Nagin in Indian Mythology मानवी मन हे रहस्यमय गोष्टींचा नेहमीच मागोवा घेण्याचा प्रयत्न करते. भारतीय मिथकशास्त्रात साप, नाग या प्राण्यांच्या सभोवताली गूढतेच वलय असल्याचे दिसते. किंबहुना गूढता आहे म्हणून अनेकांसाठी ते पूजनीय आहेत. भारताप्रमाणे अनेक संस्कृतींसाठी नाग हा त्यांच्या आदिम संस्कृतीचे प्रतीक आहे. असे असले तरी भारतात आदिम संस्कृतीचे प्रतीक, वांशिक किंवा संरक्षक देव यापलीकडे जाऊन नागाचे अंधाऱ्या काळोखात सळसळणाऱ्या इच्छाधारी नागिणीचे रूप जनमानसात अधिक प्रसिद्ध आहे. त्यामुळेच मंदिरात देवतेच्या स्वरूपापासून ते सिनेमातील मुख्य पात्रापर्यंत नागाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नागांविषयी अनेक कथा जनमानसात प्रचलित आहेत. नाग हे नागमण्याचे रक्षण करतात. नागमण्याचे रक्षण करणारे नाग रूप बदलणारे असतात, अशी धारणा भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली आहे. म्हणूनच इच्छाधारी नाग आणि नागिणीची लोकप्रियता गूढ ते सांस्कृतिक प्रतिकांपर्यंत विकसित झाली आहे. आज नागपंचमीच्या निमित्ताने त्याच इच्छाधारी नागिणीच्या आख्यायिकेचा घेतलेला हा शोध.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: Nag Panchami 2024: छोटे गुरु का, बडे गुरु का, नागलो भाई नागलो; भारतातील नागपंचमीच्या विविध प्रथा काय सांगतात?

इच्छाधारी नागीणीची दंतकथा

इच्छधारी नागिणीशी संबंधित वेगवेगळ्या गूढकथा देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रचलित आहेत. या कथांच्या माध्यमातून प्रादेशिक भिन्नता एका समान धाग्याने जोडली गेली आहे. या कथांमध्ये आढळणारे नाग आणि नागीण हे इच्छा पूर्ण करणारे आणि इच्छेनुसार रूप धारण करणारे असल्यामुळे त्यांना इच्छाधारी नाग आणि नागीण म्हटले जाते. त्यांचा संबंध हा शिवाशी जोडलेला असल्याने ते अधिक पूजनीय ठरतात. देशभरातील नागीण लोककथांमध्ये, नागमणीची आख्यायिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रचलित आख्यायिकेनुसार एखादा नाग आपल्या जीवनात एकदाही आपल्या विषग्रंथींचा वापर करत नाही, त्यावेळेस त्याचे विष कालांतराने एका स्फटिकात रूपांतरित होते. त्याच स्फटिकाला नागमणी असे म्हणतात. या मण्याला निळ्या रंगाची छटा असते. हा मणी नागाला शिकार शोधण्यासाठी अंधारात प्रकाश देतो. एकदा रत्न तयार झाल्यानंतर नागाचा प्राथमिक हेतू कोणत्याही वाईट शक्तींपासून रत्नाचे रक्षण करणे हाच असतो. ज्याच्याकडे रत्न आहे तो या रत्नात असलेल्या जादुई शक्तींचा स्वामी होतो. त्यामुळे झटपट प्रचंड संपत्ती जमा करण्याची आणि दीर्घकाळ जगण्याची हाव असणारे या मण्याच्या शोधात असतात. नाग मण्याच्या निर्मितीबद्दल आणखी एक प्रचलित कथा आहे. स्वाती नक्षत्र असताना पडणाऱ्या पावसाचे थेंब नागाच्या तोंडात पडले की हा मणी विकसित होते. हा नागमणी त्या नागाला कोणतेही रूप धारण करण्याची शक्ती देतो. याच इच्छाधारी नागांच्या आख्यायिकेनुसार हा मणी काढून घेतल्यावर ते नाग मृत्यू पावतात. कोणी नागमणी चोरला तर नागदेवता क्रुद्ध होते. म्हणूनच कदाचित सिनेमांमध्ये नागीण नागमणी चोरणाऱ्यांचा बदला घेताना दाखवण्यात आली आहे.

भारतीय संस्कृती आणि धार्मिक परंपरांमध्ये रुजलेली..

अनादी काळापासून भारतीय संस्कृती आणि धार्मिक परंपरांमध्ये रुजलेल्या इच्छाधारी नागीणीच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या लोककथांचा परिणाम म्हणून अर्धा मानव आणि अर्धा साप अशा आकृत्यांचे चित्रण करणारी शिल्पे अनेक मंदिरांच्या भिंतींना सुशोभित करताना दिसतात. विशेष म्हणजे शिवमंदिराच्या शिल्पसंभाराचा ते भाग असतात. हल्लीच ओडिशाचे जगन्नाथ मंदिर प्रचंड चर्चेत होते. या मंदिरातील रत्नभांडार उघडण्यात आले. या रत्नभांडाराचे रक्षण एक भला मोठा नाग करतो, अशी कथा प्रचलित आहे. याशिवाय बाराव्या शतकात गंगा वंशाचा राजा स्वप्नेश्वरदेव याने बांधलेल्या भुवनेश्वरमधील मेघेश्वर शिवमंदिरात मंदिराचे द्वारपाल म्हणून सात-हुडांच्या नाग आणि नागिणीची जोडी आहे. त्याच शहरातील राजा- राणी मंदिराच्या प्रवेशद्वारावर नाग आणि नागिणीचे नक्षीकाम केलेले आहे. हिमाचल प्रदेशात बुढ़ी नागिण मंदिर हे भारतातील धार्मिक प्रथांमध्ये नागिणीला किती महत्त्व आहे, याची जिवंत साक्ष देते. या मंदिरातील देवता तेथील लोकांचे रक्षण करते अशी धारणा आहे. मंदिरातील वार्षिक जत्रा बूढी नागिणीच्या एका स्थानिक राजकुमाराशी झालेल्या विवाहाची आठवण करून देते. बुढी नागिन राजकुमाराच्या प्रेमात पडली आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असे म्हटले जाते. पण राजपुत्र नागिणीशी लग्न करण्यास संकोच करत असल्याने तिने त्याला मानवी रूपात दर्शन दिले. नागिणीच्या सहवासासाठी प्रसिद्ध असलेले दुसरे मंदिर म्हणजे कानपूरचे खेरेपाटी शिव मंदिर, जे अजूनही इच्छाधारी नाग-नागिणीच्या जोडीचे घर असल्याचे मानले जाते.

नागीणनृत्य

नागीण नृत्याची मंत्रमुग्ध करणारी परंपरा ही भारतीय संस्कृतीतील नागीण लोककथांच्या आकर्षक उत्क्रांतीचे प्रकटीकरण आहे. विख्यात अभिनेत्री श्रीदेवीचे ‘नगीना’ चित्रपटात लोकप्रिय नृत्य, नागाच्या हालचालींसारखे दिसणाऱ्या साध्या आणि विचित्र हालचालींमुळे सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय झाले. २०१६ मध्ये बांगलादेश प्रीमियर लीग सामन्यादरम्यान गोलंदाज नजमुल इस्लाम अपूने नागीण नृत्यासह आपला विजय साजरा केला. तेव्हापासून, क्रिकेट चाहत्यांसाठी त्यांचा आनंद व्यक्त करण्याचा हा एक लोकप्रिय मार्ग ठरला आहे, ज्याचे सर्वात अलीकडील उदाहरण म्हणजे २०२३ मधील श्रीलंका विरुद्ध बांगलादेश सामन्यात चाहते त्यांच्या आवडत्या संघासोबत नागीण नृत्य करताना दिसले.

माध्यमे आणि साहित्यात इच्छाधारी नागिणीचे चित्रण..

इच्छाधारी नागिणीची आख्यायिका भारतीय पौराणिक कथांमध्ये शतकानुशतके लोकप्रिय असली तरी, भारतीय साहित्य आणि माध्यमांमध्ये या गूढ प्राण्यांचे समकालीन चित्रणही तितकेच लोकप्रिय आहे. आसामी कवी आणि लेखक, लक्ष्मीनाथ बेझबरुआ यांनी लिहिलेल्या कथांपैकी एक ‘बुर्ही आई र झाडू’ (आजीचे किस्से) मधील ‘चंपावती’ ही कथा चंपावती या नायकाचे एका आकार बदलणाऱ्या नागाशी लग्न कसे होते याभोवती फिरते. या कथेने आसामी संस्कृतीच्या संदर्भात सापांना किती महत्त्व आहे यावर लक्ष केंद्रित केले आहे. मयूर डिडोलकर यांचा ‘नागिण’ हा नऊ लघुकथांचा संग्रह आहे. भारतीय माध्यमांमध्ये, विशेषत: टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये नागीण लोककथेचे चित्रण, भारताच्या प्रेमात पडण्याचे कारण आहे यात शंका नाही. विशेषत: १९७६ मधील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘नागिन’पासून सुरू झालेल्या मनोरंजन क्षेत्रातील नागीण प्रकाराचा भारत अभिमानास्पद जनक आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

अधिक वाचा: Nag Panchami 2024: नागपंचमी का साजरी केली जाते? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

हा चित्रपट इच्छाधारी नागिणीची (रीना रॉय) कहाणी सांगतो, जी खुनी व्यक्तींवर हल्ला करून आपल्या प्रियकराच्या मृत्यूचा बदला घेण्याचा प्रयत्न करते. १९८६ मध्ये रिलीज झालेला आणि श्रीदेवी अभिनीत “नगीना” हा चित्रपट अशाच कथानकाला अनुसरून आहे. या चित्रपटात श्रीदेवीने रजनीची भूमिका केली आहे, जी तिच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या दुष्ट मांत्रिकाचा बदला घेण्यासाठी एका कुटुंबात लग्न करते. या दोन्ही चित्रपटांमध्ये स्त्री कलाकार मुख्य भूमिकेत आहे. भारतीय चित्रपट क्षेत्राला स्त्रीवादी दृष्टीकोनांचा परिचय करून देण्यासाठी ‘नागिण’ चित्रपट जबाबदार होता, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. रेखा-जितेंद्र यांनी “शेषनाग” या चित्रपटात काम केले, हा चित्रपट इच्छाधारी नाग-नागिणीच्या जोडीवर लक्ष केंद्रित करतो. या आणि इतर चित्रपटांमध्ये चित्रित केलेल्या प्रेम, सूड आणि संरक्षण यासारख्या थीम्सच्या संयोजनानेच भारतातील सर्वात लोकप्रिय नागीण या टेलिव्हिजन मालिकेला जन्म दिला. इच्छाधारी नाग-नागिणीचे अस्तित्व हा इतिहासकार आणि पौराणिक शास्त्रांमधील वादग्रस्त मुद्दा असूनही, भारतीय प्रेक्षक या शैलीचा शक्य तितक्या प्रमाणात आनंद लुटत आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nag panchami 2024 the mythical and cultural significance of the nagin in india svs