what is crying disease : आफ्रिकन देश काँगोच्या विषुववृत्तीय प्रांतात एका अज्ञात आजाराचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. ‘रडण्याचा आजार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या आजाराने महिनाभरात एक हजाराहून अधिक लोकांना संक्रमित केलं आहे. चिंताजनक बाब म्हणजे, यातील ६० हून अधिक लोकांचा काही तासांतच मृत्यू झाला आहे. इक्वेट्यूर प्रांतापासून जवळपास १९० किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन दुर्गम गावांमध्ये या आजाराची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी या भयंकर आजाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे, कारण आजाराची लक्षणे दिसून येताच काही तासांतच रुग्णांचा मृत्यू होत आहे. दरम्यान, हा आजार नेमका कसा पसरला, त्याची लक्षणे कोणती, त्यावर काही उपचार आहेत का? याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
बोलोको आणि बोमाटे गावात आढळले रुग्ण
प्राप्त माहितीनुसार, काँगोमधील बोलोको आणि बोमाटे या गावांमध्ये गेल्या महिन्यात एका गूढ आजाराच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाली आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आजारामुळे आतापर्यंत ६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या जागतिक आरोग्य संघटनेकडून या आजाराचे कारण शोधले जात आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
वटवाघळाचे मांस खाल्ल्याने तिघांचा मृत्यू
आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बोलोको गावात रहस्यमयी आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला होता, जिथे वटवाघळांचे मास खाल्ल्यानंतर ४८ तासांच्या आत तीन मुलांचा मृत्यू झाला. यादरम्यान बोमेटोमध्ये ४०० हून अधिक लोक आजारी पडल्याची नोंद झाली होती, त्यापैकी काहींमध्ये मलेरियासारखी लक्षणे आढळून आली. या घटनेचा या आजाराशी काही संबंध आहे की नाही याचा शोध डॉक्टरांकडून घेतला जात आहे.
आणखी वाचा : इडलीमुळे कॅन्सर? काय आहे धोक्याचं कारण?
बोलोको आणि बोमाटे दोन्ही गावं इक्वेट्यूर प्रांतातील वेगवेगळ्या आरोग्य क्षेत्रात येतात. त्यांच्यामधील अंतर जवळपास १२० किलोमीटरपेक्षा जास्त आहे. तरीही दोन्ही गावांमध्ये एकसारखे लक्षणं असलेले व्यक्ती कसे आढळून येत आहेत, असा प्रश्न आरोग्य अधिकाऱ्यांना पडला आहे. दरम्यान, हा आजार नेमका कसा पसरत आहे, तो संसर्गजन्य आहे का, हे तज्ज्ञांना अद्याप कळू शकलेले नाही.
रडण्याच्या आजाराची लक्षणे कोणती?
या आजाराची लक्षणे सामान्य विषाणूजन्य तापासारखी दिसतात, परंतु काही अतिशय विचित्र गोष्टीदेखील समोर आल्या आहेत. बोलोको गावातील तीन मुलांचा मृत्यू वटवाघळांचे मास खाल्ल्याने झाला हे तपासकर्त्यांनी शोधून काढलं आहे. मात्र, गावातील इतर नागरिक आजारी कसे पडले याबाबत सांशकता आहे. आजारी पडलेल्या नागरिकांमध्ये मलेरियासह विविध प्रकारची लक्षणे आढळून आली आहेत. ज्या व्यक्तींचा आजारामुळे मृत्यू झाला, ते सतत रडत होते. इतर आजारी पडलेले व्यक्तीही रडून-रडून घायाळ झाल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.
काँगोमधील वैद्यकीय अधिकारी काय म्हणाले?
बोलोको हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. सर्ज न्गालेबाटो यांनी दोन्ही गावांमध्ये पसरलेल्या साथींमधील फरक सांगितला आहे. “पहिल्या गावात रहस्यमयी आजाराने अनेक मृत्यू झाले आहेत. ही एक असामान्य बाब असून आम्ही त्यामागचे कारण शोधत आहोत. दुसऱ्या गावातील आजारी पडलेल्या व्यक्तींमध्ये आम्हाला मलेरियाचे बरेच रुग्ण आढळून आले आहेत”, अशी माहिती डॉ. न्गालेबाटो यांनी दिली आहे. पहिल्या गावातील व्यक्तींचा मृत्यूदर दुसऱ्या गावातील व्यक्तींपेक्षा खूपच जास्त असल्याचं डॉक्टरांनी वृत्तसंस्थेला सांगितलं.
रडता-रडता होतोय अनेकांचा मृत्यू
सध्या दोन्ही गावातील व्यक्तींची तपासणी केली जात असून त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. बोलोको गावात धुमाकूळ घालणाऱ्या आजाराला ‘रडण्याचा आजार’ असं नाव देण्यात आलं आहे. त्यामागचं कारण म्हणजे, आजाराची लागण झालेले व्यक्ती सतत रडत आहेत. रडता-रडता त्यांचा मृत्यूदेखील होत आहे. काँगोच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बोलोको आणि बोमाटे या दोन्ही गावांमधील ८० टक्के रुग्णांमध्ये ताप, थंडी वाजून येणे, अंगदुखी आणि अतिसार अशी लक्षणे आढळून आली आहेत.
ही लक्षणं दिसताच सावध होण्याची गरज
काही रुग्णांना मान, सांधेदुखी, घाम येणे आणि श्वास घेण्याचा त्रासही होत आहे. या आजाराचे मुख्य लक्षण म्हणजे, ५९ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना जास्त तहान लागते, तर तरुण मुले आणि महिलांमध्ये सतत रडणे हे प्राथमिक लक्षण असल्याचे दिसून आले आहे. डेली मेलच्या मते, स्थानिक अधिकाऱ्यांनी या आजाराचे वर्णन चिंताजनक आजार असे केले आहे. रुग्णांची प्रकृती झपाट्याने खालवत असल्याने काँगोच्या बाहेरील डॉक्टरांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे. रडण्याच्या आजाराची लागण झालेल्या बहुतांश व्यक्तींचा ४८ तासांच्या आत मृत्यू होत असल्याचं दिसून आलं आहे.
हेही वाचा : मार्केटमध्येही ‘डोनाल्ड डंख’? शेअर बाजारात सातत्याने मोठी पडझड का होत आहे?
जागतिक आरोग्य संघटनेनं घेतली दखल
सुरुवातीला हा आजार इबोला किंवा मारबर्ग विषाणूशी जोडला जात होता. कारण हे दोन्ही आजार वेगाने पसरतात आणि प्राणघातक आहेत. परंतु, जेव्हा रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली, तेव्हा इबोला आणि मारबर्ग विषाणूंची पुष्टी झाली नाही. आता जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि काँगो सरकार इतर ‘रडण्याच्या आजाराची’ संभाव्य कारणे शोधून काढत आहेत. मलेरिया, विषाणूजन्य रक्तस्त्राव ताप, अन्न विषबाधा, टायफॉइड आणि मेनिंजायटीस यांसारख्या इतर संभाव्य आजारांची शक्यता तपासली जात आहे.
आफ्रिकन देशात साथीच्या रोगाचे प्रमाण सर्वाधिक
बोलोकोमधील मृत्युमुखी पडलेल्या काही व्यक्तींनी वटवाघळांचे मांस खाल्ले होते, हे तपासात उघड झालं आहे; ज्यामुळे प्राण्यांपासून मानवांमध्ये पसरणाऱ्या झुनोटिक आजारांबद्दल नवीन चिंता निर्माण झाली आहे. गेल्या दशकात आफ्रिकन देशात अशा प्रकारच्या साथीच्या आजारांमध्ये ६०% वाढ झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. काँगोच्या राष्ट्रीय शैक्षणिक विद्यापीठातील सार्वजनिक आरोग्य विषयाचे प्रमुख प्राध्यापक गॅब्रिअल म्हणाले की, “काँगोचा सुमारे ६०% भाग उष्णकटिबंधीय जंगलात असल्याने देशात झुनोटिक रोगांचा धोका जास्त आहे. या सर्व विषाणूंचे साठे जंगलात आहेत. जोपर्यंत आपल्याकडे ही जंगले आहेत, तोपर्यंत आपल्याला नेहमीच उत्परिवर्तीत होऊ शकणाऱ्या विषाणूंच्या साथींना तोंड द्यावे लागेल.”
देशात इबोला आणि करोना व्हायरसचा प्रसार थांबविण्यासाठी काम करणाऱ्या गॅब्रिअल यांनी असा इशारा दिला आहे की, काँगोमधील लोकांनी वन्यप्राण्यांचे किंवा पक्षाचे मांस खाताना काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा ‘रडण्याचा आजार’ यासारख्या अनेक गंभीर आजारांचा देशात उद्रेक होऊ शकतो, ज्यामुळे हजारो लोकांचा जीव जाण्याची शक्यता आहे.