INLD Hariyana Chief Nafesingh Rathee Murder रविवारी इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी)चे हरियाणा प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी यांची झज्जर जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. झज्जरमधील बहादूरगड येथे राठी यांच्या एसयूव्हीवर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. त्यात माजी आमदार नफेसिंह राठी आणि त्यांच्या खासगी अंगरक्षकांपैकी एकाचा मृत्यू झाला; तर दोन जण गंभीर जखमी झाले.
लोकसभा निवडणूक तोंडावर असताना नेत्याची हत्या झाल्याने विरोधकांनी तीव्र संताप व्यक्त केला. विरोधकांनी राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करीत भाजपावर निशाणा साधला. आयएनएलडी नेते अभय चौटाला यांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “ज्यांना सुरक्षेची गरज आहे, त्यांना ती मिळत नाही. अनेक प्रकरणांमध्ये जो आरोपी आहे, त्यालाच सुरक्षा प्रदान केली जात आहे. त्यामुळे या घटनेसाठी मी स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनाच जबाबदार धरतो.”
कोण होते नफेसिंह राठी?
नफेसिंह राठी एक प्रमुख जाट नेता होते. ते बहादूरगडमधील जाटवाडा गावचे रहिवासी होते. ४० वर्षांपूर्वी त्यांनी इंडियन नॅशनल लोकदल पक्षातून राजकारणात प्रवेश केला. १९९६ ते २००५ बहादूरगडचे आमदार होते. त्यानंतर ते आयएनएलडी हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यासह त्यांनी दोन वेळा बहादूरगड नगर परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले. २०१४ मध्ये आयएनएलडीकडून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मात्र, भाजपानेही तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. २०१८ मध्ये ते आयएनएलडीमध्ये परतले. २०२० मध्ये त्यांना पूर्वीचे पद परत मिळाले. बिरबल दास धालिया यांच्यानंतर त्यांना आयएनएलडी हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले.
नफेसिंह राठी यांच्यावर गुन्ह्याचीही नोंद होती. भाजपाचे माजी मंत्री मांगे राम राठी यांचा मुलगा जगदीश राठी यांच्या आत्महत्येप्रकरणी नफेसिंह राठी यांना मुख्य आरोपी घोषित करण्यात आले होते. त्यांच्यावर कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राठी यांच्या विरोधात एक लूकआउट सर्क्युलरदेखील जारी करण्यात आले होते; ज्यामुळे त्यांना देश सोडून जाण्याची परवानगी नव्हती. मृत जगदीश राठी यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, नफेसिंह राठी त्यांना जमिनीच्या मुद्यावरून त्रास देत होते.
राठी यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर अभय चौटाला यांनी दावा केला की, नफेसिंह राठी यांनी त्यांना काही महिन्यांपूर्वी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते. राठी यांच्या जीवाला धोका असतानाही सरकार सुरक्षा पुरवीत नसल्याचा आरोप चौटाला यांनी केला. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि गृहमंत्री अनिल विज यांच्या राजीनाम्याची मागणीही चौटाला यांनी केली.
नफेसिंह राठी यांची हत्या कशी झाली?
राठी रविवारी आपल्या एसयूव्हीमधून प्रवास करीत होते. यावेळी सुरक्षेसाठी तीन खासगी अंगरक्षकदेखील त्यांच्यासोबत होते. अज्ञात हल्लेखोर ह्युंदाई आय १० कारमधून घटनास्थळी आले आणि बाराही रेल्वे क्रॉसिंगजवळ त्यांनी राठी यांच्या वाहनावर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर राठी यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले; परंतु रुग्णालयात नेताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. या हल्ल्यात तीन अंगरक्षकांनाही गोळ्या लागल्या; ज्यात एका अंगरक्षकाचा मृत्यू झाला. ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीत असे म्हटले आहे की, या हल्ल्यात मृत्यू झालेला अंगरक्षक जय किशन हा झज्जरमधील मंदोठी गावचा रहिवासी होता. इतर दोन जखमी अंगरक्षकांवर अद्याप उपचार सुरू आहेत.
“पोलिसांची सीआयए आणि एसटीएफ ही पथके या घटनेचा तपास करीत आहेत. आम्ही आरोपींना लवकरच अटक करू,” असे झज्जरचे पोलिस अधीक्षक अर्पित जैन म्हणाले. ‘न्यूज ९ लाइव्ह’च्या वृत्तात म्हटले आहे की, संशयाची सुई लॉरेन्स बिश्नोई टोळीकडे वळल्यामुळे पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या वृत्तात दिले आहे की, पोलिसांना या हल्ल्यामागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा हात असल्याचा संशय आहे. त्यासह प्राथमिक चौकशीत मालमत्तेचा वाद या हत्येला कारणीभूत असल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले की, पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. विशेष टास्क फोर्स या प्रकरणाचा तपास करीत असून, दोषींना लवकरच पकडण्यात येईल.
हेही वाचा : मायावतींच्या बसपाला मोठा धक्का; “पक्षात मला संधी नाही” म्हणत खासदाराचा भाजपामध्ये प्रवेश
विरोधकांचा भाजपावर आरोप
ही घटना उघडकीस आल्यानंतर काही वेळातच काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करीत सत्ताधारी पक्षावर टीका केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदरसिंग हुड्डा म्हणाले, “आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी यांची हरियाणामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्याचे दिसून येते. आज राज्यात कोणालाही सुरक्षित वाटत नाही.” आप नेते सुशील गुप्ता म्हणाले, “हरियाणात जंगल राज आहे. आज हरियाणात कोणीही सुरक्षित नाही.” आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. भाजपा सरकारमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे, असे केजरीवाल म्हणाले.