेनने ‘बीबीसी’ला सांगितले की, हा व्हेल संकटात असल्याचे आणि त्याला माणसांच्या मदतीची गरज असल्याचे आम्हाला वाटले. तो इतर व्हेलपेक्षा वेगळा होता. त्याला प्रशिक्षित करण्यात आले होते. हेस्टेनने व्हेलला बांधलेली दोरी काढून टाकल्यानंतर तो पोहत हॅमरफेस्टच्या जवळच्या बंदरात गेला आणि तेथे बरेच महिने राहिला. नंतर हा व्हेल कोणाचा तरी हरवलेला मोबाईल फोन परत करताना दिसला. त्यावेळी त्याची अनेक छायाचित्रे काढण्यात आली. या व्हेलने सर्वांचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केल्याने, नॉर्वेजियन अधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवण्याची आणि त्याला खायला देण्याची तयारी केली. बेलुगा व्हेल रशियन गुप्तहेर असल्याच्या अफवा वाढल्या; परंतु रशियाने हे कधीच अधिकृतपणे स्वीकारले नाही.
हेही वाचा : हिंदू महिलेला डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली मोठी जबाबदारी; कोण आहेत तुलसी गबार्ड?
व्हेलचे रहस्य उलगडले
नॉर्वेमध्ये बेलुगा व्हेल पहिल्यांदा दिसल्याच्या पाच वर्षांनंतर बीबीसीने एक नवीन माहितीपट तयार केला; ज्याचे नाव होते ‘सीक्रेट्स ऑफ द स्पाय व्हेल’. या माहितीपटातून व्हेलविषयीच्या अनेक गोष्टी उघड झाल्या आणि हा व्हेल मासा गुप्तहेर नसून ‘गुप्त गार्ड व्हेल’ म्हणून प्रशिक्षित असल्याचे सांगण्यात आले. १९९० पासून २०२२ पर्यंत रशियामध्ये सागरी सस्तन प्राण्यांवर संशोधन करणाऱ्या डॉ. ओल्गा श्पाक यांनीदेखील याबाबत होकार दिला. त्यांनी बीबीसीला सांगितले की, बेलुगा व्हेल पहिल्यांदा २०१३ मध्ये रशियाच्या सुदूर पूर्वेकडील ओखोत्स्क समुद्रात पकडला गेला होता. एक वर्षानंतर व्हेलला सेंट पीटर्सबर्गमधील डॉल्फिनेरियमच्या मालकीच्या सुविधेतून रशियन आर्क्टिकमधील लष्करी कार्यक्रमात हलविण्यात आले, असे त्यांनी पुढे सांगितले.
त्या म्हणाल्या, “मी डॉल्फिनेरियममध्ये काम करणाऱ्यांकडून ऐकले आहे की, बेलुगा व्हेल हुशार होता आणि म्हणून त्याला प्रशिक्षित करण्यासाठी निवडण्यात आले. पण, त्याच वेळी त्याला तिथून बाहेर पडायचे होते आणि म्हणून तो तेथून चलाखीने प्रशिक्षण सोडून त्याला हवे तिथे गेला. त्याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. “बीबीसीच्या वृत्तानुसार, मुर्मन्स्कमधील रशियन नौदल तळाजवळील उपग्रह प्रतिमांमध्ये पांढऱ्या व्हेलचे काही पुरावे सापडले. हे बेलुगाचे जुने घर असू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली. ब्रिटिश ब्रॉडकास्टरशी बोलताना थॉमस निल्सन म्हणाले, “बेलुगा व्हेलचे स्थान पाणबुडी आणि पृष्ठभागावरील जहाजांच्या अगदी जवळ आहे. त्यातून हे स्पष्ट होते की, व्हेल खरोखर पहारेकरी यंत्रणेचा भाग होता.” डॉक्युमेंट्रीच्या दिग्दर्शक जेनिफर शॉ यांनी ‘द ऑब्झर्व्हर’ला सांगितले, “ह्वाल्दिमिरला गार्ड व्हेल म्हणून प्रशिक्षित करण्यात आले होते. पण, यातून प्रश्न उद्भवतात की, आर्क्टिकमध्ये रशियाला नक्की कशाचे संरक्षण करायचे आहे.” ‘ह्वाल्दिमिर’ या वर्षी सप्टेंबरमध्ये दक्षिण नॉर्वेच्या रिसाविका बे येथे मृतावस्थेत आढळला होता. प्राणी हक्क गटांनी दावा केला की, त्याला गोळी मारण्यात आली. परंतु, नॉर्वेजियन पोलिसांनी हे दावे फेटाळले.
हेही वाचा : मासिक पाळीच्या रजेचा विषय पुन्हा चर्चेत; भारतात काय आहेत नियम? कोणकोणत्या राज्यांत रजेची तरतूद?
सागरी सस्तन प्राण्यांना लष्करी प्रशिक्षण
रशिया आणि अमेरिकेमध्ये डॉल्फिन आणि व्हेलसारख्या जलचर प्राण्यांसाठी लष्करी प्रशिक्षण कार्यक्रम आहेत. माजी डॉल्फिन ट्रेनर ब्लेअर इर्विन कॅलिफोर्नियातील पॉइंट मुगु येथून चालवलेल्या यूएस नेव्हीच्या सुरुवातीच्या कार्यक्रमाचा भाग होते. त्यांनी ‘द ऑब्झर्व्हर’ला सांगितले, “डॉल्फिनची श्रवणशक्ती अत्यंत संवेदनशील असते.” ते आणि त्यांची टीम डॉल्फिनला गस्तीप्रमाणे पोहण्याचे प्रशिक्षण देत असे. सोविएत युनियनने लवकरच तत्सम पद्धती वापरून स्वतःचा कार्यक्रम सुरू केला. क्राइमियामधील सेवास्तोपोल येथे समुद्राच्या ताफ्याचे रक्षण करण्यासाठी डॉल्फिनला प्रशिक्षण देण्यात आले होते.