राजेश्वर ठाकरे
देशात सध्या दहा वंदे भारत एक्सप्रेस वेगवेगळ्या शहरादरम्यान धावत असून या गाड्यांची लोकप्रियताही कमालीची वाढल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या मतदारसंघात वंदे भारत एक्सप्रेस सुरू व्हावी, अशी आग्रही मागणी रेल्वेमंत्र्याकडे केली आहे. नेमकी उलट स्थिती मात्र नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसबाबत आहे. मध्य भारतात या गाडीला प्रवाशांची वानवा आहे. असे का घडत आहे, याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे.
वंदे भारत एक्सप्रेस काय आहे?
वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेकडून चालवल्या जाणाऱ्या आणि व्यवस्थापित केलेल्या आधुनिक गाड्यांपैकी एक आहे. ही देशातील अर्धद्रुतगती गाडी आहे. ती उच्च-कार्यक्षमता, इलेक्ट्रिक मल्टी-युनिट ट्रेन आहे. चेन्नईतील सरकारी मालकीच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीकडून (आयसीएफ) तिची रचना आणि निर्मिती केली गेली. ‘वंदे भारत’ला यापूर्वी ‘ट्रेन- १८’ म्हणूनही ओळखले जात असे. २७ जानेवारी २०१९ रोजी गाडीचे नाव बदलून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ असे करण्यात आले, कारण ही गाडी संपूर्णपणे भारतात तयार करण्यात आली होती.
या गाडीचे वैशिष्ट्य काय?
वंदे भारत एक्सप्रेस डिझाईन आणि वैशिष्ट्य आरडीएसओने (लखनऊ) प्रमाणित केले आहे. ही गाडी स्वदेशी बनावटीची असून सर्वात आधुनिक प्रकारच्या गाडीपैकी एक आहे. या गाडीत विमानासारख्या सुविधा आहेत. ती संपूर्ण वातानुकूलित आहे, ज्यामुळे प्रवास अधिक सुखकर होतो. प्रत्येक डब्यात मोठ्या खिडक्या आहेत, ज्यामुळे प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा अनुभव घेता येतो. गाडीतील खानपान सेवा उत्कृष्ट असणे अपेक्षित आहे. इतर प्रमुख सुविधांमध्ये स्वयंचलित दरवाजे, स्मोक अलार्म, पाळत यंत्रणा, गंध नियंत्रण प्रणाली, सेन्सरी टॅप इत्यादींचा समावेश होतो. या गाडीमध्ये जीपीएस-आधारित प्रवासी माहिती प्रणाली आहे. बायो-व्हॅक्यूम टॉयलेट आणि फिरते आसन (केवळ एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये) ही वैशिष्ट्ये आहेत. या गाडीला रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम आहे. तिची वेगमर्यादा ताशी १६० प्रतिकिलोमीटर इतकी आहे.
सध्या ती कोणत्या मार्गावर धावत आहे?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी नवी दिल्ली-वाराणसी या मार्गावर १५ फेब्रुवारी २०१९ रोजी पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण केले. त्यानंतर नवी दिल्ली-माता वैष्णोदेवी कटरा (जम्मू-काश्मीर), गांधीनगर-मुंबई, नवी दिल्ली-आंब अंदुरा (हिमाचल प्रदेश), चेन्नई-म्हैसूर, नागपूर-बिलासपूर, हावडा-न्यू जलपाईगुडी, सिकंदराबाद-विशाखापट्टणम, मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी अशा एकूण देशात दहा मार्गांवर सध्या वंदे भारत धावत आहे.
कोणत्या मार्गावर गाडीला सर्वाधिक प्रवासी मिळतात?
देशात धावत असलेल्या १० वंदे भारत गाड्यांपैकी मुंबई – गांधीनगर मार्ग हा सर्वाधिक प्रवासी असलेला मार्ग आहे. या मार्गावर १२६ टक्के प्रवासी दर असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. इतरही मार्गावर ही गाडी लोकप्रिय असल्याचे दिसून येत आहे. मात्र, नागपूर-बिलासपूर वंदे एक्स्प्रेसमध्ये या आर्थिक वर्षात जानेवारीपर्यंत सर्वात कमी प्रवासी दर आहे.
नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला सध्या प्रतिसाद कसा आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर-बिलासपूर वंंदे एक्सप्रेसला ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपुरात हिरवा झेंडा दाखवून या गाडीचा प्रारंभ केला. ही गाडी सुमारे ४१३ किलोमीटर हे अंतर साडेचार तासात कापते. त्यामुळे या गाडीची लोकप्रियतादेखील वाढेल, अशी अपेक्षा होती. पण एक-दोन दिवस वगळता गाडीला अत्यल्प प्रतिसाद आहे. या गाडीला सरासरी प्रवासी दर केवळ ५५ टक्के आहे.
अत्यल्प प्रवासी मिळण्याचे कारण काय?
नागपूर-बिलासपूर वंदे एक्सप्रेसला अत्यल्प प्रतिसाद हा रेल्वे प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. त्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी रेल्वेने अभ्यास केला. विदर्भाचे प्रमुख शहर नागपूर आणि छत्तीसगडचे दुसऱ्या क्रमांकाचे शहर बिलासपूर दरम्यान नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्याच मुळी कमी आहे. नागपूर ते बिलासपूर दरम्यान धावणाऱ्या इतर रेल्वेगाड्या, खासगी बसगाड्यांचा अभ्यास केल्यानंतर या मार्गावर नियमित प्रवास नसल्याचे दिसून आले. औषधोपचार आणि शिक्षण घेण्यासाठी छत्तीसगड येथून नागपूरला येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. असे प्रवासी दररोज ये-जा करीत नाही. या दोन्ही शहरादरम्यान नोकरी, व्यापार, व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. त्याचा परिणाम या गाडीला आवश्यक तेवढे प्रवासी मिळू शकत नसल्याचा निष्कर्ष रेल्वेच्या वाणिज्य विभागाने काढला आहे.
वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता वाढवण्यासाठी काय प्रयत्न हवेत?
वंदे भारत एक्स्प्रेसचे प्रवास भाडे एसी थ्री टिअरच्या धर्तीवर आहे. हे भाडे क्रयशक्ती कमी असलेल्या या भागातील प्रवाशांना परवडत नाही. हे भाडे कमी केल्यास प्रवाशांची संख्या तुलनेने काही प्रमाणात का होईना वाढण्यास मदत होईल. दुसरा मुद्दा या गाडीच्या वेळेसंदर्भातला आहे. नागपूरहून ही गाडी दुपारी २ वाजून ५ मिनिटांनी सुटते आणि बिलासपूरला ७ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचते. तर बिलासपूरहून रात्री सव्वा वाजता निघते आणि नागपूरला सकाळी पावणेसात वाजता पोहचते. या दोन्ही शहरादम्यान व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी या गाडीच्या या वेळा असुविधाजनक आहेत. वेळेत बदल केल्यास देखील प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.