Nadir Shah Battle of Karnal 1739 : २४ फेब्रुवारी १७३९ रोजी कर्नाल येथे झालेल्या लढाईने भारतातील बलाढ्य मुघल साम्राज्याचा पाया कमकुवत केला. इराणच्या अफशरीद राजघराण्याचे संस्थापक नादिर शाहच्या सैन्याने मुघल सम्राट मुहम्मद शाह ‘रंगीला’च्या सैन्याचा अवघ्या तीन तासांतच पराभव केला. यानंतर नादिर शाहने मुघलांची तत्कालीन राजधानी दिल्लीवर कब्जा करून शाही तिजोरी रिकामी केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी मुघलांचे प्रसिद्ध मयूर सिंहासन आणि त्यावर जडवलेला हिरादेखील लुटून नेला.
लढाईत पराभूत झालेल्या मुघल सम्राटाला नादिर शाहने जीवदान दिलं. त्याचबरोबर जिंकलेला काही भागही त्यांना परत केला. परंतु, या युद्धामुळे भारतातील मुघल साम्राज्याचे वर्चस्वाला कायमची खिळ बसली. विशेष म्हणजे, यानंतरही पुढील ११८ वर्ष मुघलांनी दिल्लीवर राज्य केलं. मात्र, त्यांची ताकद हळूहळू कमी होत गेली. शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफरला राजधानीपलीकडे आपले साम्राज्य वाढवता आले नाही. दरम्यान, मुघल साम्राज्याचे पतन नेमके कसे झाले, याबाबत सविस्तर जाणून घेऊ.
मुघल साम्राज्याचे पतन कसे झाले?
इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी १९२२ मध्ये पाटणा विद्यापीठात सांगितले की, नादिर शाहनी केलेलं आक्रमण हे मुघल साम्राज्याच्या पतनाला कारणीभूत नव्हते. त्यामागे इतरही अनेक मोठी कारणे होती. १९२५ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘नादिर शाह इन इंडिया’ या पुस्तकात जदुनाथ सरकार यांची विधाने समाविष्ट करण्यात आली आहे. एकेकाळी बलाढ्य असलेल्या मुघल साम्राज्याच्या पतनामागील कारणांबद्दल इतिहासकार वेगवेगळी मतं मांडतात. काही इतिहासकारांचा असा दावा आहे की, औरंगजेबानंतर गादीवर बसलेले नवीन सम्राट कमकुवत होते.
आणखी वाचा : Obesity In India : भारतीय मुलांमध्ये लठ्ठपणा का वाढतोय? त्यावर मात कशी करावी?
इतिहासकार इरफान हबीब यांच्या मते, मुघल सम्राटांनी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त कराची वसुली सुरू केली, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात असंतोष निर्माण झाला आणि त्यांनी बंडाचे हत्यार उपसले. या बंडांना दडपण्यासाठी मुघलांना अतिरिक्त संसाधनांची आवश्यकता भासली. जसजशी कराची वसुली वाढत गेली, तसतसे बंडाच्या प्रमाणातही वाढ होत गेली. यामुळे एक वाईट चक्र निर्माण झाले, जे मुघल साम्राज्याच्या पतनाच्या केंद्रस्थानी होते.
मराठ्यांनी मुघलांना जेरीस आणलं
इतिहासकार एम. अतहर अली यांच्या मते, १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुघल दरबारातील नवाबांची संख्या वाढली, परंतु त्यांना पुरेशा जहागिरी मिळत नव्हत्या; यामुळे भ्रष्टाचार आणि अंतर्गत संघर्ष वाढला. परिणामी मुघलांच्या सैन्याचे मनोबल कमी झाले. काही इतिहासकारांच्या मते, औरंगजेबाच्या धार्मिक धोरणांमुळे (औरंगजेबाच्या अधिपत्याखालील मुघल शाही राजवट, १९६६). हिंदू आणि इतर बिगर-मुस्लीम समुदायांमध्ये असंतोष वाढला, ज्यामुळे मुघल साम्राज्यदेखील कमकुवत झाले.
औरंगजेबाच्या काळात मुघल साम्राज्याला अनेक आघाड्यांवर आव्हानांचा सामना करावा लागत होता. दक्षिणेकडील मराठे, पूर्वेकडील अहोम, उत्तर आणि पश्चिमेकडील जाट, राजपूत, बुंदेले आणि शीख हे मुघलांना सतत आव्हान देत होते. ते केवळ मुघल साम्राज्याचा प्रदेश आणि संपत्ती हस्तगत करत नव्हते, तर मुघल तिजोरीदेखील संपवत होते.
नादिर शाहचे भारतावरील आक्रमण
नादिर शाहने भारतावर हल्ला केल्यानंतर मुघलांच्या राजवटीला सर्वात मोठा धक्का बसला. इतिहासकारांनी नादिर शाहला ‘पर्शियाचा नेपोलियन’ असं संबोधलं आहे. नादिर शाहने प्रथम सफाविद राजवंशाचा पाडाव केल्यानंतर इराणमधील सत्तेवर कब्जा केला. त्याने केवळ पर्शियामध्ये सत्ता बळकट केली नाही, तर पलीकडे यशस्वी लष्करी मोहिमादेखील चालवल्या. पश्चिमेकडील ओटोमन, उत्तरेकडील रशियन, पूर्वेकडील अफगाण जमाती आणि मुघलांशी नादिर शाहने संघर्ष केला.
कर्नालची लढाई (२४ फेब्रुवारी १७३९)
१७३८ मध्ये कंदहार जिंकल्यानंतर, नादिर शाहने खैबर खिंडीतून भारतात प्रवेश केला. पश्चिमेकडून अलेक्झांडर ते तैमूरपर्यंतचे पूर्वीचे आक्रमणकर्ते याच मार्गाने भारतात आले होते. दरम्यान, भारतातील अनेक मुघल राज्यांवर आक्रमण केल्यानंतर नादिर शाहने दिल्लीकडे कूच करण्यास सुरुवात केली. इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या मते, मुहम्मद शाह ‘रंगीला’ने नादिर शाहचा सामना करण्यासाठी खूप वेळ घेतला. जूनमध्ये नादिर शाहने काबूल काबीज केला आणि नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत खैबर खिंड ओलांडली. त्याच्या आक्रमणांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुघल सम्राटाने सैन्य तयार केले. मात्र, तोपर्यंत नादिर शाह लाहोरला पोहोचला होता.
हेही वाचा : HKU5-CoV-2 : चीनमध्ये नव्या करोना व्हायरसचा उद्रेक; भारताला किती धोका? विषाणूची लक्षणे कोणती?
कर्नालच्या युद्धात काय घडले?
सध्या हरियाणामध्ये असलेल्या कर्नाल येथे मुघल सैनिकांनी नादिर शाहच्या सैनिकांवर आक्रमण केलं. इतिहासकारांच्या मते, मुघल सैन्यात तीन लाख सैनिक, दोन हजार हत्ती आणि तीन हजार तोफा होत्या. याशिवाय मुघल सैनिकांची संख्या जवळपास १० लाख होती. दुसरीकडे, नादिर शाहच्या सैन्यात फक्त ५५,००० सैनिक होते. मात्र, त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे आणि शिस्तबद्धता होती. यावेळी दोन्ही सैन्यांमध्ये घमासान युद्ध झालं आणि या युद्धात नादिर शाहच्या रणनीतीने मुघलांचा पराभव केला.
मुघलांची तिजोरी केली रिकामी
युद्धात विजय मिळवल्यानंतर नादिर शाहने मुघल सम्राट मुहम्मद शाह रंगीलाला ताब्यात घेतलं आणि तो दिल्लीला आला. इतिहासकार गुलाम हुसेन खान लिहितात, दिल्लीला आल्यानंतर नादिर शाहच्या सैनिकांनी लुटमार सुरू केली. जवळपास ३० हजार लोकांना ठार मारण्यात आलं. हजारो महिलांना कैद करून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. नादिर शाहच्या सैन्याने मुघलांचे मयूर सिंहासन आणि कोहिनूर हिरादेखील लुटून नेला.
इतिहासकार लिहितात, या युद्धानंतर नादिर शाहने मुघलांना त्यांची राजधानी परत दिली. तसेच स्वत:च्या मुलाचे लग्न मुघल सम्राटाच्या भाचीबरोबर लावून दिलं. मात्र, त्याने दिल्लीतील आठ पिढ्यांची संपत्ती लुटून नेली आणि मुघलांची तिजोरी पूर्णपणे रिकामी केली. युद्धात झालेल्या पराभवानंतर पुढील १०० वर्षांत, मुघलांचे साम्राज्य कमकुवत होत गेले. १८५७ मध्ये ब्रिटिशांनी शेवटचा मुघल शासक बहादूर शाह जफर याला सत्तेवरून काढून टाकले. त्यानंतर भारतातील मुघलांची राजवट कायमची संपुष्टात आली.